वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल जी-20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिका दौऱ्यावर जाणार

Posted On: 28 SEP 2026 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2026

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल 29 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अमेरिकेचा दौरा करणार आहेत. युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह या अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधीं च्या निमंत्रणावरून गोयल 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर 2026 रोजी मिलवॉकी, विस्कॉन्सिन  येथे होणाऱ्या जी-20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होतील.

या बैठकीत जी-20 समूह सदस्यांचे व्यापार मंत्री एकत्र येतील. भारत जी-20 च्या सर्व सदस्य देशांशी रचनात्मक सहभाग ठेवत, विकसनशील देशांना पुरेसा धोरणात्मक वाव मिळेल याची खात्री करण्यासाठी काम करेल. तसेच, जागतिक व्यापार संघटनेला केंद्रस्थानी ठेवून नियमांवर आधारित, खुल्या, सर्वसमावेशक, पारदर्शक, न्याय्य आणि भेदभावमुक्त बहुपक्षीय व्यापार व्यवस्थेला प्रोत्साहन देईल. या बैठकीच्या निमित्ताने गोयल विविध देशांच्या समकक्ष मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतील. या चर्चांमध्ये शेतकरी, मच्छीमार, महिला उद्योजक, स्टार्ट-अप्स,  सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) तसेच इतर उद्योगांसाठी नव्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जाईल.

संतुलित आणि परस्पर लाभदायक भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करार पुढे नेण्याच्या आणि 7 फेब्रुवारी 2026 च्या संयुक्त निवेदनाशी सुसंगत अंतरिम कराराला अंतिम रूप देण्याच्या विद्यमान प्रयत्नांचा एक भाग म्हणून पीयूष गोयल अमेरिकेतील त्यांच्या समकक्षांशी द्विपक्षीय चर्चा करतील.

मिलवॉकी आणि शिकागो  येथे  गोयल, उत्पादन, ग्राहकोपयोगी वस्तू, कृषी-व्यवसाय, किरकोळ विक्री आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख अमेरिकी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील आणि व्यवसाय, स्टार्ट-अप्स आणि नवोन्मेषी कंपन्यांसोबतच्या गोलमेज परिषदांमध्ये भाग घेतील. उत्पादन आणि गुंतवणुकीचे गंतव्यस्थान म्हणून भारत देत असलेल्या संधींवर ते प्रकाश टाकतील आणि अमेरिकी कंपन्यांना भारतीय उद्योगांसोबतची त्यांची भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आमंत्रित करतील.

गांधी जयंतीदिनी शिकागो येथे  महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला गोयल पुष्पांजली अर्पण करतील. भारतीय समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यावसायिक संघटनांशीही ते संवाद साधतील.

या दौऱ्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध अधिक दृढ होण्यास, तसेच जी-20 मधील भागीदार देशांसोबत भारताची भागीदारी अधिक मजबूत होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

 

* * *

निलिमा चितळे/आशुतोष सावे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2316279) अभ्यागत कक्ष : 6