Posted On:
05 NOV 2026 2:30PM by PIB Mumbai
भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे आयोजित नवीकरणीय ऊर्जा शिखर परिषद आणि प्रदर्शन 2026 मध्ये रेल्वे मंत्रालयाला प्रतिष्ठेचा पीएम सूर्य घर उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत ‘केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमध्ये सर्वाधिक इमारतींवर सौरऊर्जा यंत्रणा बसवणे’ या श्रेणीत रेल्वे मंत्रालयाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. सार्वजनिक संस्थांमध्ये नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने मंत्रालयाने देशासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
देशभरातल्या 15,868 रेल्वे इमारती सौरऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी योग्य असल्याचे मंत्रालयाने निश्चित केले आहे. त्यापैकी आतापर्यंत 12,495 इमारतींवर, म्हणजेच एकूण निश्चित केलेल्या इमारतींपैकी 79 टक्के इमारतींवर, सौरऊर्जा यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. तसेच 424 मेगावॅटच्या उद्दिष्टापैकी 351 मेगावॅट क्षमतेची छतावरील सौरऊर्जा निर्मिती व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्तरावर 77 केंद्रीय मंत्रालये आणि विभागांनी निश्चित केलेल्या एकूण 39,135 इमारतींपैकी आतापर्यंत 25,984 इमारतींवर सौरऊर्जा यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. हे प्रमाण एकूण निश्चित केलेल्या इमारतींच्या 66 टक्के आहे. या देशव्यापी यशात रेल्वे मंत्रालयाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
मार्च 2027 पर्यंत उर्वरित सर्व पात्र इमारतींवर सौरऊर्जा यंत्रणा बसवण्याचे रेल्वे मंत्रालयाचे लक्ष्य आहे. स्वच्छ, ऊर्जा कार्यक्षम आणि शाश्वत भविष्याच्या दिशेने भारताची वाटचाल अधिक मजबूत करण्यासाठी मंत्रालय प्रयत्नशील आहे.
***
Nitin Fulluke / Nikhilesh Chitre / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai