गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, सेवा आणि समर्पणाची 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय गृह मंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले अभिनंदन

Posted On: 07 OCT 2026 7:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2026

केंद्रीय गृह मंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे, त्यांच्या सेवा आणि समर्पणाची 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले.

समाज माध्यम X वरील संदेशांच्या मालिकेत केंद्रीय गृह मंत्री अमित शाह म्हणाले, “सेवा आणि समर्पणाची 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. अथक परिश्रम, उल्लेखनीय दृढ निश्चय आणि राष्ट्राला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार झालेला हा प्रवास आहे. 2001 साली, आजच्याच दिवशी मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तेव्हापासून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्यांच्या कार्यकाळांतून पुढे झालेला, सेवा, संघर्ष आणि समर्पणाचा त्यांचा अखंड प्रवास गरीबांचे कल्याण, महिलांचे सबलीकरण, युवांचा विकास आणि समाजातील प्रत्येक घटकाची समृद्धी यांना समानार्थी ठरला आहे.”

अमित शाह यांनी म्हटले आहे, “मुख्यमंत्री म्हणून मोदी यांनी भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या कच्छचा पुनर्विकास करून त्याचे एका आदर्श प्रदेशात रूपांतर केले; ज्योतिग्राम योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावात 24 तास वीज पोहोचेल, याची खात्रीशीर व्यवस्था केली; सौर ऊर्जा आणि ‘व्हायब्रंट गुजरात’ या उपक्रमाच्या माध्यमातून गुंतवणूक आणि उद्योगांना नवी दिशा दिली; तसेच 8% पेक्षा अधिक कृषी विकासाचा दर साध्य केला. अशा प्रकारे गुजरातमध्ये सुशासनाचे एक मॉडेल त्यांनी प्रस्थापित केले, जे पुढे संपूर्ण देशासाठी पायाभूत ठरले. पंतप्रधान म्हणून त्यांच्या कार्यकाळात ही दृष्टी आणखी व्यापक करण्यात आली. अंतराळापासून महासागरांपर्यंत आणि जागतिक व्यासपीठांपासून अंतर्गत सुरक्षेपर्यंत विविध क्षेत्रांत भारताने नवे टप्पे गाठले.”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे, “आज मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून उत्पादन, डिजिटल पेमेंट्स, स्टार्ट-अप्स, सेमीकंडक्टर्स, संरक्षण उत्पादन आणि नवीकरणीय ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांत नवी उंची गाठत आहे. युद्ध आणि अस्थिरतेच्या या काळात भारत शांतता आणि सुसंवादासाठी एक महत्त्वपूर्ण जागतिक आवाज म्हणून उदयास आला आहे. करोडो नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून मोदी यांनी ‘विकसित भारता’चा मंत्र दिला आणि 2047 सालापर्यंत भारताला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर नेण्याचा संकल्प करण्यासाठी प्रेरणा दिली. त्यांच्या नेतृत्वाखाली या सेवा उपक्रमांमध्ये सहभागी होणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे.”


माधुरी पांगे/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2320355) अभ्यागत कक्ष : 9