राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींच्या हस्ते 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण; अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान


भारतीय चित्रपटसृष्टी भारतीय लोकांची स्वप्ने, परंपरा आणि संघर्ष, तसेच भविष्यातील शक्यतांना रुपेरी पडद्यावर साकार करते: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Posted On: 22 SEP 2026 10:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,22 सप्टेंबर 2026

भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज (22 सप्टेंबर 2026) एकता नगर, केवडिया, गुजरात येथे आयोजित सोहळ्यात 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांनी ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना 2024 या वर्षासाठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला.

याप्रसंगी बोलताना राष्ट्रपतींनी, आपल्या असामान्य प्रतिभा आणि कठोर परिश्रमातून राष्ट्रीय स्तरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या चित्रपटांतील अभिनयामध्ये रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील उत्तम गुणांचा सुंदर मिलाफ दिसून येतो, असे त्या म्हणाल्या. नैसर्गिक, संयमित आणि अस्सल अभिनयासाठी ते ओळखले जातात. भावी पिढ्यांसाठी ते एक आदर्श कलाकार असल्याचेही राष्ट्रपतींनी नमूद केले.

राष्ट्रपती म्हणाल्या की, विविध भाषा आणि प्रदेशांमध्ये निर्माण होणाऱ्या चित्रपटांमधून भारताचे प्रतिबिंब दिसून येते. भारतीय चित्रपटसृष्टी भारतीयांच्या स्वप्नांना, परंपरांना आणि संघर्षांना तसेच भविष्यातील शक्यतांना साकार करते. उत्कृष्ट चित्रपटांचा गौरव करणारा हा सोहळा स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या च्या प्रांगणात, वॉल ऑफ युनिटीजवळ आयोजित केला जात आहे, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. हा प्रसंग भारताच्या ऐक्याचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतींना उजाळा देतो. जणू काही ते स्वतः देशाच्या सांस्कृतिक ऐक्याचा उत्सव साजरा करणाऱ्या या महोत्सवाला आशीर्वाद देत आहेत, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

राष्ट्रपतींनी सर्व पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, ‘आर्टिकल 370’ हा चित्रपट देशाच्या एकात्मतेसमोरील गंभीर आव्हाने आणि त्यांच्या उपायांचे ज्वलंत वर्णन सादर करतो. नॉन-फीचर फिल्म (लघुपट / माहितीपट) ‘भंगार’, जीवन आणि मृत्यू, तसेच अर्थ आणि अर्थहीनतेच्या अपरिचित पैलूंवर भाष्य करतो. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ ही कलाकृती, वीर सावरकरजी यांच्या असामान्य जीवनगाथेला वाहिलेली कलात्मक आदरांजली आहे. ‘भक्षक’ हा चित्रपट महिलांच्या सुरक्षेच्या अत्यंत गंभीर मुद्द्यावर सामाजिक जागरूकता निर्माण करतो. संथाली चित्रपट ‘आंगेन’ ला मिळालेल्या राष्ट्रीय स्तरावरील मान्यतेमुळे एका उत्कृष्ट चित्रपटाला प्रोत्साहन मिळाले असून, सांस्कृतिक विविधता आणि सामाजिक समावेशकतेलाही चालना दिली आहे.

समाज आणि राष्ट्राशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करणाऱ्या चित्रपटांची निवड केल्याबद्दल राष्ट्रपतींनी ज्युरी- निवड समिती सदस्यांचे कौतुक केले. प्रत्येक प्रादेशिक ज्युरींमध्ये महिलांचा सहभाग सुनिश्चित केला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. कोणत्याही क्षेत्रातील निर्णयप्रक्रियेत महिलांचा दृष्टिकोन समाविष्ट केल्यासच व्यापक आणि सर्वसमावेशक मानवी दृष्टिकोन तयार होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रपती म्हणाल्या की, चित्रपटाच्या संघातील प्रत्येक सदस्याबद्दल आदर आणि संवेदनशीलतेची भावना राखणे हा चित्रपटसृष्टीच्या कार्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असला पाहिजे. सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या (क्रिएटिव्ह इकॉनॉमी) प्रमुख प्रतिनिधींनी, कामगार, लहान कलाकार, सहाय्यक आणि संघर्ष करणाऱ्या कलाकारांना योग्य सन्मान आणि सामाजिक सुरक्षा मिळेल, याची खात्री करावी, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रपती म्हणाल्या की, लोकप्रिय चित्रपट कलाकारांचा देशातील जनतेवर, विशेषतः तरुणांवर मोठा प्रभाव असतो. यशस्वी चित्रपट कलाकार जेव्हा शिस्तबद्ध जीवनशैलीचे फायदे सांगतात, तेव्हा लाखो मुले आणि तरुण त्यांचे अनुकरण करतात. त्यामुळे नामांकित मान्यवरांनी (सेलिब्रिटीज) आरोग्यासाठी हानिकारक उत्पादनांचे समर्थन (जाहिरात) करू नये, असे आवाहन त्यांनी केले. खरा तारा  (स्टार-कलाकार) तोच असतो, जो प्रकाश पसरवतो; अंधार नाही, असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रपतींच्या भाषणासाठी कृपया येथे क्लिक करा.


नितीन फुल्लुके/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर 
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2313690) अभ्यागत कक्ष : 11