माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डॉ. एल. मुरुगन यांचे 'विकसित भारत @ 2047' च्या दिशेने भारताच्या प्रवासाचे नेतृत्व करण्याचे तरुणांना आवाहन


उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेमधील संधींचा शोध घेण्याचे तरुण पिढीला प्रोत्साहन

Posted On: 08 OCT 2026 8:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2026

केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कार्य राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज भारतीय तरुणांना त्यांची कौशल्ये, सर्जनशीलता आणि नवोन्मेष क्षमतेचा वापर करून 'विकसित भारत @ 2047' च्या संकल्पनेत योगदान देण्याचे आवाहन केले. नोएडा येथील एका संस्थेतील विद्यार्थी आणि शिकणाऱ्यांना संबोधित करताना, मंत्र्यांनी भारतातील तरुणांना नवीन संधींसाठी तयार करण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, आयुष्यभर शिकण्याची वृत्ती , कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या महत्त्वावर भर दिला.

राष्ट्रनिर्मितीत तरुणांच्या मध्यवर्ती भूमिकेवर भर देताना, डॉ. मुरुगन यांनी विकसित भारत @ 2047 च्या भारताच्या प्रवासाच्या केंद्रस्थानी 'युवा शक्ती'ला ठेवण्याच्या पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा पुनरुच्चार केला. विकसित भारत ही दूरची संकल्पना नसून एक असे भविष्य आहे जे घडवण्यात आजची युवा पिढी मदत करेल, असे त्यांनी सांगितले. त्यांनी शिक्षण, कौशल्य, तंत्रज्ञान, संशोधन, उद्योजकता आणि रोजगार यांना परस्परांशी जोडणाऱ्या एका परिसंस्थेच्या आवश्यकतेवर भर दिला.

बदलत्या जगासाठी शिक्षणविषयक सुधारणा

मंत्र्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण  2020 चे शिक्षण अधिक लवचिक, बहुविद्याशाखीय  आणि कौशल्याभिमुख बनवण्यातील महत्त्व अधोरेखित केले. ऑनलाइन शिक्षणाच्या महत्त्वावर भर देताना, डॉ. मुरुगन यांनी विविध गरजा आणि परिस्थितीनुसार सुलभ शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची कौशल्ये अद्ययावत करता येतील आणि बदलत्या व्यावसायिक गरजांशी जुळवून घेता येईल.

ज्ञानाच्या उपलब्धतेचे लोकशाहीकरण

गुणवत्तापूर्ण संशोधनाचा अधिकार संस्थात्मक किंवा भौगोलिक सीमांपुरता मर्यादित असू नये, असे डॉ. मुरुगन यांनी स्पष्ट केले. "प्रतिभा सर्वत्र आहे, आणि त्यामुळे संधी देखील सर्वत्र उपलब्ध असायला हवी," यावर त्यांनी विशेष भर दिला.

शिक्षण, कौशल्ये आणि रोजगाराच्या संधी

रोजगाराच्या संधींबद्दल बोलताना मंत्र्यांनी पायाभूत सुविधांचा विकास, उत्पादन , सेवा क्षेत्र, उद्योजकता आणि कौशल्य विकास यांची रोजगार निर्मितीमधील भूमिका अधोरेखित केली. आरबीआय- केएलईएमएस आकडेवारीचा हवाला देत त्यांनी नमूद केले की, भारताने आर्थिक वर्ष 2014-15 ते आर्थिक वर्ष 2023-24 दरम्यान सुमारे 17.1 कोटी रोजगार निर्माण केले आहेत.

बदलत्या अर्थव्यवस्थेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी तरुण पिढीला केवळ पदव्यांच्या पलीकडे जाऊन प्रात्यक्षिक कौशल्ये, समस्या सोडवण्याची क्षमता आणि आत्मविश्वास आत्मसात करण्याचे आवाहन केले.

उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि सर्जनशील अर्थव्यवस्था

डॉ. मुरुगन यांनी तरुण पिढीला तंत्रज्ञान आणि सर्जनशीलतेच्या संगमस्थानावर असलेल्या, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता , गेमिंग, ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स , एक्स्टेंडेड रिॲलिटी  आणि डिजिटल कंटेंट यांसारख्या क्षेत्रांमध्ये असलेल्या संधींचा शोध घेण्याचे आवाहन केले,

घटनात्मक मूल्ये आणि जबाबदार नागरिकत्व

संविधानात अंतर्भूत असलेल्या मूलभूत कर्तव्यांचा संदर्भ देत त्यांनी तरुण नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासू वृत्ती आणि उत्कृष्टतेचा ध्यास विकसित करण्याच्या गरजेवर भर दिला.

आपल्या भाषणाचा समारोप करताना, डॉ. मुरुगन यांनी भारतीय तरुणांना सतत शिकत राहण्याचे, नवनिर्मिती करत राहण्याचे आणि इतरांसाठी संधी निर्माण करण्याचे आवाहन केले. 'विकसित भारत @ 2047' च्या दिशेने देशाची होणारी प्रगती ही तरुणांच्या कौशल्ये आत्मसात करण्याच्या, नवोन्मेष करण्याच्या आणि अधिक समृद्ध राष्ट्र उभारणीत योगदान देण्याच्या क्षमतेवर अवलंबून असेल, असे त्यांनी अधोरेखित केले.

निलिमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2321004) अभ्यागत कक्ष : 3