संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एरो इंडिया 2027 या हवाई शो आणि प्रदर्शनासाठी माध्यम प्रतिनिधींची नोंदणी सुरु

Posted On: 19 NOV 2026 5:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2026

एरो इंडिया 2027 या हवाई शो आणि प्रदर्शनासाठी माध्यम प्रतिनिधींची नोंदणी सुरु झाली आहे. आशियातील सर्वात मोठा हवाई शो असलेल्या आणि जगातील एक प्रमुख एरोस्पेस तसेच संरक्षण प्रदर्शन असलेल्या या कार्यक्रमाचे हे 16 वे वर्ष असून कर्नाटकातील बंगळूरूमध्ये येलहांका येथील हवाई तळावर दिनांक 8 ते 12 फेब्रुवारी, 2027 या कालावधीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यासाठी इच्छुक असलेले माध्यम प्रतिनिधी https://aeroindia.gov.in/ येथे नोंदणी करु शकतात. नोंदणी करण्यासाठीची अंतिम मुदत 4 जानेवारी 2027 पर्यंत आहे.

नोंदणी करण्यासाठी अर्जदाराकडे खालील कागदपत्रे असणे अनिवार्य आहे:

मान्यताप्राप्त पत्रकारांसाठी पत्रसूचना कार्यालयाचे किंवा राज्य सरकारचे अधिस्वीकृती कार्ड आणि अधिस्वीकृती नसलेल्या माध्यम प्रतिनिधींसाठी वैध माध्यम ओळखपत्र. (फाईलचा आकार 1 एमबीपेक्षा जास्त नसावा)

सर्व माध्यम कर्मचाऱ्यांसाठी सरकारने जारी केलेले छायाचित्रासह ओळख पत्र. (फाईलचा आकार 1 एमबीपेक्षा जास्त नसावा)

स्वतःचे अलीकडच्या काळातील छायाचित्र.(फाईलचा आकार 512 केबीपेक्षा जास्त नसावा)

परदेशी पत्रकारांसाठी वैध ‘जे’ व्हिसा. (फाईलचा आकार 1 एमबीपेक्षा जास्त नसावा)

संरक्षण मंत्रालयातील संरक्षण उत्पादन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला एरो इंडिया 2027 हा कार्यक्रम आघाडीच्या एरोस्पेस आणि संरक्षण कंपन्या, धोरणकर्ते, तांत्रिक तज्ञ, नवोन्मेषकर्ते, उद्योगांचे प्रतिनिधी तसेच संरक्षण दलांमधील कर्मचाऱ्यांना एकत्र आणणारे महत्वाचे जागतिक व्यासपीठ ठरत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात विशाल प्रदर्शनासह व्यापारी आणि धोरणात्मक कार्यक्रमांची मालिका, उद्योगांच्या सहयोगामध्ये सुलभता आणणे, सरकार आणि उद्योग यांच्यातील संवाद, तंत्रज्ञानसंबंधित सादरीकरणे तसेच ज्ञानाची देवाणघेवाण यांसारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अत्याधुनिक हवाई तंत्रांद्यान आणि क्षमतांचे दर्शन घडवत, भारतीय हवाई दलाची विमाने आणि सहभागी आंतरराष्ट्रीय विमानांच्या पथकांनी सादर केलेली आकर्षक हवाई प्रात्यक्षिके हा या कार्यक्रमाचा परमोच्च आकर्षण बिंदू असणार आहे.

16 वा एरो इंडिया हा कार्यक्रम आत्मनिर्भर भारत उभारण्याप्रती देशाची कटिबद्धता आणखी मजबूत करेल आणि जागतिक हवाई अवकाश तसेच संरक्षण पुरवठा साखळीतील विश्वसनीय भागीदार म्हणून स्वतःचे स्थान अधिक बळकट करेल. गुंतवणूक, निर्यात आणि तंत्रज्ञानसंबंधी सहयोगाला चालना देतानाच हा कार्यक्रम सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्ट-अप उद्योगांसह देशातील संरक्षण उद्योगांना त्यांच्या क्षमतांचे प्रदर्शन करण्यासाठी, व्यवसायाच्या नव्या संधींचा शोध घेण्यासाठी तसेच भागीदारी प्रस्थापित करण्यासाठी एक महत्त्वाचा मंच उपलब्ध करून देईल.
 
शैलेश पाटील/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2338614) अभ्यागत कक्ष : 11