राष्ट्रपती कार्यालय
महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा च्या 75 व्या वार्षिक दीक्षांत सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची विशेष उपस्थिती
शिक्षणाचा उपयोग देश आणि समाजासाठी झाला,तरच ते अर्थपूर्ण ठरते : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Posted On:
23 SEP 2026 7:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,23 सप्टेंबर 2026
गुजरातच्या वडोदरा इथल्या, महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या 75 व्या वार्षिक दीक्षांत समारंभाला आज (23 सप्टेंबर, 2026) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या.
गेल्या 75 वर्षांपासून विविध ज्ञानशाखांचा समन्वय घडवत, या विद्यापीठाची प्रगती होत आहे, असे राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.

आजच्या जगात कोणत्याही समस्येचे निराकरण केवळ एका ज्ञानशाखेपुरते मर्यादित राहिलेले नाही. गंभीर आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बहुशाखीय दृष्टिकोन आवश्यक आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. यासाठी आपल्याकडे वैज्ञानिकाची जिज्ञासा, कलाकाराची संवेदनशीलता, इतिहास अभ्यासकाचा दृष्टिकोन, अर्थतज्ज्ञाची अंतर्दृष्टी आणि समाजशास्त्रज्ञाची सामाजिक जाणीव असणे आवश्यक आहे. महाराजा सयाजीराव विद्यापीठासारख्या उच्च शिक्षण संस्थांनी या दृष्टीने, सातत्याने सजग आणि गतिशील राहणे अपेक्षित आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

आज पदवीधर होत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पुढच्या आयुष्यात, त्यांचे शिक्षण आणि ज्ञान यामागचे उद्दिष्ट प्रतिबिंबित झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आपापल्या व्यावसायिक आयुष्यात पुढे वाटचाल करताना आपला देश आणि समाजाच्या हिताला प्राधान्य दिले, तर अशा प्रगतीतून, त्यांना अत्यंत समाधान मिळेल, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

आपल्या शिक्षणाचा देश आणि समाजाला त्याचा लाभ झाला तरच ते अर्थपूर्ण ठरते,असे राष्ट्रपती म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी अभियंते म्हणून लोकांचे जीवनमान सुधारणारे तंत्रज्ञान विकसित करावे; डॉक्टर म्हणून त्यांनी वैद्यकीय क्षेत्राकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता सेवेचे माध्यम म्हणून पाहावे; वैज्ञानिक म्हणून त्यांनी मानवतेच्या हितासाठी समस्यांवर उपाय शोधावेत; कलाकार किंवा लेखक म्हणून त्यांनी समाजाच्या संवेदनशीलतेला समृद्ध करावे; उद्योजक म्हणून त्यांनी केवळ संपत्ती निर्माण न करता रोजगार आणि संधीही निर्माण कराव्यात; शिक्षक म्हणून त्यांनी वारसा आणि प्रगती या दोन्हींचा स्वीकार करणारी युवा पिढी घडविण्यावर भर द्यावा; तसेच सार्वजनिक जीवनात त्यांनी आपल्या पदाकडे अधिकाराचा स्रोत म्हणून नव्हे, तर जबाबदारी म्हणून पाहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आपण, वर्ष 2047 पर्यंत, विकसित भारत घडवण्याच्या उद्दिष्टाकडे वेगाने वाटचाल करत आहोत- एक असा विकसित देश, जिथे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आरोग्यविषयक सुविधा सर्वांपर्यंत पोहोचतील; जिथे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर मानव कल्याणासाठी होईल; जिथे संधींची समानता असेल; जिथे महिला आणि युवा यांच्या सामर्थ्याला संपूर्ण वाव मिळेल आणि एक असा भारत, जिथे प्रत्येक नागरिकाला, प्रतिष्ठेचे आयुष्य जगण्याची संधी मिळेल, असे राष्ट्रपती म्हणाल्या. ही सगळी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, विद्यापीठे आणि युवा शक्तीला महत्वाची भूमिका पार पाडावी लागेल, असेही त्या पुढे म्हणाल्या.

राष्ट्रपतींच्या संपूर्ण भाषणासाठी इथे क्लिक करा.
निलिमा चितळे/राधिका अघोर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2314144)
अभ्यागत कक्ष : 13