Posted On:
22 OCT 2026 5:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये चिन्मय अमृत महोत्सव जागतिक संमेलनाचे उद्घाटन करतील. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.
23 ते 25 ऑक्टोबर 2026 दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या या तीन दिवसीय संमेलनात भारत आणि परदेशातील 9,000 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. चिन्मय मिशनच्या 75 वर्षांच्या पूर्ततेनिमित्त वर्षभर सुरू असलेल्या उत्सवांचा हा समारोप आहे. स्वामी चिन्मयानंद यांनी 1951 मध्ये स्थापन केलेले चिन्मय मिशन ही एक जागतिक आध्यात्मिक चळवळ आहे, ज्याचा उद्देश वेदांत आणि भगवद्गीतेचे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवणे हा आहे. गेल्या अनेक दशकांत, या मिशनने आध्यात्मिक शिक्षण, सांस्कृतिक जतन, युवक सक्षमीकरण आणि समाजसेवा या क्षेत्रांत आपले कार्य विस्तारले आहे.
या वर्षभर चालणाऱ्या उत्सवांची सुरुवात गेल्या वर्षी झाली होती, जेव्हा तामिळनाडूतील गंगईकोंडा चोलपुरम येथे पंतप्रधानांच्या हस्ते भगवद्गीतेच्या तमिळ काव्यानुवादाचे प्रकाशन करण्यात आले होते. चिन्मय मिशनद्वारे तयार केलेल्या या अनुवादाला इलय्याराजा यांनी संगीत दिले आहे. वर्षभरात अनेक उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते; ज्यामध्ये विविध ठिकाणी सामूहिक हवन, त्रिपुरामध्ये माँ सौंदर्य चिन्मयी मंदिराची प्राणप्रतिष्ठा आणि 'चिन्मय गीता समर्पणम'सारख्या उपक्रमांचा समावेश होता. चिन्मय गीता समर्पणम अंतर्गत जगभरातील 1 लाखांहून अधिक लोकांनी ऑनलाइन एकत्र येऊन भगवद्गीतेच्या 15 व्या अध्यायाचे पठण केले होते. या उत्सवांचा एक प्रमुख उपक्रम म्हणजे गीता पंचामृत, जो भगवद्गीतेतील पाच निवडक श्लोकांवर आधारित होता. गीतेचा संदेश देशभर पोहोचवण्यासाठी चिन्मय युवा केंद्राच्या 15 तरुण सदस्यांनी चिन्मय अमृत यात्रा काढली, ज्याद्वारे त्यांनी संपूर्ण देशात 40,000 किमीहून अधिक प्रवास केला.
* * *
सुषमा काणे/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai