गोवा, 17 नोव्हेंबर 2026
हिमालयातील पर्वतरांगा, बौद्ध मठ, बर्फाच्छादित गावे आणि आजही जपल्या जाणाऱ्या पारंपरिक कलाकौशल्याचे दर्शन गोव्यात होणाऱ्या 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अर्थात इफ्फीमध्ये घडणार आहे. लडाखी आणि काश्मिरी भाषांमधील दोन कथापट आणि दोन कथाबाह्य चित्रपट अशा चार चित्रपटांमधून या प्रदेशातील निसर्गसौंदर्य, परंपरा आणि दैनंदिन जीवनातील मानवी भावविश्व रुपेरी पडद्यावर साकारले जाणार आहे.
‘बिकमिंग’ हा लडाखी लघुपट भारतीय पॅनोरमा विभागातील कथाबाह्य चित्रपटांच्या श्रेणीचा उद्घाटन चित्रपट ठरणार आहे.
लडाखी चित्रपट
लेखिका आणि दिग्दर्शिका लीना यादव यांचा ‘बिकमिंग’ हा 11 मिनिटांचा लडाखी लघुपट भारतीय पॅनोरमा विभागातील कथाबाह्य चित्रपटांच्या श्रेणीचा प्रारंभ करणार आहे. लडाखच्या पार्श्वभूमीवर घडणारी या चित्रपटाची कथा रिनचेन या तरुण आईची आणि तिचा मुलगा अज्ञाल याची आहे. अगदी बालपणापासूनच अज्ञालचे निसर्गाशी एक विलक्षण नाते असल्याचे दिसून येते. वयाच्या सातव्या वर्षी त्याला काही अनाकलनीय दृश्ये दिसू लागतात. प्राचीन लिकीर मठाकडे तो अनामिकपणे ओढला जातो. त्याचबरोबर त्याला पूर्वजन्मातील असल्यासारख्या काही आठवणीही येऊ लागतात. मठात पोहोचल्यानंतर एका बंद खोलीत ठेवलेली पेटी अज्ञाल ओळखतो. त्या पेटीतील वस्तू पाहिल्यानंतर तो एका प्रतिष्ठित रिनपोचे यांचा पुनर्जन्म असल्याचा विश्वास मठातील भिक्षूंना वाटू लागतो. अज्ञालचा आध्यात्मिक प्रवास सुरू होत असताना पुनर्जन्म, नियती आणि भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ यांच्यातील नातेसंबंधांचा वेध हा चित्रपट घेतो. या चित्रपटात रिनचेन आंग्मो आणि त्सेरिंग वांगगेल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. लीना यादव या पुरस्कारप्राप्त लेखिका, दिग्दर्शिका आणि निर्मात्या असून ‘पर्च्ड’, ‘राजमा चावल’ आणि ‘हाऊस ऑफ सीक्रेट्स’ या त्यांच्या उल्लेखनीय कलाकृती आहेत. तसेच ऑस्करसाठी नामांकन मिळालेल्या ‘टेल इट लाइक अ वुमन’ या चित्रपटाशीही त्या संबंधित आहेत.

Still from Becoming
साहिल शाह दिग्दर्शित ‘बर्ड्स ऑन आइस’ हा 85 मिनिटांचा लडाखी चित्रपट भारतीय पॅनोरमा विभागातील कथापटांच्या स्पर्धात्मक निवडीसह, दिग्दर्शकाच्या पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट या श्रेणीतही निवडला गेला आहे. लडाखमधील ताशी ही चिमुरडी आपल्या मेंढपाळ आई-वडिलांच्या परतण्याची वाट पाहत आजोबांसोबत राहते. एक दिवस तिला उधार घेतलेली आईस हॉकीच्या स्केट्सची जोडी मिळते आणि तिच्या मनात एक नवे स्वप्न आकार घेऊ लागते. हिमालयातील कडाक्याच्या थंडीत मोठे होताना तिला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. या प्रवासात कुटुंबातील नाती, दुःख आणि प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याचा संघर्ष याविषयीची कठोर वास्तवता तिच्यासमोर येते. मात्र, आपले स्वप्न सोडून न देण्याचा निर्धार केलेली ताशी आणि तिची जिवलग मैत्रीण ते साकार करण्यासाठी स्वतःच मार्ग शोधतात. या चित्रपटात ताशीची भूमिका सेमझांग स्किटडॉन यांनी साकारली आहे. त्यांच्यासोबत एन. चोपल, कुंगा चोस्क्याब, पद्मा चोरोल आणि सोनम स्टोबगाइस हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांत आहेत. शान पसरीचा यांनी या चित्रपटाचे लेखन केले असून, केमिओ फिल्म्सने त्याची निर्मिती केली आहे. लडाखमधील आईस हॉकी समुदायाच्या जीवनानुभवातून साकारलेला हा साहिल शाह यांचा पहिलाच पूर्ण लांबीचा चित्रपट आहे.

Still from Birds on Ice
काश्मिरी चित्रपट
राजा शबीर मोहम्मद खान दिग्दर्शित ‘स्लेज’ हा 75 मिनिटांचा काश्मिरी कथापट इफ्फी 2026 मध्ये आशिया प्रीमियरसाठी निवडला गेला आहे. भारतीय पॅनोरमा विभागात समाविष्ट झालेला हा चित्रपट भारतीय कथापटातील पदार्पण करणाऱ्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्कारासाठीही स्पर्धेत आहे. गुलमर्गजवळच्या बर्फाच्छादित गावात अलीची लाकडी स्लेज (बर्फावरून घसरत जाणारी गाडी) हेच त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. काही दिवसांसाठी अली घराबाहेर गेल्यानंतर त्याची तीन मुले हाझिक, ईशेल आणि रैमा यांच्यावर घराची जबाबदारी येते. मात्र, त्यांना मिळालेल्या या स्वातंत्र्याची पूर्ण जाणीव त्यांना नसते. खेळता खेळता त्यांच्याकडून चुकून स्लेज मोडते. वडील परतण्यापूर्वी ती दुरुस्त करण्यासाठी पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात ही मुले गुलमर्गच्या पर्यटनविश्वात पाऊल ठेवतात. तिथे पैसे कमावण्याचा प्रयत्न करताना त्यांना नकार आणि अपमानाचे मूक अनुभव सहन करावे लागतात. अशातच त्यांना पैसे आणि चॉकलेट्सने भरलेली एक हरवलेली बॅग सापडते. त्यामुळे स्लेज दुरुस्त करण्याचा मार्ग सापडल्याचे त्यांना वाटते. मात्र, त्या बॅगेतील वस्तू स्वतःसाठी वापरण्याचा मोह आणि त्यांच्या मनात जागी होणारी सद्सद्विवेकबुद्धी यांच्यात संघर्ष सुरू होतो. राजा खान हे सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्या ‘शेपर्ड्स ऑफ पॅराडाइज’ या माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. रायहाना प्रॉडक्शन्सने या चित्रपटाची निर्मिती केली असून, हाझिक मोहम्मद खान, ईशेल खान आणि रैमा खान यांच्या त्यात प्रमुख भूमिका आहेत.

Still from Sledge
भारतीय पॅनोरमा विभागातील कथाबाह्य चित्रपटांच्या श्रेणीत ‘नक्श-ए-दौर’ या 12 मिनिटांच्या काश्मिरी माहितीपटाची निवड झाली आहे. बाबा तसद्दुक हुसेन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि छायाचित्रण केले आहे. श्रीनगरच्या जुन्या भागातील गल्ल्यांमध्ये गुलाम नबी दार आजही काश्मीरच्या पारंपरिक अक्रोडाच्या लाकडावरील कोरीवकामाची कला जपत आहेत. गेल्या सहा दशकांहून अधिक काळ ते या कलेचा सराव करत आहेत. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असलेले दार आपल्या कलाकृतींमधून काश्मीरचा इतिहास आणि संस्कृती प्रतिबिंबित करणारी नाजूक आणि कलात्मक नक्षीकामे साकारतात. त्यांचे जीवन आणि कलाप्रवास उलगडणारा हा माहितीपट, बदलत्या काळातही ही पारंपरिक कला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी घेतलेला ध्यास अधोरेखित करतो. या कलेचा वारसा पुढे चालवणाऱ्यांची संख्या कमी होत असतानाही दार ही कला जोपासण्यासोबतच तिचे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहेत. त्यांच्या या प्रयत्नांतून काश्मीरमधील लाकडावरील कोरीवकामाची परंपरा अखंडितपणे पुढे सुरू राहण्याची आशा व्यक्त होते. बीबीपी स्टुडिओ व्हर्च्युअल भारत प्रायव्हेट लिमिटेडने या माहितीपटाची निर्मिती केली असून, त्याची कथा भारतबाला यांची आहे.

Still from Naqsh-e-Daur
* * *
पीआयबी मुंबई | नितीन फुल्लुके/राज दळेकर/दर्शना राणे