संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणम इथल्या हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड येथे आयएनएस सूर्य या पहिल्या स्वदेशी फ्लीट सपोर्ट नौकेचे जलावतरण
हे जलावतरण यशाचे प्रतीक असून फ्लीट सपोर्ट नौका 5 ची पायाभरणी हे दृढ निर्धाराचे प्रतीक आणि नवा स्लिपवे आपल्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक -राजनाथ सिंह
Posted On:
06 OCT 2026 8:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2026
विशाखापट्टणम इथल्या हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड(एचएसएल) येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 06 ऑक्टोबर 2026 रोजी पहिल्या फ्लीट सपोर्ट नौकेचे जलावतरण केले. तसेच फ्लीट सपोर्ट नौका 5 ची पायाभरणी केली. अद्ययावत करण्यात आलेल्या स्लिपवे 4 चे तसेच 300 टन क्षमतेच्या गोलियाथ क्रेनचे उद्घाटन त्यांनी केले. मोठ्या आणि अधिक जटिल रचनेच्या नौका बांधण्याच्या आणि भारताची स्वदेशी सागरी क्षमता प्रगत करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

संरक्षणमंत्र्यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले. यातील प्रत्येक कामगिरी महत्त्वपूर्ण असून, या तिन्ही बाबी एकाच ठिकाणी, एकाच कार्यक्रमात होत असल्याने त्यांचे महत्त्व अधिकच वाढते, असे त्यांनी सांगितले. ''फ्लीट सपोर्ट नौका 1 चे जलावतरण हे यशाचे प्रतीक असून फ्लीट सपोर्ट नौका 5 ची पायाभरणी हे दृढ निर्धाराचे प्रतीक आणि नवा स्लिपवे आपल्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक आहे.'' एचएसएल आपली जहाजबांधणी क्षमता बळकट करण्यासोबतच भारताच्या सागरी सामर्थ्याचा पायाही बळकट करत आहे. असे ते म्हणाले.
फ्लीट सपोर्ट शिप कार्यक्रमाचे महत्त्व त्यांनी सांगितले. या नौका हिंद महासागर क्षेत्रात नौदलाची पोहोच, क्षमता आणि परिचालनात्मक परिणामकारकता अधिक वृद्धिंगत करतील, असे ते म्हणाले. दूरच्या सागरी क्षेत्रांमध्ये दीर्घकाळ कार्यरत राहणाऱ्या नौदलाच्या आवश्यकता केवळ युद्धनौकेपुरत्याच मर्यादित नसतात, तर लॉजिस्टिक्स, देखभाल, सातत्यपूर्ण पाठबळ आणि परिचालन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक बाबी, यादेखील आवश्यकता असतात. फ्लीट सपोर्ट नौका, समुद्रातच आवश्यक रसद आणि पाठबळ पुरवून नौदलाला ही अत्यावश्यक क्षमता प्रदान करतात, असे त्यांनी नमूद केले. संरक्षणमंत्र्यांनी फ्लीट सपोर्ट नौका-1 चे जलावतरण हे नौदलाची परिचालन पोहोच आणि क्षमता बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे अधोरेखित केले, तर फ्लीट सपोर्ट नौका -5 ची पायाभरणी भारताच्या सागरी भविष्यासाठी आणखी एक मजबूत आधार आहे.

अद्ययावत स्लिपवे -4 विस्तारण्यात आला असून तो अधिक बळकट करण्यात आला आहे. यामुळे एचएसएलला 45,000 डीडब्ल्यूटी पर्यंतची जहाजे बांधता आणि पाण्यात उतरवता येतील. स्लिपवे 3 आणि 4 वरील 300 टन वजनाची गोलियाथ क्रेन, मेक इन इंडियाअंतर्गत मे. एल अँड टी जिओस्ट्रक्चर आणि कोनेक्रेन्सद्वारे आरेखित आणि निर्मित आहे. पीएलसी कंट्रोल्स, व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राइव्ह्स, टँडम लिफ्टिंग, रिमोट डायग्नोस्टिक्स आणि कंडिशन मॉनिटरिंगने सुसज्ज असलेली ही क्रेन, आधुनिक ब्लॉक बांधकामामध्ये, जड ब्लॉक्सची जलद आणि अधिक अचूक हाताळणी सक्षम करेल. या नवीन पायाभूत सुविधांमुळे मोठे आणि अधिक जटिल जहाजबांधणीचे उपक्रम हाती घेण्याची आणि आधुनिक ब्लॉक बांधकामास पाठबळ पुरवण्याची एचएसएलची क्षमता अधिक बळकट होईल.
''आत्मनिर्भरता हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, परंतु जागतिक स्तरावरील स्पर्धाक्षमता ही पुढची मोठी झेप आहे," असे संरक्षणमंत्र्यांनी यावेळी सांगितले. भारतीय जहाजबांधणी कारखान्यांनी गुणवत्ता, खर्च, तंत्रज्ञान, वेळेवर पूर्तता आणि विश्वासार्हता या बाबतीत जगातील आघाडीच्या जहाजबांधणी कारखान्यांशी स्पर्धा करण्यास सक्षम असायला हवे, असे ते म्हणाले.

संरक्षणमंत्र्यांनी सांगितले, "आपले उद्दिष्ट साधे आणि स्पष्ट असायला हवे - अधिक चांगली रचना करणे, जलद गतीने उभारणी करणे, वेळेवर सुपूर्द करणे, तसेच कुशल संचालन आणि प्रभावीपणे देखभाल करणे." वेळेवर सूपूर्तता, उत्पादकता, स्वदेशी रचना क्षमता, पुरवठा साखळीची लवचिकता, कुशल मनुष्यबळ, क्षमता आणि खर्चाच्या बाबतीत स्पर्धात्मकता, या प्रमुख बाबी असून त्या भारताची जहाजबांधणी क्षेत्रातली क्षमता, जागतिक स्पर्धात्मकतेत परिवर्तित करण्यात महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.

शैलेश पाटील/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2319844)
अभ्यागत कक्ष : 7