कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत-मलेशिया द्विपक्षीय बैठक


भारताने मलेशिया, तिमोर-लेस्ते आणि म्यानमार यांच्यासोबत कृषी सहकार्य अधिक मजबूत केले

शिवराज सिंह चौहान यांनी कृषी क्षेत्रातील भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी मलेशिया, तिमोर-लेस्ते आणि म्यानमारच्या प्रतिनिधींशी द्विपक्षीय चर्चा केली

भारत आसियान भागीदारांसोबत कृषी संशोधन, नवोन्मेष, व्यापार आणि अन्नसुरक्षा या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नवीन संधींची चाचपणी करत आहे

Posted On: 10 SEP 2026 3:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2026

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आणि मलेशियाचे कृषी आणि अन्नसुरक्षा मंत्री महामहिम मोहम्मद बिन साबू यांच्यात नवी दिल्ली येथे 9 सप्टेंबर 2026 रोजी एक बैठक झाली. कृषी संशोधन विभाग (डीएआरई) / 'भारतीय कृषी संशोधन परिषद' (आयसीएआर) यांच्या वतीने 8-9 सप्टेंबर  2026 दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित '9 व्या आसियान-भारत कृषी आणि वनीकरण मंत्रीस्तरीय बैठकी' दरम्यान ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

उभय मंत्र्यांनी ज्ञान, कौशल्य आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्याचे महत्व नमूद केले आणि कृषी व संलग्न क्षेत्रांमधील परस्पर हिताच्या बाबींमध्ये सहकार्यासाठी एक संस्थात्मक चौकट उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सामंजस्य कराराच्या  माध्यमातून संयुक्त कृषी संशोधन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत रुची दाखवली. दोन्ही मंत्र्यांनी नमूद केले की, भारत व मलेशिया यांच्यात कृषी आणि संबंधित बाबींमध्ये  घनिष्ठ आणि मजबूत भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी, जर्मप्लाझमची देवाणघेवाण, व्यापार आणि बाजारपेठ उपलब्धतेशी संबंधित द्विपक्षीय मुद्द्यांवर तोडगा परस्पर सहकार्यातून काढता येऊ शकतो.

या बैठकीत भारताकडून डॉ. एम. एल. जाट , सचिव, डीएआरई आणि महासंचालक, आयसीएआर ,  ज्ञानेंद्र देव त्रिपाठी (अतिरिक्त सचिव, डीएआरई आणि महासंचालक, आयसीएआर,  ए. के. साहू, सहसचिव - आंतरराष्ट्रीय सहकार्य, DoAFW, आयसीएआरचे सर्व उप-महासंचालक आणि डॉ. नवीन पी. सिंग (ADG - आंतरराष्ट्रीय संबंध, ICAR) यांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय संबंधांचे पथक उपस्थित होते. 

भारत-तिमोर-लेस्ते द्विपक्षीय बैठक

नवी दिल्ली येथे 8-9  सप्टेंबर 2026 दरम्यान कृषी संशोधन विभाग (DARE) / भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) द्वारे आयोजित '9 व्या आसियान-भारत कृषी आणि वनीकरण मंत्रीस्तरीय बैठकी'च्या पार्श्वभूमीवर, 9 सप्टेंबर 2026 रोजी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री  शिवराज सिंह चौहान आणि तिमोर-लेस्तेचे कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय आणि वनीकरण मंत्री महामहिम  मार्कोस दा क्रूझ यांच्यात बैठक झाली.

तिमोर-लेस्तेच्या मंत्र्यांनी कृषी क्षेत्रातील विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि देशाची अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उभय देशांदरम्यान एक मजबूत संस्थात्मक यंत्रणा उभारण्याबाबत स्वारस्य दर्शवले.  भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी, शास्त्रज्ञ व तज्ज्ञांची देवाणघेवाण आणि मनुष्यबळ  विकास यांद्वारे तिमोर-लेस्तेच्या कृषी संशोधन व नवोन्मेष  क्षमता वाढवण्यास मदत करण्यासाठी भारताच्या सर्वोत्तम कार्यपद्धती  सामायिक करण्याप्रति भारत सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.

भारत सरकारने कृषी, वनीकरण, पशुसंवर्धन आणि मत्स्यशेती या क्षेत्रांतील प्रत्यक्ष परिस्थिती आणि आव्हानांचा आढावा घेण्यासाठी तसेच तांत्रिक शिफारसी करण्यासाठी तांत्रिक व वैज्ञानिक तज्ज्ञांचे एक पथक तैनात करण्याबाबत विचार करावा अशी इच्छा तिमोर-लेस्तेच्या मंत्र्यांनी व्यक्त केली.

या बैठकीला  भारताकडून डॉ. एम. एल. जाट , सचिव, डीएआरई आणि महासंचालक, आयसीएआर ,  ज्ञानेंद्र देव त्रिपाठी (अतिरिक्त सचिव, डीएआरई आणि महासंचालक, आयसीएआर ,  ए. के. साहू ,सहसचिव - आंतरराष्ट्रीय सहकार्य, DoAFW, आयसीएआर चे सर्व उप-महासंचालक आणि डॉ. नवीन पी. सिंग (ADG - आंतरराष्ट्रीय संबंध, ICAR) यांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय संबंधांचे पथक उपस्थित होते.

भारत-म्यानमार द्विपक्षीय बैठक

नवी दिल्ली येथे 8-9  सप्टेंबर 2026  या कालावधीत कृषी संशोधन विभाग  / भारतीय कृषी संशोधन परिषद द्वारे आयोजित '9 व्या आसियान-भारत कृषी आणि वनीकरण मंत्रीस्तरीय बैठकी'च्या  निमित्ताने, 9  सप्टेंबर 2026 रोजी भारत सरकारचे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आणि म्यानमारचे कृषी, पशुसंवर्धन आणि सिंचन मंत्री महामहिम मिन नाऊंग यांच्यात बैठक झाली.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्यानमारच्या मंत्र्यांचे स्वागत केले. दोन्ही देशांमधील लोकांमध्ये दीर्घकाळापासून दृढ सांस्कृतिक संबंध आहेत तसेच भारताशी सुमारे 1600  किमीची सीमा सामायिक करत असल्याने म्यानमार हा भारताचा एक जवळचा भागीदार देश आहे. कृषी आणि संबंधित क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही देशांमधील सामंजस्य कराराची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर असल्याचेही मंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

उभय मंत्र्यांनी  दोन्ही देशांमधील व्यापाराच्या शक्यतांवर चर्चा केली. तसेच, परस्पर संमतीने  निश्चित केलेल्या क्षेत्रांमधील मजबूत भागीदारीमुळे कडधान्ये, कापूस, दुग्धविकास आणि कृषी शिक्षण यांसारख्या कृषी-संबंधित उत्पादनांचा व्यापार वाढवण्यास एकमेकांना मदत होईल, असे नमूद केले. म्यानमारकडून ,  दोन्ही देशांमधील आर्थिक आणि कृषी संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने देशातील गुंतवणुकीच्या अनुकूल संधींवर लक्ष केंद्रित करण्याबाबत सुचवण्यात आले.

या बैठकीला  भारताकडून डॉ. एम. एल. जाट , सचिव, डीएआरई आणि महासंचालक, आयसीएआर ,  ज्ञानेंद्र देव त्रिपाठी (अतिरिक्त सचिव, डीएआरई आणि महासंचालक, आयसीएआर ,  ए. के. साहू ,सहसचिव - आंतरराष्ट्रीय सहकार्य, DoAFW, आयसीएआर चे सर्व उप-महासंचालक आणि डॉ. नवीन पी. सिंग (ADG - आंतरराष्ट्रीय संबंध, ICAR) यांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय संबंधांचे पथक उपस्थित होते.

नेहा कुलकर्णी/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2308692) अभ्यागत कक्ष : 7