राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते 65 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शन पुरस्कार सोहळ्यात निवडक कलाकारांना ललित कला अकादमी पुरस्कार प्रदान
नवीन आणि उदयोन्मुख कलाकारांना त्यांची प्रतिभाशक्ती विकसित करण्यासाठी, नवीन माध्यमांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्या सर्जनशील क्षमतांचा विस्तार करण्यासाठी अमाप संधी प्रदान करुया: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु
Posted On:
21 OCT 2026 3:08PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी नवी दिल्ली येथे आज (21 ऑक्टोबर 2026) 65 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शन पुरस्कार सोहळ्यात निवडक कलाकारांना ललित कला अकादमी पुरस्कार प्रदान केले. याशिवाय त्यांच्या हस्ते प्रिंट बिएनाले इंडिया 2026 मधील ग्रँड प्राइज विजेते आणि सन्माननीय उल्लेख प्राप्त कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

हा पुरस्कार वितरण सोहळा म्हणजे भारताचा कलात्मक वारसा, सांस्कृतिक वैविध्य आणि समकालीन सर्जनशीलता यांचा सोहळा असल्याचे राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या. या सोहळ्याच्या माध्यमातून आपण भारताच्या विविध कलांची समृद्ध परंपरा, सर्जनशील ऊर्जा आणि सतत बदलणारी कलात्मक अभिव्यक्तीची यांचा गौरव करत आहोत, असे त्यांनी सांगितले.

कला ही केवळ कॅनव्हासवरील चित्रे, दगडातून कोरलेली शिल्पे किंवा विविध माध्यमांतून साकारलेल्या कलाकृतींपुरती मर्यादित नसते. कला ही आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. ती आपल्या स्मृती, वर्तमानातील अनुभव आणि भविष्याविषयीच्या आकांक्षा यांचे दर्शन घडवते. कला आपल्याला आपल्या काळाकडे आणि समाजाकडे एका नवीन दृष्टिकोनातून पाहण्यास आणि समजून घेण्यास सक्षम करते,असे राष्ट्रपती म्हणाल्या. दुर्गम भागांतील पारंपरिक कलाकारांना नवीन तंत्रज्ञानाचे आणि समकालीन कला तंत्रांचे प्रशिक्षण देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. यामुळे या कलाकारांना आपली कलाकौशल्ये प्रदर्शित करण्यासाठी आणि व्यापक स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी संधी उपलब्ध होतील, असे त्या म्हणाल्या.

सध्याच्या युगात कलाकारांना केवळ सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या संधी उपलब्ध करुन देणे पुरेसे नाही तर त्यांना आर्थिक सहाय्य, व्यापक बाजारपेठेत पोहोच आणि कला संग्राहकांशी संपर्क प्रस्थापित करण्याच्या संधींचीही आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. ललित कला अकादमी आणि सांस्कृतिक मंत्रालय कलाकृतींच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
कलाकृती या केवळ कला दालनांपुरत्या मर्यादित असता कामा नयेत, तर त्या शाळा, विद्यापीठे, सार्वजनिक स्थळे आणि समाजाच्या व्यापक स्तरापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. नवीन आणि उदयोन्मुख कलाकारांना त्यांची प्रतिभाशक्ती विकसित करण्यासाठी, नवीन माध्यमांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्या सर्जनशील क्षमतांचा विस्तार करण्यासाठी अमाप संधी प्रदान करण्याचे आवाहन त्यांनी सर्व संबंधितांना केले.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
***
Nilima Chitale /Madhuri Pange / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2326160)
अभ्यागत कक्ष : 18