57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रथमच सादर होत असलेल्या ‘चित्रपटांविषयीचे चित्रपट’ विभागाच्या समावेशासह महोत्सवातील एका नव्या पर्वाची सुरुवात


गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेल्या या महोत्सवात दहा देशांतील पाच आंतरराष्ट्रीय निर्मिती संस्था त्यांच्या कलाकृती सादर करणार

सुप्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांच्या सूचनेनुसार तयार करण्यात आलेली ही पहिली शृंखला चित्रपटाच्या पडद्यामागची आयुष्ये, वारसा आणि सर्जनशील प्रवासाचा शोध घेते

Posted On: 18 NOV 2026 2:26PMby PIB MumbaiRelease ID: 2338114Views: 15

गोवा, 18 नोव्‍हेंबर 2026

 

चित्रपट हे नेहमीच सीमा, पिढ्या आणि संस्कृतींच्या पलीकडे जाणाऱ्या कथा सांगणारे असतात. पण प्रत्येक चित्रपटाच्या घडणीमागे आणखी एक कथा असते जी त्या चित्रपटाचा निर्माता, सर्जनशीलतेची प्रक्रिया, त्यासाठीची धडपड आणि त्या चित्रपटाला आकार देणारे लोक यांची कहाणी सांगण्यासाठी इच्छुक असते.

अशाच कहाण्यांना प्रकाशझोतात आणत 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी), या वर्षीच्या ‘चित्रपटांविषयीचे चित्रपट’ या संकल्पनेंतर्गत चित्रपटाच्या निर्मिती प्रकियेवरच प्रकाश टाकणाऱ्या नव्या विभागाची सुरुवात केली आहे. महान चित्रपट निर्मात्यांच्या कथा, कलाकार आणि कधीच पूर्ण न होऊ शकलेले चित्रपट यांच्याबद्दलच्या कथांसह हा विभाग प्रेक्षकांना चित्रपट तयार होताना ज्या विविध मार्गांनी प्रवास करतो त्यांचा शोध घेण्याची संधी देतो.

चित्रपटांच्या कथा, कथाकार आणि सर्जकतेचा प्रवास उलगडण्यासाठी कॅमेऱ्याच्या मागे पाऊल ठेवत 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) दर्शकांना अशा जागेची ओळख करून देतो जेथे कथाकार आणि कथा यांचाच एक चित्रपट तयार होतो. या महोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच सुरु होत असलेला ‘चित्रपटांविषयीचे चित्रपट’ हा विभाग, चित्रपटनिर्मितीची कला आणि कौशल्ये जवळून जाणून घेण्यासाठी 20 ते 28 नोव्हेंबर, 2026 या कालावधीत गोवा येथे होत असलेल्या 57 व्या इफ्फीमध्ये प्रेक्षकांना आमंत्रित करत आहे.

सुप्रसिध्द चित्रपट निर्मात्यांच्या सूचनांना प्रतिसाद देत, चित्रपट निर्मितीची कला आणि कौशल्ये सर्वांसमोर आणण्याच्या उद्देशाने समाविष्ट करण्यात आलेल्या या उद्घाटन विभागात पाच आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मिती संस्थांच्या कलाकृती बघायला मिळतील. युके, अमेरिका, रशिया, जॉर्जिया, ईस्टोनिया, तुर्कस्तान, स्वित्झर्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि इटली या दहा देशांमधील निर्मिती तसेच सह-निर्मिती संस्थांच्या कलाकृतींची ही शृंखला चित्रपट रसिकांना चित्रपट विश्वाला आकार देणाऱ्यांची आयुष्ये आणि वारसा यांचे दर्शन घेण्याची दुर्मिळ संधी उपलब्ध करून देईल.

ज्यांच्या कामाने चित्रपटांच्या भाषेवर अमिट ठसा उमटवला आहे अशा चित्रपट निर्मात्याच्या कहाणीसह हा प्रवास सुरु होतो.

बार्नाबी थॉम्पसन यांनी दिग्दर्शित केलेला मावरिक:द एपिक अॅडव्हेंचर्स ऑफ डेव्हिड लीन (युके, अमेरिका/ 2026/इंग्रजी/105 मिनिटे) हा चित्रपट महान चित्रपट निर्माते डेव्हिड लीन यांचे जीवन आणि कारकीर्द यांचा शोध घेतो. त्यांची सर्जनशील दूरदृष्टी, महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि चित्रपटीय मर्यादा विस्तारण्याचा निर्धार यांचे दर्शन घडवतानाच हा माहितीपट त्यांच्या व्यावसायिक यशामागे लपलेले वैयक्तिक संघर्ष तसेच आधुनिक चित्रपटांवर पडलेला त्यांचा कायमस्वरूपी प्रभाव यांचा देखील आढावा घेतो.

एका प्रख्यात चित्रपट निर्मात्याच्या वारशाकडून आपण सांगत असलेल्या कथांना आकार देणाऱ्या आयुष्यांकडे आणि नात्यांकडे वळताना, या विभागातील कथेचा ओघ मानवी अनुभवाच्या अधिक आंतरिक शोधाकडे वळतो.

रशियातील, रौल गेईदारॉव यांचा सिडनी लुमेट्स बर्थडे (रशिया/2025/रशियन/92 मिनिटे) हा चित्रपट दातो या 17 वर्षीय जॉर्जियन मुलाची कथा सांगतो. त्याच्या आजीसह एकेकाळी खूप मोठ्या असलेल्या कुटुंबाच्या उरल्यासुरल्या आठवणींमध्ये तो जीवन कंठत असतो. दीर्घकाळानंतर अचानकपणे त्याची आई परत येते आणि त्यांची शांत दिनचर्या विस्कळीत होते. ही कथा कौटुंबिक नातेसंबंध, लहानपणापासून मोठे होत जाणे आणि अत्यंत कठीण परिस्थितींमध्ये मानवी मूल्ये जपण्यासाठी संघर्ष करत राहण्याचा प्रवास दर्शवते.

पुढील चित्रपटात जीवन आणि सादरीकरण यांच्यातील संबंधांना केंद्रस्थान देण्यात आले असून एक अभिनेता आणि तो रंगवत असलेले पात्र यांच्यामधील सीमारेषा पुसट होत जाण्याची अवस्था दर्शवण्यात आली आहे. ऍना उर्शड्झे याची सहायक भूमिका (मेओरेखरिस्खोवनी रोली) (जॉर्जिया, एस्टोनिया, तुर्कीये, स्वित्झर्लंड, यूएसए /2026/ जॉर्जियन, अर्मेनियन / 139 मिनिट) एका लोकप्रिय जॉर्जियन अभिनेत्याची आहे आणि तो दीर्घ काळाच्या विश्रांतीनंतर अभिनय क्षेत्राकडे परतला असून त्याने एका युवा दिग्दर्शकाच्या पहिल्या चित्रपटासाठी ऑडिशन दिली आहे. मुख्य भूमिकेऐवजी वेगळी अशी सहायक अभिनेत्याची भूमिका मिळाल्यानंतर तो हळूहळू त्या भूमिकेशी एकरुप होऊ लागतो. या अनुभवामुळे व्यक्ती म्हणून त्याच्यातही बदल घडत जातो.

एक अभिनेता म्हणून झालेल्या वैयक्तिक प्रवासाची ही कथा एका अशा चित्रपटाची आहे जो कधीच प्रदर्शित झाला नाही. चित्रपटावर त्याच्या निर्मितीच्या काळातील राजकीय व ऐतिहासिक वातावरणाचा कसा परिणाम होतो हे हा चित्रपट दर्शवितो.

मॅड डॉग ऑफ युरोप (फ्रान्स, जर्मनी / 2026/ इंग्रजी / 83 मिनिट) या चित्रपटात दिग्दर्शिका रुबिका शाह यांनी एका निर्माण न झालेल्या पटकथेची कहाणी पुन्हा मांडली आहे. हर्मन जे. मन्केविझ यांनी लिहीलेली ही पटकथा 1932 मध्ये हिटलर व नाझीवादाचा सामना करावा लागलेल्या एका जर्मन –ज्यू कुटुंबाची कहाणी आहे. राजकीय दबाव आणि व्यावसायिक हितसंबंधांमुळे हॉलिवुडने कधीच निर्माण न केलेल्या या पटकथेवरील दबाव व तिचा आजच्या काळातील संदर्भ या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. 

चित्रपटसृष्टीला आकार देणाऱ्या व्यक्तीचा हा जीवनप्रवास, महान वारसा आणि सर्जनशीलतेचा संघर्ष पूर्ण करुन त्याद्वारे एका प्रभावशाली व्यक्तीमत्त्वाला आदरांजली अर्पण करण्यात आली आहे.

या मालिकेतील शेवटचा चित्रपट म्हणजे फ्रान्सिस्को झिपेल यांचा व्हिट्टोरिओ दी सिका – स्टेजिंग लाइफ (इटली / 2026 / इटालियन, फ्रेंच, इंग्रजी, रशियन, फारसी / 100 मिनिट). यामध्ये जागतिक चित्रपट क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्त्व व्हिट्टोरिओ दी सिका यांचे व्यक्तीगत चित्र साकारण्यात आले आहे. अतिशय दुर्मिळ पुरातत्त्व साहित्य, कुटुंबाकडून मिळालेली माहिती आणि तत्कालीन चित्रपट निर्माते व कलाकार यांच्या मुलाखती यावर आधारित असलेला हा माहितीपट व्हिट्टोरिओ यांचे जीवन, काम व चित्रपटांचा वारसा यांचा मागोवा घेतो. 

एकंदर या पाच माहितीपटांमधून चित्रपट निर्मितीपलिकडची कहाणी सादर करण्यात आली आहे. यामध्ये कॅमेऱ्यामागचे तंत्रज्ञ, व्यक्तीचित्र, सांगितल्या न गेलेल्या कहाण्या आणि चित्रपट निर्मात्यांच्या अनेक पिढ्यांवर प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तींचा वारसा यांचा शोध या माहितीपटांनी घेतला आहे. असे विविधांगी जीवनप्रवास एकत्र आणत या नवीन विभागाने इफ्फीच्या ‘सीमाबंधन नसलेल्या कहाण्या’ या संकल्पनेला एक वेगळा पैलू प्राप्त करुन दिला आहे. चित्रपटांचा प्रभाव पडद्यावरील कहाणीपलिकडे जाऊन सर्जनशीलतेचा प्रवास, ऐतिहासिक संदर्भ व मानवी अनुभवांचा आहे याची आठवण हा विभाग प्रेक्षकांना करुन देईल. चित्रपटांविषयीचे चित्रपट हा पहिल्यांदाच सुरू झालेला विभाग प्रेक्षकांना कला व चित्रपटनिर्मिती यांच्याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देतो.

57 वा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) गोवा येथे 20 ते 28 नोव्हेंबर 2026 या कालावधीत होणार आहे. ‘सीमाबंधन नसलेल्या कहाण्या’ या संकल्पनेअंतर्गत या महोत्सवात भारतातील तसेच जगभरातील चित्रपट निर्माते, उद्योजक आणि चित्रपटप्रेमी सहभागी होतील.

नव्याने सुरू झालेल्या ‘चित्रपटांविषयीचे चित्रपट’ या विभागात विविध देशांमधील व संस्कृतींमधील चित्रपट निर्माते, अभिनेते व चित्रपट क्षेत्रातील दिग्गज यांच्या कहाण्या एकत्रितपणे सादर करण्यात आल्या असून त्या चित्रपट कला कशा प्रकारे भौगोलिक सीमांपलीकडे पोहोचली आहे ते दर्शवितात. हा विभाग इफ्फीच्या या संकल्पनेला मूर्त रुप देत आहे.

चित्रपट निर्मितीमागचे लोक, संकल्पना व अनुभव यांचा शोध घेणारा हा विभाग जगभरातील चित्रपट निर्माते व प्रेक्षकांना एकमेकांशी जोडणाऱ्या सर्जनशीलतेचा वैश्विक प्रवास अधोरेखित करतो. वैविध्यपूर्ण भारतीय व आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश, विशिष्ट देशांचा विभाग, चित्रपटाचे प्रथम प्रदर्शन, स्पर्धा व चित्रपट उद्योगाच्या सहभागामुळे इफ्फीने 2026 मध्येही आपली चित्रपट क्षेत्रातील सर्वोत्कृष्टता साजरी करण्याची आणि चित्रपटांच्या माध्यमातून विविध देशांमधील सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्याची परंपरा कायम राखली आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/संजना चिटणीस/सुरेखा जोशी/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2338114
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026