Posted On:
19 NOV 2026 10:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2026
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (एमओआरटीएच) नियम 115 मधील उप-नियम(7) मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला असून उत्सर्जन चाचणीच्या वारंवारतेला वाहनांच्या वयानुसार जुळवून घेणे हा या सुधारणेचा हेतू आहे. वापरात असलेल्या वाहनांतून होणाऱ्या उत्सर्जनावर सातत्याने लक्ष ठेवणे सुनिश्चित करतानाच, तुलनेने नव्या आणि अधिक स्वच्छ वाहनांच्या मालकांवरील नियम पालनाचे ओझे कमी करणे तसेच कार्यक्षम प्रदूषण नियंत्रण प्रमाणीकरण प्रणालीला चालना देण्याच्या उद्देशाने ही सुधारणा सुचवण्यात आली आहे.
या सुधारणेत खालील मुद्यांचा समावेश आहे:
प्रस्तावित सुधारित वैधता कालावधी खालीलप्रमाणे:
बीएस-I, बीएस-II आणि बीएस-III: 3 महिने
बीएस- IV वाहने: 6 महिने
बीएस-VI बिगर-मालवाहतूक वाहने:
पहिल्या नोंदणीच्या तारखेपासून 6 वर्षांपर्यंत – 3 वर्षे;
6 वर्षांहून अधिक पण 10 वर्षांपेक्षा कमी –1 वर्ष; आणि
10 वर्षांहून अधिक – 6 महिने
बीएस-VI मालवाहतूक वाहने:
पहिल्या नोंदणीच्या तारखेपासून 6 वर्षांपर्यंत – 2 वर्षे;
6 वर्षांहून अधिक पण 10 वर्षांपेक्षा कमी –1 वर्ष; आणि
10 वर्षांहून अधिक – 6 महिने
1.सुधारणा अंमलात येण्यापूर्वी जारी केलेल्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रांसाठी (पीयुसीसीज) सुधारित वैधता कालावधी लागू होण्यासाठी केलेली संक्रमण व्यवस्था सुधारणा लागू झाल्यानंतर त्यांच्या पहिल्या नूतनीकरणाच्या तारखेपासून वैध असेल.
2.सध्याचे प्रमाणपत्र बाद होण्यापूर्वीच्या 10 दिवसांच्या आत पीयूसीसीचे नूतनीकरण केले तर नवे प्रमाणपत्र विद्यमान प्रमाणपत्राची वैधता संपण्याच्या तारखेपासून लागू होईल. मात्र, सध्याच्या प्रमाणपत्राची वैधता संपल्यानंतर जर नूतनीकरण केले तर नवे प्रमाणपत्र ज्या दिवशी नूतनीकरण झाले त्या तारखेपासून लागू होईल.
शैलेश पाटील/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर