उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्ली येथील 5व्या कौटिल्य आर्थिक परिषदेत उपराष्ट्रपती सी पी. राधाकृष्णन यांचे उद्घाटनपर भाषण


आर्थिक लवचिकता व सामाजिक लवचिकता वेगळे नाहीत – उपराष्ट्रपती

बदलत्या जगात समावेशन हा लवचिकतेचा पाया - उपराष्ट्रपती

एकही नागरिक, व्यवसाय किंवा क्षेत्र विकासात मागे राहणार नाही, याची हमी, यातच खरी लवचिकता - उपराष्ट्रपती

लोकशाही व विकास एकाच वेळी प्रगती करू शकतात हे भारताने दाखवून दिले – उपराष्ट्रपती

Posted On: 03 OCT 2026 11:56AM by PIB Mumbai

 

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्ली येथील 5व्या ‘कौटिल्य आर्थिक परिषदे’त उद्घाटनपर भाषण केले. बदलत्या युगात लवचिकता ही या परिषदेची संकल्पना आहे. धोरणकर्ते, अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, आघाडीचे व्यावसायिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत बोलताना त्यांनी वेगाने बदलणाऱ्या जगात लवचिक, समावेशी व प्रतिसादात्मक आर्थिक धोरणे गरजेची असल्याचा मुद्दा अधोरेखित केला.

आर्थिक विकास संस्थेचा (आयइजी) संदर्भ देऊन उपराष्ट्रपती म्हणाले की प्रा. व्ही. के आर. व्ही राव यांच्या नेतृत्वात 1952 मध्ये स्थापना झाल्यापासून ही संस्था भारताच्या विकासाशी निगडीत आहे. प्रत्यक्ष वस्तुस्थिती समजावून घेऊन धोरणे आखली जावीत आणि ती बदलत्या परिस्थितीनुसार लवचिक व प्रतिसादात्मक असावीत, या मुद्द्यावर त्यांनी भर दिला.

सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, अस्थिर काळात निर्णयप्रक्रिया सहमतीनेच झाली पाहिजे. चर्चा आणि वादविवाद हे लोकशाहीचे अविभाज्य भाग आहेत; पण यातून शेवटी व्यापक सहमती असलेला निर्णय घेतला गेला पाहिजे, असे ते म्हणाले. मुक्त व पारदर्शक चर्चा लोकशाही मजबूत करते. अधिकार व कर्तव्ये एकमेकांसोबतच येतात, असे मत त्यांनी राज्यसभा अध्यक्ष म्हणून व्यक्त केले.

उपराष्ट्रपती म्हणाले की, लोकशाही व विकास एकत्र प्रगती करू शकतात हे भारताने दाखवून दिले आहे. भारताचा आर्थिक विकास व समावेशक प्रगती लोकशाहीच्या चौकटीत राहूनच साध्य झाली आहे. सहमतीने निर्णय घेण्यामुळे आर्थिक सुधारणांना अधिक टिकाऊपणा व शाश्वतता लाभली. या अनुभवाने विकसित भारत 2047 या स्वप्नाचा पाया रचला असे ते म्हणाले. 

जेएएम ट्रिनीटी, थेट लाभ हस्तांतरण व जीएसटी यांनी वित्तीय समावेशन, पारदर्शकता व औपचारिकीकरण दृढ करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असे उपराष्ट्रपतींनी आर्थिक लवचिकता व सामाजिक लवचिकता एकमेकांपासून वेगळे नाहीत, या मुद्द्यावर भर देताना सांगितले. ऑगस्ट 2026 मधील आकडेवारीनुसार 59 कोटींपेक्षा जास्त जनधन खाती सुरू करण्यात आली आहेत, 2017 मध्ये जीएसटी नोंदणीसंख्या सुमारे 66 लाख 50 हजार इतकी होती ती मे 2026 पर्यंत 165 लाखांवर गेल्याचे त्यांनी नमूद केले.

सी पी. राधाकृष्णन म्हणाले की, समावेशन केवळ लोकांना व्यावहारिक अर्थव्यवस्थेत सामावून घेण्यापुरते मर्यादित नसावे तर त्यामुळे त्यांना मूल्य ओळखून व्यवसाय सुरू करता येणे व उत्पन्नाचे साधन निर्माण करता येणे शक्य व्हावे. 10 कोटींपेक्षा जास्त ग्रामीण महिलांचा सहभाग असलेल्या सुमारे 92 लाख स्वयंसहायता गटांच्या योगदानाचा आणि 34 लाख 60 हजार लखपती दीदी तयार होण्याच्या मुद्द्याचा त्यांनी ठळकपणे उल्लेख केला. महिलांचा शिक्षण व अर्थव्यवस्थेतील वाढता सहभाग यातून महिला सक्षमीकरण ते महिलांच्या नेतृत्वातील सक्षमीकरण असा भारतात झालेला बदल प्रतिबिंबित होतो, असे ते म्हणाले.

लवचिकता केवळ संचालक मंडळांच्या बैठकीत आणि वित्तीय बाजारांमध्ये निर्माण केली जात नाही तर जेव्हा एखाद्या ग्रामीण महिलेकडे स्वतःचे बँक खाते असते, लाभ थेट मिळतात तेव्हा ती औपचारिक अर्थव्यवस्थेचा भाग होते आणि स्वयंसहायता गटाचे उद्योगात रुपांतर होते, असे उपराष्ट्रपती म्हणाले. 25 कोटींपेक्षा जास्त भारतीय नागरिकांची कमालीच्या दारिद्र्यातून युटका झाली असून हे ऐतिहासिक यश आहे, असे ते म्हणाले. प्रत्येक राज्य, जिल्हा आणि गाव भारताच्या विकासातील समान भागीदार असले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

उत्तम संशोधन व संस्थात्मक भागीदारीचे आवाहन करताना सी. पी. राधाकृष्णन यांनी दिल्ली विद्यापीठ, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि इन्स्टीट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ या संस्थांमधील सहकार्याचे स्वागत केले. अशा प्रकारची भागीदारी तसेच भारताचे वाढते व्यापारी संबंध यामुळे संशोधन, शिक्षण, नवोन्मेष आणि व्यावसायिकतेला मजबूती मिळू शकते, असे ते म्हणाले.

आपले भाषण संपवताना उपराष्ट्रपती म्हणाले की, बदलांना विरोध न करता त्यांना आत्मविश्वासाने, समन्वितपणे व  सामुहिक प्रयत्नांद्वारे सामोरे जाऊन भारत लवचिकता साधू शकतो. 5व्या कौटिल्य आर्थिक परिषदेमधील चर्चा 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या राष्ट्रीय प्रयत्नांमध्ये अर्थपूर्ण योगदान देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

आयइजीचे अध्यक्ष, विश्वस्त मंडळाचे सदस्य एन. के. सिंग, प्रशासक मंडळाचे अध्यक्ष डॉ. मायकेल देवव्रत पात्रा आणि अन्य मान्यवर उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.      

***

शिल्पा पोफळे/सुरेखा जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2318611) अभ्यागत कक्ष : 8