संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डीआरडीओ द्वारे 'हाय-अल्टिट्यूड प्लॅटफॉर्म'ची यशस्वी उड्डाण चाचणी

Posted On: 06 OCT 2026 8:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2026

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) स्वदेशी बनावटीच्या 'हाय-अल्टिट्यूड प्लॅटफॉर्म'ची (HAPS) यशस्वी उड्डाण चाचणी केली. या प्रायोगिक उड्डाणादरम्यान हा प्लॅटफॉर्म  समुद्रसपाटीपासून 21 किमी उंचीपर्यंत पोहोचला आणि जमिनीवर परत उतरण्याची सूचना मिळण्यापूर्वी 30 मिनिटांहून अधिक काळ 20 किमी उंचीवर स्थिर राहिला. ही प्रणाली यशस्वीरित्या परत मिळवण्यात आली आणि उड्डाण दरम्यान कामगिरीशी संबंधित माहितीचे  विश्लेषण करण्यात आले.

संपूर्ण उड्डाणादरम्यान 'एअरबोर्न प्लॅटफॉर्म'कडून रिअल-टाइम व्हिडिओ डेटा आणि वाहनाशी संबंधित इतर सर्व पॅरामीटर्स 'ग्राउंड कंट्रोल स्टेशन'वर प्राप्त करण्यात आले; यावरून उड्डाणाची कामगिरी नियोजित उद्दिष्टांनुसार असल्याचे दिसून आले. या प्रणालीमध्ये 'इनर्शियल मेजरमेंट युनिट', 'ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम रिसीव्हर', ऑन-बोर्ड कॅमेरे आणि उंची नियंत्रित करणारी यंत्रणा यांसारखी विविध उपकरणे व इलेक्ट्रॉनिक नियंत्रण प्रणाली, तसेच इतर अनेक उप-प्रणाल्यांचा समावेश होता. ही चाचणी भारतीय हवाईदल , CEMILAC, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि इतर नागरी प्राधिकरणांच्या समन्वयाने पार पडली.

'हाय-अल्टिट्यूड प्लॅटफॉर्म' ही हवेपेक्षा हलकी प्रणाली असून, ती दीर्घकाळ परिचालनास सक्षम  स्ट्रॅटोस्फियरिक हवाई देखरेख प्लॅटफॉर्म म्हणून आग्रा येथील एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट द्वारे डिझाइन आणि विकसित केली जात आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'हाय-अल्टिट्यूड प्लॅटफॉर्म'च्या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल डीआरडीओ, भारतीय हवाई दल, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि उद्योगांचे अभिनंदन केले आहे. तसेच, ही यशस्वी चाचणी  दीर्घकाळ परिचालनास सक्षम  स्ट्रॅटोस्फियरिक एअरशिपच्या निर्मितीच्या दिशेने भारताच्या 'आत्मनिर्भर भारत' प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे.

संरक्षण सचिव आणि संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव तसेच डीआरडीओचे अध्यक्ष राजेश कुमार सिंह यांनी 'हाय-अल्टिट्यूड एअरशिप प्लॅटफॉर्म'च्या उड्डाण चाचणीशी संबंधित चमूंचे अभिनंदन केले आहे.

 
निलिमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2319808) अभ्यागत कक्ष : 12