Posted On:
28 OCT 2026 7:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2026
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या, आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत (एडीएमएम –प्लस) सहभागी होण्यासाठी फिलिपाईन्स इथे गेले असून, त्यांनी आज म्हणजेच 28 ऑक्टोबर, 2026 रोजी, सेबू इथे, अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेट यांची भेट घेतली. या बैठकीत, दोन्ही देशांना भारत- अमेरिका यांच्यातील महत्वाच्या संरक्षण भागीदारीचा आढावा घेण्याची संधी मिळाली. सध्याच्या सहकार्याचा विचार करत दोन्ही बाजूंनी, त्यांच्या पायाभूत सुरक्षा व्यवस्थांच्या प्रगतीची नोंद घेतली. तसेच, प्रत्यक्ष सज्जता, तंत्रज्ञानाचे आदानप्रदान आणि संरक्षण उद्योग एकात्मिकरण यात आणखी नवे मार्ग शोधण्यावरही त्यांनी विचार केला.
या चर्चेत, प्रादेशिक सुरक्षेचा आढावाही महत्वाचा मुद्दा ठरला. यावेळी दोन्ही देशांनी दहशतवादाचा जागतिक धोका समूळ नष्ट करण्याचा आपला सामायिक निर्धार व्यक्त केला. दहशतवादी संघटनांना पाठिंबा देणाऱ्या, प्रशिक्षण देणाऱ्या किंवा त्यांना आर्थिक मदत पुरवणाऱ्या देशांविषयी जागतिक समुदायाने कोणतीही तडजोड न करता, शून्य सहिष्णूतेचे धोरण कायम ठेवले पाहिजे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.
सीमापार दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढ्याला अमेरिकेचा पाठिंबा आणि पूर्ण सहकार्य असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेट यांनी यावेळी केला. तर अमेरिकेकडून सातत्याने मिळत असलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी भारताच्या वतीने मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी दोन्ही नेत्यांनी, भारत-अमेरिका यांच्यातील दहा वर्षांसाठीच्या, संरक्षण आराखड्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. भारत- अमेरिका संरक्षण संबंध धोरणात्मक पातळीपर्यंत उंचावण्याची कटिबद्धता यावेळी दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली. संरक्षण उद्योग क्षेत्रातील सध्याचे सहकार्य अधिक दृढ आणि व्यापक करण्यासाठी लष्करांदरम्यान परस्पर देवाणघेवाण वाढवणे, सागरी सुरक्षा सहकार्य अधिक बळकट करणे आणि संरक्षण पुरवठा साखळ्यांचे एकत्रीकरण करणे, या मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा झाली.
या बैठकीनंतर ‘एक्स’ या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील भक्कम भागीदारी, मुक्त, खुल्या आणि सुरक्षित हिंद-प्रशांत क्षेत्राचा आधारस्तंभ आहे, असे म्हटले आहे.
* * *
निलिमा चितळे/राधिका अघोर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai