आयुष मंत्रालय
आयुष क्षेत्रातल्या नवोन्मेषांच्या पेटंट अर्जांमध्ये आठपट वाढ
महाराष्ट्र आघाडीवर, 744 पेटंट अर्ज दाखल, 142 पेटंट मंजूर
Posted On:
16 OCT 2026 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2026
11 व्या आयुर्वेद दिनाच्या कार्यक्रमांदरम्यान प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘भारतात आयुष मधल्या शोध संबंधित स्थिती अहवाल 2014 ते 2026’ नुसार, भारतातल्या आयुष क्षेत्रातले नवोन्मेष आणि बौद्धिक संपदा हक्कांच्या नोंदणीमध्ये गेल्या दशकात लक्षणीय वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2014-15 ते 2025-26 या कालावधीत आयुष क्षेत्राशी संबंधित 4,077 पेटंट अर्ज दाखल करण्यात आले, तर 711 पेटंट मंजूर करण्यात आले.
भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागांतर्गत येणाऱ्या पेटंट, डिझाईन आणि व्यापारचिन्हे नियंत्रक कार्यालयाने हा अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात संबंधित कालावधीत भारतातल्या आयुष क्षेत्रातल्या आविष्कार आणि बौद्धिक संपदा हक्कविषयक उपक्रमांच्या विकासाचा आढावा घेण्यात आला आहे.
“आयुष क्षेत्रातल्या पेटंट अर्ज आणि मंजूर पेटंटच्या संख्येत झालेली लक्षणीय वाढ या क्षेत्रात संशोधन, नवोन्मेष आणि बौद्धिक संपदा हक्कांवर वाढता भर दिला जात असल्याचे दर्शवते. पारंपरिक ज्ञान, वैज्ञानिक संशोधन आणि आधुनिक नवोन्मेष यांच्या माध्यमातून नवी उत्पादने, तंत्रज्ञान आणि उपाय विकसित करता येतील, तसेच, भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचे योग्य संरक्षण होईल, अशी पूरक व्यवस्था निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.”असे आयुष आणि आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी सांगितले.
“पेटंटविषयक उपक्रमांमध्ये सातत्याने होत असलेली वाढ आयुष क्षेत्रातील संशोधन आणि नवकल्पनांचा विस्तार होत असल्याचे दर्शवते.”असे आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी सांगितले.

या अहवालानुसार, पेटंट दाखल करण्याच्या प्रक्रियेत मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2014-15 मध्ये 63 पेटंट अर्ज दाखल झाले होते. ही संख्या आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये वाढून 590 झाली. म्हणजेच या कालावधीत सुमारे 836.5 टक्के वाढ नोंदवण्यात आली. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये पेटंट अर्जांची संख्या 606 या सर्वोच्च स्तरावर पोहोचली. त्यानंतर आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये ती घसरून 299 झाली, मात्र आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये पुन्हा वाढून 590 वर पोहोचली. पेटंट मंजूर होण्याच्या वार्षिक संख्येतही लक्षणीय वाढ झाली. आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये केवळ 3 पेटंट मंजूर झाले होते, तर आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये ही संख्या 204 झाली.
कोविडनंतरच्या काळात पेटंटविषयक उपक्रमांना विशेष वेग मिळाला. आर्थिक वर्ष 2020-21 ते 2025-26 या कालावधीत 2,854 अर्ज दाखल झाले.
नवोन्मेषांच्या या विस्तारणाऱ्या परिसंस्थेत विविध प्रकारच्या अर्जदारांचा सहभाग दिसून येतो. वैयक्तिक अर्जदारांनी 2,113 अर्ज दाखल केले असून, ते एकूण अर्जांच्या 51.9 टक्के आहेत. त्यांपैकी 398 पेटंट मंजूर झाले. शैक्षणिक संस्थांनी 995 अर्ज दाखल केले आणि त्यांपैकी 88 पेटंट मंजूर झाले. वैयक्तिक अर्जदार आणि शैक्षणिक संस्था यांनी मिळून एकूण पेटंट अर्जांपैकी 76.3 टक्के अर्ज दाखल केले.कंपन्या आणि इतर संस्थांनी 700 अर्ज दाखल केले आणि त्यांपैकी 176 पेटंट मंजूर झाले. लघु उद्योग आणि नवउद्यमांनी अनुक्रमे 144 आणि 125 पेटंट अर्ज दाखल केले.
या अहवालातल्या निष्कर्षांनुसार, आयुष क्षेत्रात संशोधन, नवोन्मेष, उद्योजकता आणि बौद्धिक संपदा हक्कांचे संरक्षण यांची सांगड अधिक दृढ होत आहे. या प्रक्रियेत वैयक्तिक नवोन्मेषक, शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था, नवउद्यम आणि उद्योगांचा सहभागही वाढत आहे.
* * *
निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2324346)
अभ्यागत कक्ष : 14