अर्थ मंत्रालय
अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात डीआरआयची मोठी कारवाई, तीन कारवायांत सुमारे 7 किलो अॅम्फेटामाइन, 5 किलो कोकेन आणि 3 किलो 500 ग्रॅम हेरॉईन जप्त, 5 जणांना अटक
Posted On:
04 OCT 2026 9:05PM by PIB Mumbai
देशभरात गुप्त माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर संचालनालयाने, देशात विविध ठिकाणी कारवाया केल्या आहेत. यामध्ये वेगाने पाठलाग करून केलेली कारवाई, चॉकलेटच्या नळ्यांमध्ये लपवलेले कोकेन आणि कार-पूलिंग टॅक्सीतून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाकडून जप्त केलेले हेरॉईन यांचा समावेश आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कारवाई सुरू ठेवत, महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात डीआरआयने 29 आणि 30 सप्टेंबर 2026 रोजी गुप्त माहितीच्या आधारे तीन स्वतंत्र कारवाया केल्या. या कारवायांमध्ये अॅम्फेटामाइन, कोकेन आणि हेरॉईन या अंमली पदार्थांचे मिळून एकूण 15 किलो 590 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणी एनडीपीएस ॲक्ट, 1985 अंतर्गत 5 जणांना अटक करण्यात आली आहे.
30 सप्टेंबर 2026 रोजी डीआरआयने केंद्रीय अमली पदार्थ विभाग अर्थात सीबीएनच्या सहकार्याने मध्य प्रदेशातील उज्जैन-देवास टोल नाक्यावर अॅम्फेटामाइन असल्याचा संशय असलेली महिंद्रा थार गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. गाडी थांबवण्याचा इशारा देऊनही चालकाने अडथळा तोडून गाडी भरधाव वेगाने पुढे नेली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सुमारे दीड तास गाडीचा पाठलाग केला. अखेर इंदूरमधील बिचोली मर्दाना परिसरात गाडी अडवण्यात आली. गाडीची तपासणी केली असता, गाडीच्या मागील दरवाजावर बसवलेल्या अतिरिक्त चाकात अंमली पदार्थ लपवून ठेवल्याचे आढळले. हे चाक उघडून पाहिल्यावर त्यातून 21 पाकिटे सापडली. त्यात पांढऱ्या-पिवळसर रंगाचा स्फटिकासारखा पदार्थ होता. त्याचे एकूण वजन 7 किलो 116 ग्रॅम होते. एनडीपीएस फील्ड टेस्ट किटच्या तपासणीत हा पदार्थ अॅम्फेटामाइन असल्याचे स्पष्ट झाले. अॅम्फेटामाइनसह वाहनही जप्त करण्यात आले. या प्रकरणी तिन्ही जणांना एनडीपीएस ॲक्ट, 1985 अंतर्गत अटक करण्यात आली.


29.09.2026 रोजी करण्यात आलेल्या आणखी एका कारवाईत, कोकेनची तस्करी होत असल्याच्या विशिष्ट गुप्त माहितीनुसार, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोहा येथून येणाऱ्या एका भारतीय प्रवाशाला अडवले. त्याच्या केबिन सामानाची तपासणी केली असता, त्यामध्ये चॉकलेटच्या 7 नळ्या आढळून आल्या. या नळ्या त्यावर नमूद केलेल्या वजनापेक्षा असामान्यपणे जड असल्याचे आढळले. नळ्या उघडून तपासणी केली असता, चॉकलेटसोबत अत्यंत कौशल्याने लपवून ठेवलेल्या फिकट पिवळ्या रंगाच्या अंडाकृती आकाराच्या 207 कॅप्सूल आढळल्या. कॅप्सूलची तपासणी केली असता त्यामध्ये पांढऱ्या रंगाचा पावडरी पदार्थ असल्याचे आढळले. नार्कोटिक ड्रग डिटेक्शन किटच्या साहाय्याने तपासणी केली असता हा पदार्थ कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. एकूण 4.9 किलो कोकेन जप्त करण्यात आले. एनडीपीएस कायदा, 1985 मधील तरतुदींनुसार प्रवाशाला अटक करण्यात आली.
29.09.2026 रोजी करण्यात आलेल्या तिसऱ्या कारवाईत, अमली पदार्थांची वाहतूक होत असल्याच्या विशिष्ट गुप्त माहितीनुसार, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी पंजाबमधील जालंधरच्या बाहेरील भागात फिल्लौरजवळ समन्वयित पाळत ठेवली. सतलज नदीवरील पुलाजवळ अनेक वाहनांची तपासणी केल्यानंतर, संशयित व्यक्ती भाड्याच्या सामाईक टॅक्सीमधून प्रवासी म्हणून प्रवास करत असल्याचे आढळून आले.
संशयिताची वैयक्तिक झडती घेतली असता, त्याच्या मांडीवर ठेवलेल्या निळ्या रंगाच्या बॅकपॅकमध्ये लपवून ठेवलेली 3 पाकिटे आढळली. प्रत्येक पाकिटामध्ये आणखी 2 छोटी पाकिटे होती. क्षेत्रीय तपासणी किटच्या साहाय्याने तपासणी केली असता त्यातील पदार्थ हेरॉईन असल्याचे निष्पन्न झाले. एकूण 3.574 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आणि प्रतिबंधित पदार्थ बाळगणाऱ्या व्यक्तीला एनडीपीएस कायदा, 1985 अंतर्गत अटक करण्यात आली.
***
राधिका अघोर/राज दळेकर/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2318955)
अभ्यागत कक्ष : 8