श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकारने कामगार संहितेअंतर्गत असंघटित कामगार आणि गिग तसेच प्लॅटफॉर्म कामगारांसाठी राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळाच्या स्थापनेची अधिसूचना जारी केली

Posted On: 30 OCT 2026 10:29AM by PIB Mumbai

भारतातील लाखो असंघटित मनुष्यबळाला सर्वसमावेशक सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूने एक ऐतिहासिक पाऊल उचलत श्रम आणि रोजगार मंत्रालयाने असंघटित कामगार तसेच गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी अधिकृतपणे राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळाच्या स्थापनेची अधिसूचना जारी केली आहे. सामाजिक सुरक्षा संहितेच्या वैधानिक चौकटींतर्गत स्थापन करण्यात आलेली ही मंडळे डिजिटल गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना भारताच्या औपचारिक कल्याणकारी संरचनेत समाविष्ट करून एक ऐतिहासिक बदल घडवून आणत आहेत.

केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री या मंडळाच्या अध्यक्षस्थानी असतील तसेच त्यात केंद्र आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी, प्रमुख अ‍ॅप-आधारित कंपन्या (Aggregators), मालक, नागरी संस्था, कामगार संघटना आणि गिग आणि प्लॅटफॉर्म कामगार संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल.  गिग व प्लॅटफॉर्म कामगार आणि पारंपरिक असंघटित कामगार यांच्यातील सामाजिक सुरक्षेची दरी भरुन काढण्याच्या उद्देशाने लक्ष्यित कल्याणकारी योजनांची आखणी, त्यांचे निरीक्षण आणि शिफारस करणे हे मंडळांना अनिवार्य आहे.

राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळांची बैठक वर्षातून किमान तीनदा होईल आणि प्रत्येक बैठकीत कामकाज हाताळण्याबाबत, केंद्र सरकारने विहित केलेल्या कार्यपद्धतीच्या नियमांचे पालन केले जाईल.

राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळांचे कामकाज खालील प्रमाणे असेल:

(a) असंघटित कामगार, गिग कामगार आणि प्लॅटफॉर्म कामगारांच्या विविध गटांसाठी योग्य योजनांच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारला शिफारस करणे.

(b) या संहितेच्या प्रशासनातून उद्भवणाऱ्या आणि मंडळाकडे सोपवल्या जाणाऱ्या अशा सर्व बाबींवर केंद्र सरकारला सल्ला देणे;

(c)  केंद्र सरकारद्वारे प्रशासित असंघटित कामगार, गिग कामगार आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी सामाजिक कल्याणकारी योजनांवर लक्ष ठेवणे.

(d)   राज्य स्तरावर केल्या जाणाऱ्या अभिलेख जतन कार्यांचे पुनरावलोकन करणे

(e) निधी आणि खात्यांमधून होणाऱ्या खर्चाचा आढावा घेणे; आणि

(f) केंद्र सरकारकडून वेळोवेळी सोपवली जाणारी इतर कार्ये पार पाडणे.

 ***

Ashish Sangle / Bhakti Sontakke / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2330349) अभ्यागत कक्ष : 19