गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांचा हिंदी दिवस 2026 निमित्त संदेश

Posted On: 14 SEP 2026 1:40PM by PIB Mumbai


नवी दिल्ली, 14 सप्टेंबर 2026

प्रिय देशवासीयांनो,

हिंदी दिवसाच्या निमित्ताने आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

आपला देश हा भाषिक विविधता आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेला एक अनोखा देश आहे. आपल्या देशात विविध भाषा आहेत, ही आपली कमजोरी आहे, असे अनेकजण म्हणतात; मात्र, माझा विश्वास आहे की, इतक्या भाषा असणे हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. प्रत्येक भाषा आपल्यासोबत एक इतिहास, लोकपरंपरा आणि एक वेगळा दृष्टिकोन घेऊन येते. हे सर्व आपल्या युवा पिढीच्या मूल्यांना आणि सांस्कृतिक संस्कारांना पुढे नेण्यासही मदत करतात. ही भाषिक विविधता भारताची ओळख असलेल्या ‘विविधतेत एकता’ या भावनेला बळकटी देते. भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नाही; ती समाजाची स्मृती आणि त्याची आत्मओळख आहे.

या विविधतेमध्ये, देशभरातील विविध वर्ग आणि समुदायांतील लोकांना एकत्र आणत संवाद, संपर्क आणि समन्वयाची भाषा म्हणून हिंदीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सर्व भारतीय भाषांचा आदर, जतन आणि संवर्धन यांसोबतच हिंदीचा विकास झाला, तरच तो खऱ्या अर्थाने सार्थक ठरू शकतो. हिंदी ही कोणत्याही भाषेची प्रतिस्पर्धी नाही; उलट, भारतीय भाषांमध्ये आपलेपणा आणि संवादाची भावना निर्माण करण्यासाठी तसेच राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्यासाठी ती एक महत्त्वाचा दुवा आहे.

या सत्याचा सर्वात सुंदर दाखला आपल्या इतिहासातच आढळतो. स्वामी दयानंद सरस्वतीजी हे मूळचे गुजराती भाषिक होते, तरी त्यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ हिंदीमध्ये लिहिला. महात्मा गांधीजींनी 1918 मध्ये मद्रास येथे दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा स्थापन केली. नेताजी सुभाषचंद्र बोस हे बंगाली भाषिक होते, तरी त्यांनी आझाद हिंद फौजेची संपर्काची भाषा म्हणून हिंदीचा स्वीकार केला आणि देशाला प्रेरणादायी ‘जय हिंद’ ही घोषणा दिली. अशा प्रकारे, विविध भाषिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांनी हिंदीला जनसामान्यांमधील संपर्काची भाषा बनविण्यात सर्वात मोठे योगदान दिले आहे. ज्या महान व्यक्तिमत्त्वांची मातृभाषा हिंदी नव्हती, त्यांच्या या अमूल्य योगदानातून आपल्या सर्वांना आजही प्रेरणा मिळते.

माझी मातृभाषाही गुजराती आहे; परंतु जेव्हा मी देशाच्या कोणत्याही भागात प्रवास करतो, तेव्हा तेथील सामान्य जनतेशी मला थेट जोडणारी भाषा हिंदी असते. हिंदीचा प्रवास पाहिला, तर त्यामध्ये आपल्याला संपूर्ण राष्ट्राचा प्रवास प्रतिबिंबित झालेला दिसतो. आदिकालातील विद्यापतींच्या पदावलीपासून आणि *पृथ्वीराज रासो*च्या वीरगाथांपासून ते भक्तिकालाच्या उल्लेखनीय युगापर्यंत—ज्या काळात तुलसीदासजींनी भगवान रामांची कथा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवली आणि सूरदासजींनी माता-पित्यांच्या वात्सल्यपूर्ण प्रेमाच्या कोमल भावनांना वाचा फोडली.

स्वातंत्र्य चळवळीच्या काळात स्वराज्य, स्वदेशी आणि स्वभाषा या आदर्शांनी राष्ट्रीय चेतनेमध्ये नवी ऊर्जा निर्माण केली. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनाही हे जाणवले होते की, आपल्या भाषेचा आणि अस्मितेचा अभिमान असल्याशिवाय स्वराज्याचे स्वप्न अपूर्ण राहील. स्वातंत्र्यानंतर भारतीय भाषा राष्ट्रनिर्माण, प्रशासन आणि विकासाचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याचे माध्यम बनल्या. हिंदीने इतर सर्व भारतीय भाषांसोबत सामाजिक जागृती, राष्ट्रीय एकात्मता आणि स्वातंत्र्याची संकल्पना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या समृद्ध वारशाला पुढे नेत, संविधान सभेने 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीचा भारत संघराज्याची राजभाषा म्हणून स्वीकार केला.

मात्र, स्वातंत्र्यानंतर एक विरोधाभासही निर्माण झाला. आपण राजकीय स्वातंत्र्य मिळवले, परंतु आपली भाषा, आपली संस्कृती आणि आपला स्वाभिमान यांची मूल्ये दुय्यम ठरवली गेली.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी लाल किल्ल्यावरून देशाला वसाहतवादी मानसिकतेतून मुक्त होण्याचे आवाहन केले आणि यामध्ये भाषेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. राजपथचे कर्तव्य पथमध्ये झालेले रूपांतर हा केवळ नावातील बदल नव्हता. ब्रिटिशांनी लागू केलेल्या वसाहतवादी आणि शिक्षेवर आधारित कायद्यांच्या जागी लोककेंद्रित तीन कायदे—भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम—आणणे हा केवळ शब्दावलीतील बदल नव्हता. हे आपल्या राष्ट्रीय स्वाभिमानाच्या पुनर्स्थापनेचे प्रतीक आहे.

आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेला शिक्षणाच्या केंद्रस्थानी स्थान देण्यात आले आहे. भारतीय भाषांमध्ये अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण दिले जात आहे, तसेच विविध भारतीय भाषांमध्ये स्पर्धा परीक्षा घेण्यात येत आहेत.

८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून विकसित भारताच्या निर्मितीसाठी शक्तीच्या ‘सप्तधारा’—शक्तीच्या सात प्रवाहांचे—आवाहन केले. सातवा प्रवाह म्हणजे भारताची सॉफ्ट पॉवर. कोणत्याही राष्ट्राच्या सॉफ्ट पॉवरचा सर्वात मोठा वाहक म्हणजे त्याची भाषा. योग, आयुर्वेद, साहित्य, चित्रपट आणि आपली सांस्कृतिक शक्ती—हे सर्व आपल्या भाषांच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचतात.

एकेकाळी अशी चिंता व्यक्त केली जात होती की, तंत्रज्ञानाच्या युगात भारतीय भाषा मागे पडू शकतात. मात्र, मोदी सरकारच्या काळात हिंदीसह सर्व भारतीय भाषा तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या सुवर्णयुगाचा अनुभव घेत आहेत.

राजभाषा विभागाने विकसित केलेले कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘भारती’ साधन आज भारतीय भाषांमधील संवाद अधिक सुलभ बनवत आहे. ‘हिंदी शब्द सिंधु’ या 8 लाख 27 हजारांहून अधिक नोंदी असलेल्या डिजिटल शब्दकोशाने ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी एक समृद्ध व्यासपीठ म्हणून स्थान निर्माण केले आहे. 2024 मध्ये स्थापन करण्यात आलेला ‘भारतीय भाषा विभाग’ भारतीय भाषांमध्ये प्रशासकीय संवाद सुलभ करत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भाषांतर तंत्रज्ञानामुळे भाषेच्या अडथळ्यांवर मात करणे शक्य झाले आहे. आज प्रत्येक भारतीय आपल्या मातृभाषेत विचार करू शकतो आणि संपूर्ण जगाशी संवाद साधू शकतो. त्याचबरोबर, मोदी सरकारच्या कार्यकाळात राजभाषा संसदीय समितीने आपल्या अहवालांचे चार नवीन खंड माननीय राष्ट्रपतींकडे सादर केले आहेत.

शेवटी, मला युवकांना काही सांगायचे आहे.

जगातील तुम्हाला शक्य तितक्या भाषा शिका; परंतु आपली स्वतःची भाषा कधीही सोडू नका. देशभरातील सर्व पालकांनाही मी आवाहन करतो की, आपल्या मुलांशी मातृभाषेत संवाद साधण्याचा कटाक्षाने प्रयत्न करा. “मी माझ्या भाषेत बोललो, तर मला कनिष्ठ समजले जाईल,” असा विचार करण्यापेक्षा मोठा न्यूनगंड दुसरा कोणताही असू शकत नाही.

भाषाच आपल्याला आपल्या आईशी, आपल्या मातीशी, आपल्या इतिहासाशी आणि आपल्या संस्कृतीशी जोडते. यावर्षी राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या रचनेचे 150वे वर्ष देखील आहे—असे गीत, ज्याने भाषेचे स्वातंत्र्याच्या शस्त्रामध्ये रूपांतर केले.

चला, या निमित्ताने आपण संकल्प करूया की, 2047 पर्यंत विकसित भारताच्या निर्मितीच्या आपल्या प्रवासात हिंदी आणि सर्व भारतीय भाषांना सामर्थ्यशाली साधने बनवूया.

राजभाषा दिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. वंदे मातरम्!

नितीन फुल्लुके/ हेमांगी काणेकर/प्रिती मालंडकर
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2310025) अभ्यागत कक्ष : 9