पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मध्यप्रदेश मध्ये बंदुकीच्या छऱ्यांमुळे झालेल्या चित्त्याच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने एक उच्च स्तरीय समिती स्थापन केली

Posted On: 28 OCT 2026 7:52AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑक्‍टोबर 2026 

 

मध्य प्रदेश मधील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात बंदुकीच्या छऱ्यांमुळे झालेल्या एका 19 महिन्याच्या नर चित्त्याच्या (KNG22) मृत्यूची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेला अत्यंत गांभीर्याने घेत केंद्र सरकरने या प्रकरणाची प्रत्यक्ष चौकशी करण्यासाठी एक उच्च स्तरीय समिती स्थापन केली आहे. प्रोजेक्ट चित्ता देशासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून भारतात नव्याने पुनर्वसन करण्यात आलेल्या या मोठ्या मांजरीच्या (चित्त्यांच्या) लोकसंख्येला सर्वोच्च दर्जाचे संरक्षण सुनिश्चित करण्याची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.

या केंद्रीय पथकामध्ये राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) चे वन महानिरीक्षक, वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो (WCCB) चे अतिरिक्त संचालक आणि प्रादेशिक उपसंचालक यांचा समावेश आहे. या पथकाकडे चित्त्याच्या मृत्यूमागील नेमक्या परिस्थितीचा अत्यंत बारकाईने तपास करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असून या प्रकरणात अत्यंत कठोर आणि जलद कारवाई करण्याच्या दृष्टीने हे पथक सर्व उपलब्ध पुराव्यांचे परीक्षण करेल आणि मध्य प्रदेशच्या वनविभागाशी समन्वय साधून पुढील तपास करेल.

'निर्वा' या मादी चित्त्याचा  हा नर बछडा (KNG22) 25 ऑक्टोबर 2026 रोजी कूनो राष्ट्रीय अभयारण्याच्या संरक्षित क्षेत्राबाहेर, मुरैना वनक्षेत्रात जखमी अवस्थेत आढळला होता. मध्य प्रदेश वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार चित्त्याला वाचवण्यासाठी त्याच दिवशी त्याला जबलपूर येथील पशुवैद्यकीय केंद्रात हलवून अतिदक्षता उपचार देण्यात आले तसेच त्याच्यावर तातडीने आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी त्याच्या शरीरातून 5 धातूचे छर्रे  बाहेर काढले.  डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही 27 ऑक्टोबर 2026 रोजी या चित्त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. छऱ्यांमुळे चित्त्याच्या  अंतर्गत अवयवांना जखमा झाल्याचे वैद्यकीय तपासणीअंती निष्पन्न झाले.

या घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने आधीच एका विशेष कृती दलाची स्थापना केली असून यामध्ये वन आणि पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे केंद्रीय पथक राज्य सरकारच्या  यंत्रणे सोबत समन्वय साधून कार्य करेल. भविष्यात अशा घटना घडू नयेत या दृष्टीने हे पथक सुरक्षा मानकांची अंमलबजावणी तसेच देखरेख आणि सुरक्षाविषयक उपाययोजनांचा आढावा घेईल.  केंद्रीय पथक आपले निष्कर्ष आणि शिफारसी मंत्रालयाकडे सादर करेल, ज्याद्वारे राज्य सरकार आणि क्षेत्रीय प्राधिकरणांना पुढील सूचना दिल्या जातील.

 

* * *

आशिष सांगळे/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2329439) अभ्यागत कक्ष : 17