आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
शिशूंच्या पोषण मानकांना अधिक बळकटी देण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा पुढाकार, 6 महिन्यांपर्यंतच्या शिशूंसाठीच्या उत्पादनांमध्ये सुक्रोज आणि फ्रुक्टोजच्या वापरावर निर्बंध घालण्याचा प्रस्ताव
शिशूंच्या पोषणविषयक नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी एफएसएसएआयकडून मसुदा अधिसूचित, बाल्यावस्थेच्या सुरुवातीच्या काळात अतिरिक्त साखरेचा वापर रोखण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना करणार
पहिल्या 6 महिन्यांत शिशूंचे योग्य पोषण, निरोगी वाढ आणि विकास सुनिश्चित करण्याचा प्रस्तावित निर्बंधांचा उद्देश
या उपक्रमातून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, शिशूंचे पोषण आणि दीर्घकाळ चांगले आरोग्य राखण्यासाठी सरकारची बांधिलकी स्पष्ट
Posted On:
17 OCT 2026 4:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर 2026
शिशूंच्या पोषणविषयक सुरक्षिततेला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने अन्न सुरक्षा आणि मानक (शिशूंच्या पोषणासाठीचे अन्न) विनियम, 2020 मध्ये सुधारणा करण्यासाठी मसुदा प्रसिद्ध केला आहे. या मसुद्यात 6 महिन्यांपर्यंतच्या शिशूंसाठी असलेल्या अन्नपदार्थांमध्ये सुक्रोज आणि फ्रुक्टोज मिसळण्यास मनाई करण्यात येणार आहे.
शिशूंच्या पोषणासाठीच्या अन्नपदार्थांबाबतच्या नियमांमध्ये सुधारणा करणारा मसुदा 16 ऑक्टोबर 2026 रोजी भारताच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे. या सुधारणांमुळे सध्याचे नियम अधिक बळकट होणार आहेत. शिशूंच्या वयानुसार त्यांच्या पोषणाच्या गरजा पूर्ण करणारे अन्नपदार्थ तयार केले जावेत, याची खात्री करणे, तसेच आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात बालकांना अतिरिक्त साखरेशी कमीत कमी संपर्क यावा, यावर या मसुद्यात भर देण्यात आला आहे.
सध्याच्या नियमांनुसार, जन्मापासून ते 24 महिन्यांपर्यंतच्या बालकांसाठी असलेल्या विविध प्रकारच्या पोषण उत्पादनांमध्ये कोणते पोषक घटक किती प्रमाणात असावेत, तसेच त्यांची गुणवत्ता आणि सुरक्षितता याबाबत सविस्तर मानके निश्चित करण्यात आली आहेत. या नियमांनुसार, कर्बोदकांचा स्रोत म्हणून लॅक्टोज आणि ग्लुकोज पॉलिमर्स यांना प्राधान्य दिले जाते. मात्र, कर्बोदकांचा स्रोत म्हणून गरज असल्यास, ठरवून दिलेल्या मर्यादेत सुक्रोज आणि किंवा फ्रुक्टोज मिसळण्याची परवानगी आहे.
या तरतुदींमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी, नव्या मसुद्यात 6 महिन्यांपर्यंतच्या शिशूंसाठी असलेल्या उत्पादनांमध्ये सुक्रोज आणि फ्रुक्टोज मिसळण्यावर विशिष्ट निर्बंध घालण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावित तरतुदीनुसार, 6 महिन्यांपर्यंतच्या शिशूंसाठी असलेल्या उत्पादनांमध्ये सुक्रोज आणि फ्रुक्टोज मिसळता येणार नाही. जन्मानंतरचे पहिले सहा महिने शिशूच्या निरोगी वाढीसाठी आणि विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ असतो, त्यामुळे योग्य पोषण हे विशेष महत्त्वाचे ठरते. शिशूंच्या पोषण उत्पादनांमध्ये सुक्रोज आणि फ्रुक्टोजच्या पातळीत अनावश्यक रितीने भर न घालता, ती या वयोगटाच्या पौष्टिक गरजा पूर्ण करतील याची खात्री करणे,हा या प्रस्तावित निर्बंधाचा उद्देश आहे.या उपायाचा उद्देश, लहान वयातच अतिरिक्त साखरेचे सेवन न होता; साखरेच्या प्रमाणासंबंधित चिंता दूर करण्यासाठीच्या व्यापक सार्वजनिक आरोग्य प्रयत्नांना पाठिंबा देणे हा देखील आहे, ज्यामध्ये बालपणीचा लठ्ठपणा आणि संबंधित आरोग्य समस्यांशी निगडित आहारातील जोखमीच्या घटकांचा समावेश आहे.
हा उपक्रम, जन्मानंतर पहिल्या सहा महिन्यांत केवळ स्तनपानासच प्रोत्साहन देणाऱ्या प्रस्थापित सार्वजनिक आरोग्य शिफारशींना पूरक ठरणारा आहे.शिशूंच्या पोषण उत्पादनांसाठीचे मानक अधिक कठोर करून, प्रस्तावित सुधारणेचा उद्देश बालकांसाठी सुयोग्य आहार पद्धतींना समर्थन देणे, तसेच लहान शिशूंच्या विशिष्ट पौष्टिक गरजांना प्राधान्य देणारी सूत्रे स्वीकारण्यास उत्पादकांना प्रोत्साहित करणे हा देखील आहे.
ही प्रस्तावित नियामक उपाययोजना विज्ञानावर-आधारित अन्न मानके, जबाबदार उत्पादन निर्मिती आणि प्रतिबंधात्मक पोषण यांवर भारतीय अन्नसुरक्षा मानके प्राधिकरणाचे (FSSAI) यावर असलेले सातत्यपूर्ण लक्ष दर्शविते. बाळाच्या जन्माच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासूनच त्यांच्या आरोग्याचे रक्षण पौष्टिक अन्नपदार्थांद्वारे करणे; हा देशाच्या व्यापक सार्वजनिक आरोग्य प्राधान्यक्रमांचा एक अविभाज्य घटक आहे याचे,महत्त्वही अधोरेखित होते.
अधिसूचनेचा मसुदा सार्वजनिक विचारविनिमयासाठी प्रकाशित करण्यात आला असून, अधिसूचना असलेल्या शासकीय राजपत्राच्या प्रती जनतेसाठी उपलब्ध झाल्याच्या तारखेपासून 60 दिवसांच्या आत हितसंबंधितां कडून आक्षेप आणि सूचना मागविण्यात येत आहेत.
विहित कालावधीत प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार एफएसएसएआय (FSSAI) द्वारे सुधारणेला अंतिम रूप देण्यापूर्वी केला जाईल.
राजपत्र अधिसूचना पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे: https://egazette.gov.in/(S(3nckv5a5rxblmebm3laawlkr))/ViewPDF.aspx
* * *
शैलेश पाटील/राज दळेकर/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2324700)
अभ्यागत कक्ष : 12