57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

“मी इतरांच्या निकषांनुसार परिपूर्ण का असावे?” :57 व्या इफ्फी मध्ये गिरीश कासारवल्ली यांनी अस्सलपणाच्या मूल्याचा कैवार घेतला


एखाद्याला ‘परके करण्याची’ समाजाची क्रूर प्रक्रिया नेहमीच माझ्या कथांच्या केंद्रस्थानी राहिली आहे: 57व्या इफ्फीमध्ये गिरीश कासारवल्ली यांनी समांतर चित्रपटांच्या 50 वर्षांच्या प्रवासावर प्रकाश टाकला

Posted On: 21 NOV 2026 5:20PMby PIB MumbaiRelease ID: 2339692Views: 27

गोवा, 21 नोव्‍हेंबर 2026

 

गिरीश कासारवळ्ळी यांच्यासाठी चित्रपट म्हणजे केवळ कथा सांगण्याची कला नव्हे; तर समाजाने ज्या गोष्टींकडे पाहायला नकार दिला त्यांचा सामना करण्याचे धैर्य म्हणजे चित्रपट आहे. जात-पात आणि सामाजिक उतरंडीपासून धार्मिक वर्चस्व आणि असुरक्षित समुदायांच्या दुर्बलीकरणापर्यंत, ‘परके करण्याची’ प्रक्रिया त्यांच्या पाच दशकांच्या प्रदीर्घ चित्रपटीय वाटचाली दरम्यान पुनःपुन्हा त्यांच्या चिंतनाचा विषय ठरला आहे.  हेच तत्वज्ञान 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान गोव्यातील कला अकादमी येथे ‘संवाद’ सत्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘समांतर चित्रपटांचे नैतिक विश्व: गिरीश कासारवल्ली यांच्या वाटचालीची 50 वर्षे’ या कार्यक्रमातही केंद्रस्थानी राहिले.

वर्ष 1977 मधील पहिल्या ‘घटश्राद्ध’ या चित्रपटापासून सुरु झालेल्या या उल्लेखनीय प्रवासापासून तबराना कथे, ठायी साहेबा आणि द्वीपा यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांपर्यंत, या सुप्रसिध्द चित्रपट निर्माता आणि 14-वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेत्याने, प्रत्येक चित्रपटीय अभिव्यक्तीमध्ये एक वैचारिक भूमिका समाविष्ट असते, यावर अधिक भर देत व्यावसायिक आणि कलात्मक चित्रपटांमधील पारंपरिक विभाजनाला आव्हान दिले आहे. चित्रपट निर्माते प्रबळ सामाजिक विचारांचे प्रदर्शन करतात किंवा त्यांना आव्हान देतात ही बाब अधोरेखित करत ते म्हणाले, “चित्रपटांमध्ये ‘केवळ मनोरंजन’ असे काही नसते. मनोरंजन हा देखील एक राजकीय प्रकार आहे.”

नव्या कन्नड चित्रपटांमध्ये झालेल्या परिवर्तनावर अधिक प्रकाश टाकत गिरीश यांनी परक्यांच्या चौकटीचा वापर करण्याऐवजी आपल्या देशाच्या सामाजिक तसेच सांस्कृतिक वास्तवांवर आधारलेली स्वदेशी चित्रपटीय भाषा विकसित करण्याच्या गरजेबाबत चर्चा केली. “कोणत्याही चित्रपटावर शैली बाहेरून लादता येत नाही, ती त्या चित्रपटाच्या आशयातूनच व्यक्त होते,” ते म्हणाले. त्यांचे कथाकथनविषयक तत्वज्ञान विषद करत ते पुढे म्हणाले, “चित्रपटाचे  कथानक महत्त्वाचे नसते तर त्या कथेमागची संकल्पना महत्त्वाची असते.” त्यांनी ‘परके करण्याची क्रिया’ – असुरक्षित समुदायांची उपेक्षा आणि त्यांना वगळणे- या भावनेविषयीचीचिंता त्यांच्या चित्रपटांच्या केंद्रस्थानी असते, असे सांगितले.

नैतिकतेविषयी  निष्कर्ष काढणे हे योग्य नाही असे सांगत, कासरवळ्ळी यांनी स्पष्ट केले की, चित्रपटांनी सरधोपट निर्णय देण्याऐवजी  विचार करायला प्रवृत्त केले पाहिजे. विचारप्रवृत्त करणारे  लेखक यु. आर. अनंतमूर्ती यांच्या, प्रत्येक उत्तराचा शेवट ‘परंतु’ ने करण्याच्या तत्वज्ञानाचा संदर्भ घेत ते म्हणाले, “एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून ‘हे योग्य किंवा बरोबर आहे’, अथवा, ‘हे चुकीचे आहे’ असे मांडणे हे मुळातच चूक आहे. मी कधीही सहजासहजी निर्णयाप्रत येत नाही, कारण त्यामुळे प्रेक्षकांना विचार करायला अवसर मिळतो.”

या चर्चेदरम्यान कासरवळ्ळी यांच्या चित्रपटांतील स्त्रियांचे चित्रण आणि त्यांनी दाखवलेली जिद्द, चिकाटी यावरही ऊहापोह करण्यात आला. ‘द्वीपा’ या चित्रपटाचा संदर्भ देताना त्यांनी त्यातील नायिका नागी हिच्या संकटांना सामोरे जाण्याच्या व्यावहारिक दृष्टिकोनावर प्रकाश टाकला.  “मला निदान वर्तमान तरी आनंददायी बनवू द्या,” या तिच्या शब्दांची त्यांनी आठवण करून दिली. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची आणि आयुष्यातील अनिश्चिततेचा सामना करण्याची विलक्षण क्षमता स्त्रियांमध्ये अनेकदा दिसून येते, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

आपल्या सर्जनशील प्रक्रियेविषयी माहिती देताना कासरवळ्ळी यांनी स्पष्ट केले की, स्टोरीबोर्डपेक्षा, अत्यंत बारकाव्यांसह तपशीलवार पटकथा लिहिण्यास ते प्राधान्य देतात. कारण, त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या कल्पनेतील दृश्ये  पडद्यावर साकारणे शक्य होते. “चित्रपटाची बीजे, म्हणजेच कल्पना माझ्या मनात रुजतात, मात्र ती प्रत्यक्षात साकारण्याचे काम इतर जण करतात,” असे म्हणत त्यांनी चित्रपट निर्मितीमधील सामूहिक स्वरूपावर भर दिला. चित्रपट हा केवळ काही विधाने मांडण्याचे माध्यम नसून, प्रेक्षकांना एक अनुभव देण्याचे माध्यम आहे, असेही त्यांनी नमूद केले.

आपल्या भाषणाच्या समरोपात त्यांनी सांस्कृतिक प्रामाणिकपणा अर्थात अस्सलता दाखवण्याचे आवाहन केले. यासाठी  त्यांनी युलिओ गार्सिया एस्पिनोसा यांच्या ‘सदोष चित्रपट’ या तत्वज्ञानाचा संदर्भ दिला. बाह्य निकषांशी स्वतःची तुलना करण्याऐवजी भारतीय चित्रपट निर्मात्यांनी आपल्या सांस्कृतिक आणि दृश्यात्मक अस्मितेशी नाळ जोडून ठेवली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. “इतरांच्या निकषांनुसार मी ‘परिपूर्ण’ का असावे? मी माझ्या स्वतःच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परिस्थितीशी  प्रामाणिक राहिले पाहिजे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

पाच दशकांहून अधिक काळ भारतीय चित्रपटसृष्टीत योगदान देणाऱ्या या दिग्दर्शकाचा दैदीप्यमान प्रवास या सत्रातून उलगडला. आजही त्यांचे चित्रपट  प्रस्थापित रूढींना आव्हान देतात, श्रेणीबद्ध समाजव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करतात, आणि मानवी प्रतिष्ठा आणि सद्सद्विवेकबुद्धीच्या गुंतागुंतीच्या पैलूंचा वेध घेतात. भारतीय चित्रपटसृष्टीची खरी ताकद तिच्या स्वतःचा स्वतंत्र आवाज शोधण्याच्या क्षमतेत आहे, जो या देशातील वैविध्यपूर्ण सांस्कृतिक अनुभवांवर आधारलेला आहे.

या सत्राचे सूत्रसंचालन ख्यातनाम चित्रपट पत्रकार, समीक्षक आणि लेखक नमन रामचंद्रन यांनी केले.

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्‍पलकट्टी/संजना चिटणीस/सविता म्हसकर/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2339692
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026