पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी भारतीय वन सेवेच्या मध्य-करियर प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद ;संवर्धनाशी संबंधित यशस्वी उपक्रम आणि उदयोन्मुख आव्हानांचा केला उल्लेख

Posted On: 12 OCT 2026 2:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2026

 
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री  भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्ली येथे भारतीय वन सेवेच्या मध्य-करिअर  प्रशिक्षणार्थी (MCT) - टप्पा 3 (19) मधील सहभागींशी संवाद साधला.

भारतीय वन सेवेच्या विविध राज्य संवर्गातील अधिकाऱ्यांशी संवाद साधताना यादव यांनी भारतातील जंगले, वन्यजीव आणि पर्यावरणीय वारसा जतन करण्यातील त्यांच्या योगदानाचा गौरव केला. त्यांनी वन्यजीव संवर्धन , वन आणि वृक्ष आच्छादनाचे वाढते प्रमाण, कार्बन संचयन, वनक्षेत्र/ पाणथळ जागांचे जतन तसेच 'मिष्टी' (MISHTI), 'अरावली ग्रीन वॉल' आणि 'नगर वन योजना' यांसारख्या उपक्रमांव्यतिरिक्त, 'एक पेड माँ के नाम' सारख्या नागरिकांचा सहभाग असलेल्या उपक्रमांद्वारे भूदृश्य पुनरुज्जीवन क्षेत्रातील भारताच्या प्रगतीला अधोरेखित केले. 

 

2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या संकल्पनेत पर्यावरणीय सुरक्षेला प्राधान्य देऊन आर्थिक विकास साध्य करण्यावर त्यांनी भर दिला. मानव-वन्यजीव संघर्ष, जंगलातील वणवे, हवामान बदल आणि विकास आणि संवर्धन यांच्यातील संतुलन या आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन  आणि सामुदायिक सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय वन सेवेच्या बदलत्या भूमिकेबद्दल बोलताना यादव यांनी सर्व अधिकाऱ्यांना पारंपरिक नियामक कामांच्या चौकटीबाहेर विचार करुन शाश्वत विकासाचे नेते, नवोन्मेषक आणि पुरस्कर्ते होण्याचे आवाहन केले. जीआयएस, रिमोट सेन्सिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा समावेश असलेल्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे महत्त्व विशद करतानाच त्यांनी क्षमता उभारणी आणि पारंपरिक ज्ञानाचा अवलंब करण्यावर देखील भर दिला. या वन अधिकाऱ्यांनी संस्थेला बळकट करावे, प्रभावी निर्णय घेण्यासाठी नवकल्पना असलेला  दृष्टिकोन बाळगावा, वन व्यवस्थापन योजना तयार कराव्यात आणि भारताच्या पर्यावरणीय भविष्याचे रक्षण करण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन यादव यांनी केले.

सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2322191) अभ्यागत कक्ष : 9