पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एकता नगर, गुजरात येथे ‘भारत पर्व 2026’ च्या माध्यमातून भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि विविधतेचे दर्शन

Posted On: 11 NOV 2026 5:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 नोव्‍हेंबर 2026

 

भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने गुजरात पर्यटन विभागाच्या सहकार्याने आणि विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या सहभागातून आयोजित केलेले ‘भारत पर्व 2026’ गुजरातमधील एकता नगर येथे सुरू आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेतून देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, विविध परंपरा आणि सांस्कृतिक वैविध्य या महोत्सवातून सादर केले जात आहे. राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून 30 ऑक्टोबर 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. हा महोत्सव 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत सुरू राहणार आहे.

देशभरातील पारंपरिक कला, हस्तकला, प्रादेशिक खाद्यसंस्कृती, लोकपरंपरा, संगीत, नृत्य आणि स्थानिक कारागिरी यांचा या महोत्सवात समावेश आहे. एकाच ठिकाणी भारताच्या विविध प्रांतांच्या संस्कृतीचा अनुभव घेण्याची संधी यामुळे पर्यटकांना मिळत आहे.

  

या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या ‘थीम पॅव्हेलियन’मध्ये 29 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसह ‘इन्क्रेडिबल इंडिया’ आणि केंद्रीय कुटीर उद्योगांचा सहभाग आहे. येथे ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ (ODOP) उपक्रमांतर्गत 100 हून अधिक उत्पादनांसह पारंपरिक हस्तकला, वस्त्रे, चित्रकला, कृषी उत्पादने आणि विविध प्रदेशांची वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने प्रदर्शित करण्यात आली आहेत. यातून भारतातील विविध भागांची कलात्मक गुणवत्ता आणि सांस्कृतिक ओळख अधोरेखित होत आहे.

‘एक जिल्हा, एक उत्पादन’ (ODOP) उपक्रमांतर्गत मांडण्यात आलेली दालने हे महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरत आहेत. सहभागी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपापल्या भागातील वैशिष्ट्यपूर्ण कौशल्य, पारंपरिक कारागिरी आणि स्थानिक उत्पादनांचे प्रदर्शन केले आहे. कलाकुसरीने तयार केलेली वस्त्रे, हातमागावरील उत्पादने, पारंपरिक चित्रकला, हस्तकला आणि विशिष्ट प्रदेशांतील कृषी उत्पादनांचा त्यात समावेश आहे. या प्रदर्शनातून भारतातील विविध स्थानिक उत्पादने आणि हस्तकलेच्या परंपरांची ओळख पर्यटकांना होत आहे. स्थानिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देत, प्रादेशिक कारागिरीला अधिक प्रसिद्धी मिळवून देणे, पारंपरिक कौशल्यांचे जतन आणि प्रोत्साहन करणे तसेच स्थानिक कारागीर व हस्तकलाकारांच्या उत्पादनांविषयी जनजागृती वाढविणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

   

पारंपरिक कारागिरांची थेट प्रात्यक्षिके हे याचे आणखी एक प्रमुख आकर्षण आहे, ज्यामुळे पर्यटकांना भारतातील स्वदेशी हस्तकला कारागिरांची कला प्रत्यक्ष पहाण्याची संधी मिळते.यामध्ये आसाममधील पारंपरिक मुखवटे बनवण्याची कला, बिहारमधील मधुबनी चित्रकला आणि सिक्की हस्तकला, गुजरातमधील रोगन कला आणि पारंपरिक चित्रकला, छत्तीसगडमधील बांबू कला, केरळमधील काथ्याच्या वस्तू बनवणे, ओडिशामधील पट्टाचित्र चित्रकला आणि चांदीचे तारकाम, उत्तराखंडमधील ऐपन चित्रकला आणि रिंगाल टोपल्या विणकाम, आणि जम्मू आणि काश्मीरमधील सोझनी कला यांचा समावेश आहे.ही प्रात्यक्षिके कारागिरांना त्यांची कौशल्ये दाखवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देतात आणि अभ्यागतांना पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पारंपरिक कला प्रकार, तंत्रज्ञान आणि स्थानिक ज्ञानाच्या प्रणालींची ओळख करून देतात.

Picture 4   

या महोत्सवात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील विविध लोककला आणि अभिजात  परंपरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आकर्षक आविष्कार देखील सादर केले जातात.

23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रादेशिक खाद्यसंस्कृती आणि पारंपरिक खाद्यपदार्थ सादर करणारे 'फूड कोर्ट' हे याचे आणखी एक प्रमुख आकर्षण आहे, जे अभ्यागतांना भारताच्या विविध खाद्य परंपरांचा आस्वाद घेण्याची संधी देते. फूड कोर्टमध्ये दररोज सायंकाळी 5:00 ते रात्री8:00 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते, ज्यात दररोज 10 राज्यांमधील कलाकार प्रादेशिक खाद्यसंस्कृती, संगीत आणि नृत्याचा एका उत्साही वातावरणात संगम साधतात.

   Picture 5

भारताच्या सांस्कृतिक विविधतेचा उत्सव साजरा करण्यासह, ‘भारत पर्व’ प्रादेशिक उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी, स्वदेशी कला प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पारंपरिक कारागीर, हस्तकलाकार व कलाकारांना देशाच्या विविध भागांतील प्रेक्षकांच्या जवळ आणण्यासाठी एक सामायिक व्यासपीठ उपलब्ध करून देते. विविध प्रदेशांची वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक ओळख दर्शविण्यात स्थानिक परंपरा, हस्तकला आणि खाद्यसंस्कृतीच्या भूमिकेवरही प्रकाश टाकणारा,हा महोत्सव पर्यटनाचा अनुभव समृद्ध करतो.

भारत पर्व 2026, सांस्कृतिक आदान-प्रदान, राष्ट्रीय एकात्मतेला चालना देऊन आणि भारताच्या विविधतेतील एकतेचा उत्सव साजरा करून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेला अधिक दृढ करत आहे. हा महोत्सव गुजरातच्या एकता नगर येथे 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत पर्यटकांसाठी खुला राहील.

 

* * *

सुषमा काणे/वैभवी जोशी/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2335436) अभ्यागत कक्ष : 3