उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते कारवार इथे नौदलाचे पहिले स्वदेशी बहुउद्देशीय जहाज ‘आयएनएस समर्थक’ ताफ्यात दाखल


75 टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर संरक्षण उत्पादनातील भारताच्या वाढत्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक: उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन

भारताच्या सागरी हितसंबंधांच्या संरक्षणासाठी देशाचे नौदल सदैव सतर्क आणि सज्ज: उपराष्ट्रपती

‘आयएनएस समर्थक’मधून भारताच्या खासगी जहाजबांधणी उद्योगाची वाढती भूमिका अधोरेखित: उपराष्ट्रपती

Posted On: 16 OCT 2026 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 ऑक्‍टोबर 2026

 

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज कर्नाटकातल्या कारवार इथे नौदलाचे पहिले स्वदेशी बहुउद्देशीय जहाज ‘आयएनएस समर्थक’चा नौदलात समावेश करण्यात आला. संरक्षण उत्पादनातल्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने भारताच्या वाटचालीचा आणि प्रगत स्वदेशी नौदल क्षमता विकसित करण्याच्या प्रयत्नांमधला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

75 टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर असलेले ‘आयएनएस समर्थक’ भारताच्या औद्योगिक, तांत्रिक आणि जहाजबांधणी क्षमतेचे वाढते सामर्थ्य दर्शवते, असे यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता ही आता केवळ आकांक्षा राहिलेली नसून ती प्रत्यक्षात साकार होत आहे, असे त्यांनी नमूद केले. यामुळे भारताच्या धोरणात्मक स्वायत्ततेला बळ मिळत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेलाही हातभार लागत आहे.

भारताच्या समृद्ध सागरी वारशाचा उल्लेख करताना सी. पी. राधाकृष्णन यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि चोल राजवंशाच्या नौदल परंपरांची आठवण करून दिली. या परंपरांमुळे हिंदी महासागर आणि आग्नेय आशियात भारताचा सागरी प्रभाव विस्तारला होता.

राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि सागरी हितसंबंधांचे संरक्षण करण्यात भारतीय नौदलाने दिलेल्या उल्लेखनीय सेवेचे उपराष्ट्रपतींनी कौतुक केले. हिंदी महासागर क्षेत्रात संकटाच्या वेळी सर्वप्रथम मदतीला धावून जाणारी शक्ती आणि विश्वासार्ह सुरक्षा भागीदार म्हणून नौदल बजावत असलेल्या भूमिकेचीही त्यांनी प्रशंसा केली. चाचेगिरीविरोधी मोहिमा, भारतीय नागरिकांची सुटका, तसेच मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण मोहिमांमधील नौदलाच्या योगदानाचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

‘आयएनएस समर्थक’चे महत्त्व अधोरेखित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, संवेदक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यांच्या चाचण्या व मूल्यमापनासाठी हे जहाज बहुउपयोगी व्यासपीठ म्हणून काम करेल. सागरी देखरेख आणि टेहळणी, किनारपट्टीपासून दूर असलेल्या सागरी क्षेत्रात गस्त घालणे, लक्ष्य उपकरणे सोडणे आणि पुन्हा ताब्यात घेणे, मानवरहित प्रणालींचा वापर करून मोहिमा राबवणे, तसेच मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण यांसारख्या कामांनाही या जहाजाच्या क्षमतांमुळे मदत होईल.

कारवारच्या धोरणात्मक महत्त्वाचा उल्लेख करताना सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, इथले खोल नैसर्गिक बंदर आणि अरबी समुद्राच्या समीपतेमुळे भारताच्या सागरी सुरक्षा व्यवस्थेत कारवारला महत्त्वाचे स्थान आहे.

भारताची संरक्षण उत्पादन व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी भारतीय नौदल, संरक्षण क्षेत्रातले सार्वजनिक उपक्रम, खासगी जहाजबांधणी कारखाने, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), शैक्षणिक क्षेत्र, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) तसेच नवउद्यम यांच्यातल्या वाढत्या सहकार्यावरही उपराष्ट्रपतींनी भर दिला.

 

* * *

निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2324465) अभ्यागत कक्ष : 12