माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सरकारी योजना प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हिंदी पत्रकारितेने प्रभावी दुवा म्हणून काम करावे


केवळ भाषांतरापुरता मर्यादित न राहता सरकारी योजनांचा उद्देश आणि त्यामागची भावना जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे : सुधा श्रीमाळी

Posted On: 28 SEP 2026 8:31PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2026

 

सरकारी योजनेची घोषणा झाल्यानंतर तिचा खरा परिणाम तेव्हाच दिसून येतो, जेव्हा योजनेची माहिती थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते. योजनेची क्लिष्ट भाषा सामान्यांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत सांगणे आणि योग्य संदर्भासह ती लोकांपर्यंत पोहोचवणे हा  सरकारी योजनांचा ‘फाईल ते फील्ड’ (योजना प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचवणे) प्रवास पूर्ण करण्यात महत्वाचा दुवा आहे. या प्रक्रियेत हिंदी पत्रकारिता प्रभावी दुवा म्हणून भूमिका बजावू शकते असे मत दैनिक ‘नवभारत टाइम्स’च्या व्यवसाय विभागाच्या संपादक (बिझनेस एडिटर) सुधा श्रीमाळी यांनी व्यक्त केले. त्या ‘हिंदी महिन्या’निमित्त, पीआयबी मुंबईने आयोजित केलेल्‍या विशेष व्याख्यानात बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला, पत्र सूचना कार्यालय मुंबईचे अपर महासंचालक सिद्धार्थ बोडके यांनी सुधा श्रीमाळी यांचे स्वागत केले आणि विशेष व्याख्यानाबद्दल त्यांचा सत्कार केला.

"विकसित भारत 2047 च्या संदर्भात सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात हिंदी पत्रकारितेची भूमिका" या विषयावर बोलताना श्रीमाळी म्हणाल्या की, सरकारी माहिती हिंदीत मांडणे हे केवळ शब्दांचे भाषांतर करण्याचे काम नाही. माहितीमागील उद्देश, तिची भावना आणि संदर्भ समजून घेऊन जनतेच्या गरजेनुसार ती मांडणे अधिक महत्त्वाचे आहे. अचूक माहिती सोप्या आणि उपयुक्त स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचली, तर ती केवळ माहिती न राहता लोकसहभागाला चालना देते, असे त्यांनी सांगितले.

एखाद्या योजनेची घोषणा झाल्यानंतर सामान्य नागरिकांच्या मनात काही मूलभूत प्रश्न निर्माण होतात—योजना नेमकी काय आहे, तिचा लाभ कोणाला मिळणार, पात्रतेचे निकष काय आहेत आणि या योजनेचा लाभ कसा घेता येईल? या प्रश्नांची सोपी, स्पष्ट आणि थेट उत्तरे देणे ही पत्रकारितेची जबाबदारी आहे, असे श्रीमाळी यांनी नमूद केले. ‘पंतप्रधान स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी’ (पीएम स्वनिधी-) योजनेचे उदाहरण देत त्या म्हणाल्या की, बातमीचे शीर्षक आणि मांडणी अशी असावी की, वाचकाला एका नजरेतच या योजनेचे महत्त्व आणि तिचा लाभ कसा घेता येईल, हे समजले पाहिजे.

आज माहितीचे जग वेगाने बदलत आहे. वृत्तपत्रांबरोबरच श्राव्य  कार्यक्रम, सोशल मीडिया तसेच इतर डिजिटल माध्यमांनी सरकारी धोरणे आणि योजनांची माहिती पूर्वीपेक्षा अधिक व्यापक स्वरूपात नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची क्षमता विकसित केली असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले. अशा परिस्थितीत माध्यमांची सर्वांत महत्त्वाची जबाबदारी म्हणजे विश्वासार्हता कायम राखणे, ही असल्याचे श्रीमल्ली यांनी सांगितले. साधी, तथ्याधारित आणि अचूक माहिती उपलब्ध करून दिल्याने संवादातील दरी कमी होण्यास मदत होते. तसेच अफवा आणि दिशाभूल करणारी माहिती पसरविण्याचे प्रमाण कमी करण्यासही यामुळे हातभार लागतो, असे त्या म्हणाल्या.

माहितीचा प्रवाह केवळ सरकारकडून माध्यमांकडे आणि त्यानंतर जनतेपर्यंत पोहोचणारा एकतर्फी मार्ग असता कामा नये. माध्यमांकडून मिळणारा अभिप्राय पुन्हा सरकारपर्यंत पोहोचवण्यात पत्र  कार्यालयाची  (पीआयबी) भूमिकाही तितकीच महत्त्वाची असल्याचे श्रीमल्ली यांनी नमूद केले.

पत्रकार आणि माध्यम संस्थांकडून येणारे प्रश्न, प्रतिक्रिया तसेच तळागाळातील परिस्थितीविषयीच्या प्रत्यक्ष माहितीच्या माध्यमातून माहितीतील उणिवा ओळखून त्या दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करता येतात, असे त्या म्हणाल्या.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील पत्रकारितेच्या भूमिकेबाबतही त्यांनी यावेळी भाष्य केले. कृत्रिम बुद्धिमत्तेकडे केवळ एक आव्हान म्हणून न पाहता, पत्रकारांचे काम अधिक प्रभावी आणि सुलभ करणारे साधन म्हणून त्याचा वापर केला पाहिजे. माहितीचे विश्लेषण, सादरीकरण आणि व्यापक प्रसार यासाठी तंत्रज्ञानाची मोठी मदत होऊ शकते. मात्र, माहितीची सत्यता पडताळण्याची आणि विश्वासार्हता जपण्याची जबाबदारी पत्रकारितेचीच राहणार असल्याचे श्रीमल्ली यांनी सांगितले.

सरकारी योजनांची माहिती आकर्षक आणि उपयुक्त असावी, परंतु तिचा उद्देश केवळ योजनांचे उदात्तीकरण करणे हा नसून, त्यामागचा मूळ हेतू आणि त्यातून मिळणारे लाभ सोप्या भाषेत जनतेपर्यंत पोहोचवणे हा असावा. हिंदी भाषेची व्यापक समज आणि डिजिटल माध्यमांची व्याप्ती  यांमुळे हा दृष्टिकोन अधिक प्रभावी ठरतो. या पार्श्वभूमीवर, 'विकसित भारत २०४७' चे स्वप्न आणि जनसहभागाची व्यापक मोहीम यांना जोडण्यात हिंदी पत्रकारिता महत्त्वाची भूमिका बजावू शकते असे श्रीमाली यांनी नमूद केले.

पत्र सूचना कार्यालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा आपल्या भाषणात म्हणाल्या की, "आजच्या डिजिटल युगात माहितीचा भडिमार होत असतो. म्हणूनच, पत्रकारांसाठी डेटा आणि माहिती एकत्रित करून ती अत्यंत सोप्या पद्धतीने सादर करण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो. पत्रकारांच्या सोयीसाठी, आम्ही प्रसिद्धीपत्रकांसोबतच 'पीआयबी बॅकग्राउंडर्स' (पार्श्वभूमी देणारी माहिती) जोडतो आणि छायाचित्रांसाठी तपशीलवार मथळे (कॅपशन्स) लिहितो, जेणेकरून दुर्गम भागात काम करणाऱ्या पत्रकारांना सहजपणे  त्या विषयाची पार्श्वभूमी समजू शकेल. याव्यतिरिक्त, विषयाची सर्वसमावेशक समज मिळावी यासाठी प्रसिद्धीपत्रकासोबतच सोशल मीडिया लिंक्स आणि थेट प्रक्षेपणाच्या (लाइव्ह-स्ट्रीमिंग) लिंक्स देखील दिल्या जातात."

मुंबईच्या पत्र सूचना कार्यालयाने ‘हिंदी महिना’च्या औचित्याने या व्याख्यानाचे आयोजन केले होते. या व्याख्यानात पत्र सूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरोचे अधिकारी आणि कर्मचारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी पत्र सूचना कार्यालय, भोपाळचे संचालक मनीष गौतम यांनी सुधा श्रीमाली यांचे आभार मानले. 

 

* * *

निलिमा चितळे/सुषमा काणे/आशुतोष सावे/वैभवी जोशी/सविता म्‍हस्‍कर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2316228) अभ्यागत कक्ष : 8
Read this releasein: Hindi_Cg , English , Urdu , Tamil