आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
azadi ka amrit mahotsav

सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) पद्धतीने कामराजर पोर्ट लिमिटेड येथे आरेखन, बांधकाम, वित्तपुरवठा, संचालन आणि हस्तांतरण (डीबीएफओटी) तत्त्वावर दुसऱ्या कंटेनर टर्मिनलच्या विकासाला मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

Posted On: 25 NOV 2026 7:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या आज झालेल्या बैठकीत, कामराजर पोर्ट लिमिटेड (केपीएल) येथे सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) पद्धतीने आरेखन, बांधकाम, वित्तपुरवठा, संचालन आणि हस्तांतरण (डीबीएफओटी) तत्त्वानुसार दुसऱ्या कंटेनर टर्मिनलच्या विकासाच्या प्रस्तावित प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी वस्तू आणि सेवा करासह अंदाजित खर्च 4,288.26 कोटी रुपये खर्च येईल असा अंदाज आहे. या प्रकल्पांतर्गत आपल्या इथे 900 मीटर लांबीचे कंटेनर टर्मिनल विकसित केले जाणार आहे. या टर्मिनलची संरचनात्मक खोली 18 मीटर असून वार्षिक कंटेनर हाताळणी क्षमता 20 लाख टीईयू इतकी असेल. हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. 

खर्च:

पीपीपी घटकाचा अंदाजित प्रकल्प खर्च, जीएसटीसह 4,288.26 कोटी रुपये असून यात पहिल्या टप्प्यासाठी 2,429.32 कोटी रुपये आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 1,858.94 कोटी रुपये खर्च येणार आहे.

या प्रकल्पामध्ये 900 मीटर लांबीच्या दुसऱ्या कंटेनर टर्मिनलच्या विकासाची तरतूद आहे. या कंटेनरची बर्थ रुंदी 30 मीटर असेल आणि वार्षिक कंटेनर हाताळणी क्षमता 20 लाख टीईयू (TEUs) असेल.

हा प्रकल्प एका पारदर्शक, खुल्या जागतिक बोली प्रक्रियेद्वारे राबविण्याचा प्रस्ताव आहे. सवलतदार आवश्यक वित्तपुरवठ्याची व्यवस्था करेल तसेच सवलत करार आणि लागू असलेल्या दर चौकटीच्या तरतुदींनुसार वापर शुल्काद्वारे आपली गुंतवणूक वसूल करेल.

अंमलबजावणी धोरण आणि उद्दिष्टे: या प्रकल्पाची अंमलबजावणी डीबीएफओटी पद्धतीनुसार निवडण्यात आलेल्या सवलतधारकांमार्फत केली जाईल. पहिल्या टप्प्यात 11 लाख टीईयू क्षमतेचे कंटेनर टर्मिनल विकसित करण्यात येणार असून सवलत करार प्रदान केल्याच्या तारखेपासून 24 महिन्यांच्या आत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर 25व्या महिन्यात व्यावसायिक कामकाज सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यात 9 लाख टीईयु क्षमतेचे टर्मिनल विकसित करण्यात येणार असून 48 व्या महिन्यांपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. 49 व्या महिन्यापासून संपूर्ण क्षमतेने व्यावसायिक कामकाज सुरू होईल.

पार्श्वभूमी:

कामराजर पोर्ट लिमिटेड, हे पूर्वी एनोर पोर्ट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे भारतातील 12 प्रमुख बंदरांपैकी एक असून, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या चेन्नई पोर्ट अथॉरिटीच्या संपूर्ण मालकीचे आहे. तामिळनाडूच्या पूर्व किनाऱ्यावर, चेन्नई औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्राजवळ स्थित असलेले हे बंदर, कोळसा, पेट्रोलियम, तेल आणि वंगण, एलएनजी, एलपीजी, कंटेनर्स, ऑटोमोबाईल्स आणि सामान्य मालासह विविध प्रकारच्या मालाची हाताळणी करते.

चेन्नई-एन्नोर हा प्रदेश भारतातील एक प्रमुख औद्योगिक आणि उत्पादन क्षेत्रांपैकी एक आहे. व्यापार आणि कंटेनर वाहतुकीत वाढ होत असल्यामुळे, तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेश तसेच विस्तृत दक्षिण अंतर्भागातून येणाऱ्या आयात-निर्यात (EXIM) मालाच्या वाहतुकीला सहाय्य करण्यासाठी अतिरिक्त कंटेनर हाताळणी क्षमता आणि मोठ्या जहाजांसाठी कार्यक्षम सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विशेष महत्त्व आहे.


शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2341534) अभ्यागत कक्ष : 3