आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
azadi ka amrit mahotsav

आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समिती (CCEA)


'वन नेटवर्क, स्मार्टर ट्रॅफिक' उपक्रमाला मंत्रिमंडळाची मंजुरी; दिल्लीची स्मार्ट वाहतूक व्यवस्थापनाकडे वाटचाल

Posted On: 30 SEP 2026 3:15PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने (CCEA) दिल्ली पोलिसांच्या आयटीएमएस प्रकल्पाच्या अंमलबजावणीला मंजुरी दिली आहे. करांसह अंदाजे 1,789.52 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पात 42 प्रमुख वाहतूक कॉरिडॉर्सचा समावेश असेल. पुढील 24 महिन्यांत तीन टप्प्यांत हा प्रकल्प राबवला जाणार असून, त्यानंतर पाच वर्षांसाठी त्याचे संचालन आणि देखभाल केली जाईल.

केंद्र सरकार आणि दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCT) सरकारच्या वतीने राष्ट्रीय राजधानीतील वाहतूक व्यवस्थापन, वाहतूक पायाभूत सुविधा आणि शहरी गतिशीलता सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून, आता ‘इंटेलीजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’च्या (आयटीएमएस) माध्यमातून तंत्रज्ञानावर आधारित एक मोठा पुढाकार घेतला जाणार आहे.

या प्रकल्पामुळे तत्काळ वाहतूक डेटा, गरजेनुसार बदलणारे सिग्नल, स्वयंचलित नियम अंमलबजावणी आणि एकात्मिक कमांड-अँड-कंट्रोल सिस्टीमच्या साहाय्याने दिल्लीतील सध्याचे रस्ते जाळे अधिक बुद्धिमत्तापूर्ण पद्धतीने व्यवस्थापित करणे शक्य होईल. रस्त्यावरील प्रत्यक्ष परिस्थितीनुसार वाहतूक व्यवस्थापन सक्षम करून, उपलब्ध रस्ते क्षमतेचा अधिक उत्तम वापर करणे हे आयटीएमएस चे मुख्य उद्दिष्ट आहे.

फायदे:

• अधिक स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल आणि सुरळीत वाहतूक: अ‍ॅडॉप्टिव्ह ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम रस्त्यावरील तत्कालीन वाहतुकीच्या परिस्थितीनुसार सिग्नलची वेळ आपोआप बदलेल आणि निवडलेल्या कॉरिडॉर्सवरील सिग्नलमध्ये समन्वय साधेल. यामुळे अनावश्यक थांबणे आणि होणारा उशीर कमी होण्यास मदत होईल.

• रुग्णवाहिका आणि आपत्कालीन वाहनांना प्राधान्य: ही यंत्रणा आपत्कालीन वाहनांसाठी ग्रीन कॉरिडॉर आणि प्राधान्याने वाहतूक सुविधा उपलब्ध करून देईल, ज्यामुळे वाहतूक कोंडी असलेल्या भागातूनही त्यांना वेगाने मार्ग काढणे शक्य होईल.

• वाहतूक कोंडी आणि अपघातांना जलद प्रतिसाद: वाहतूक कोंडी, मंद गतीने चालणारी वाहतूक आणि रस्त्यावरील घटनांचा तत्काळ शोध घेतल्याने दिल्ली पोलिसांना त्वरित मार्ग बदलणे आणि ऑपरेशनल कारवाई करणे शक्य होईल.

• प्रवाशांसाठी वेळेवर माहिती: सूचना फलक आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे प्रवाशांना वाहतूक कोंडी, पर्यायी मार्ग, पार्किंगची उपलब्धता आणि वाहतुकीच्या परिस्थितीची माहिती पुरवली जाईल.

***

नितीन फुल्लुके/वैभवी जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2317182) अभ्यागत कक्ष : 16