अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील कारवाई तीव्र करत डीआरआयने सात किलोहून अधिक ॲम्फेटामाइन आणि तीन किलो कोकेन केले जप्त; तिघांना अटक


बंगळुरू आणि दिल्ली विमानतळांवर तसेच नागपूरजवळ गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत प्रवासी सामानात लपवून प्रतिबंधित वस्तूंची तस्करी करण्याचे प्रयत्न लावले उधळून

Posted On: 19 OCT 2026 7:19PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑक्‍टोबर 2026

 

महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) समन्वित, गुप्त माहितीवर आधारित मोहिमांच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. या कारवाईत दोन मोहिमांमध्ये सुमारे 7.1 किलो ॲम्फेटामाइन आणि तिसऱ्या मोहिमेत सुमारे 3.1 किलो कोकेन जप्त करण्यात आले असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूरजवळ आणि नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आयजीआय) येथे करण्यात आली.

विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत डीआरआय अधिकाऱ्यांनी 14 ऑक्टोबर 2026 रोजी दिल्लीहून बंगळूरु येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाला अडवले. प्रवाशाच्या सामानाची तपासणी केली असता 5.166 किलो ॲम्फेटामाइन सापडले. एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार हा पदार्थ जप्त करण्यात आला आणि प्रवाशाला अटक करण्यात आली.

दोन दिवसांनंतर आणखी एका गुप्त माहितीवर आधारित कारवाईत डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी नागपूरजवळ सावनेरमधील खापा फाटा इथे दिल्लीहून हैदराबादला बसने प्रवास करणाऱ्या एका भारतीय नागरिकाला अडवले. त्याच्या बॅकपॅकची तपासणी केली असता महिलांच्या नव्या पोशाखात लपवलेला एक पांढरा स्फटिकासारखा पदार्थ आढळून आला.

बॅकपॅक नेहमीपेक्षा जास्त जड वाटल्याने‌ अधिकाऱ्यांनी त्याच्या आतील अस्तराची तपासणी केली असता त्यांना तशाच प्रकारचा पदार्थ असलेले आणखी एक लपवलेले पाकीट सापडले. जागेवरच केलेल्या चाचणीत तो पदार्थ ॲम्फेटामाइन असल्याचे निष्पन्न झाले. एनडीपीएस कायदा, 1985 अन्वये एकूण 1.97 किलो ॲम्फेटामाइन जप्त करण्यात आले. प्रवाशाला अटक करण्यात आली.

दिनांक 15/16.10.26 रोजी एका स्वतंत्र कारवाईत विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे डीआरआय अधिकाऱ्यांनी घानाहून नवी दिल्ली येथील आय.जी.आय. विमानतळाच्या टर्मिनल 3 वर आलेल्या एका भारतीय प्रवाशाला अडवले. त्याच्या सामानाची पद्धतशीर तपासणी केली असता त्यात एकूण 3.134 किलो वजनाची पांढरी पावडर असलेली सहा पारदर्शक पाकिटे सापडली. जागेवरच केलेल्या चाचणीत ती कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. एन.डी.पी.एस. कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार हा पदार्थ जप्त करण्यात आला आणि प्रवाशाला अटक करण्यात आली.

अशी कारवाई अंमली पदार्थांच्या पुरवठा साखळ्या विस्कळीत करण्यासाठी, लपवण्याच्या कल्पक पद्धती शोधून काढण्यासाठी तसेच देशाच्या हवाई व रस्ते मार्गांवरून धोकादायक अंमली पदार्थांच्या वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी डीआरआय करत असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांवर प्रकाश टाकतात.

 

* * *

निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2325266) अभ्यागत कक्ष : 8