Posted On:
24 OCT 2026 10:47AM by PIB Mumbai
रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने आयोजित शासकीय रेल्वे पोलीस दलाच्या प्रमुखांची 8 वी अखिल भारतीय परिषद 23 ऑक्टोबर 2026 रोजी नवी दिल्लीत यशस्वीरीत्या पार पडली. या परिषदेत सुरक्षेसमोरील उदयोन्मुख आव्हानांवर चर्चा करण्यात आली, उत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण करण्यात आली, तसेच आरपीएफ, जीआरपी आणि राज्य पोलीस दलांमधील समन्वय अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला.
आरपीएफच्या महासंचालक सोनाली मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय परिषद झाली. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार, रेल्वे मंडळाचे सदस्य, तसेच विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील जीआरपी प्रमुख या परिषदेला उपस्थित होते.

रेल्वे माहिती प्रणाली केंद्राने जीआरपी कर्मचाऱ्यांचा रेलमदत मंचावर समावेश करणे हे या परिषदेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले. प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण, वेळेवर माहितीची देवाणघेवाण आणि तक्रारींवर देखरेख ठेवणे अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने हा समावेश करण्यात आला.
रेल्वे सुरक्षा आणि प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
दक्षिण मध्य रेल्वेच्या पिंक पेट्रोल : ( आइज इन द स्काय, शक्ती ऑन द ग्राउंड)- आकाशातून नजर, जमिनीवर शक्ती या उपक्रमातून महिलांच्या नेतृत्वाखालील सुरक्षा व्यवस्थेचे उदाहरण सादर करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ड्रोनच्या मदतीने देखरेख ठेवणे आणि शक्ती या आराखड्याअंतर्गत त्वरित प्रतिसाद देणाऱ्या पथकांचा समावेश करण्यात आला आहे.
रेल्वे गाड्यांवर दगडफेक होणे हे एक आव्हान असल्याचे या परिषदेत नमूद करण्यात आले. दगडफेकीच्या घटना घडणाऱ्या संवेदनशील ठिकाणी गस्त वाढवणे, देखरेख अधिक कडक करणे, दोषींवर कठोर कारवाई करणे, तरुणांशी संवाद साधणे आणि आरपीएफ व जीआरपी यांच्यातील समन्वय अधिक बळकट करणे यावर भर देण्यात आला. दगडफेकीच्या घटना रोखण्यासाठी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणे महत्त्वाचे असल्याचेही नमूद करण्यात आले.
दिवाळी, छठ आणि इतर सणांच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन करण्याबाबतही या परिषदेत चर्चा करण्यात आली. दिल्ली पोलीस, जीआरपी आणि दिल्ली मेट्रो प्रशासनाच्या समन्वयातून राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागाने दिली. या उपाययोजनांमध्ये सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख, सार्वजनिक उद्घोषणा, बॅरिकेडिंग, प्रवाशांना थांबण्यासाठी निश्चित केलेल्या जागा आणि स्वतंत्र नियंत्रण कक्ष यांचा समावेश आहे. सणांच्या गर्दीच्या काळात प्रवाशांची सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी पूर्वनियोजन, प्रवाशांच्या वर्दळीचे कार्यक्षम व्यवस्थापन आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची समन्वयाने नियुक्ती यावर भर देण्यात आला.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने प्रोजेक्ट दिशा (सुरक्षा, सलोखा आणि जनजागृतीसाठी समर्पित उपक्रम) या उपक्रमाची माहिती दिली. रेल्वे रुळांजवळ राहणाऱ्या मुलांना शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे, त्यांच्यासाठी सुरक्षा जनजागृती सत्रे आयोजित करणे आणि समुदायाच्या सहभागातून विविध उपक्रम राबवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. स्वयंसेवी संस्था, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि स्थानिक समुदाय यांच्या सहकार्याने रेल्वे सुरक्षेबाबत आणि जबाबदार वर्तनाबाबत जनजागृती केली जाते. तसेच, रेल्वे गाड्यांवर दगडफेक करणे, चोरी करणे, रेल्वे रुळांवर अनधिकृतपणे प्रवेश करणे आणि इतर असुरक्षित कृतींना आळा घालण्याचा प्रयत्न केला जातो.
आरपीएफ आणि जीआरपी यांच्या संयुक्त प्रशिक्षणावर, घातपात रोखण्यावर तसेच अमली पदार्थ आढळल्यास त्यासंबंधीची माहिती तातडीने एकमेकांना देण्यावरही चर्चा करण्यात आली. डिजिटल पुराव्यांचे व्यवस्थापन, प्रमाणित कार्यपद्धती, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण, तपासाची क्षमता वाढवणे आणि आवश्यक पायाभूत सुविधा बळकट करणे यावर भर देण्यात आला.
भारतीय रेल्वेसमोरील बदलती सुरक्षा आव्हाने प्रभावीपणे हाताळण्यासाठी रेल्वे प्रशासन, आरपीएफ, जीआरपी आणि राज्य पोलीस दलांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, नवकल्पना आणि सामूहिक कटिबद्धता महत्त्वाची असल्याचे रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवाशांचा विश्वास वाढवणे, पोलिसांनी सौजन्यपूर्ण आणि व्यावसायिक पद्धतीने काम करणे, तसेच उत्पादकता आणि कामकाजातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा वापर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
रेल्वे सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी गुप्तचर माहितीच्या आधारे पोलीस कार्यवाही करण्याची गरज आरपीएफच्या महासंचालकांनी समारोपाच्या भाषणात अधोरेखित केली.
***
आशिष सांगळे/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com