संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्र्यांनी कोलंबो इथे श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली सदिच्छा भेट


सर्वात जवळचा मित्र आणि शेजारी म्हणून, प्रथम प्रतिसादकर्ता या नात्याने मदत करणे भारत आपली जबाबदारी मानतो आणि ती यापुढेही सुरू ठेवेल: राजनाथ सिंह

श्रीलंका आपल्या भूभागाचा वापर भारताच्या सुरक्षा हितांना बाधा पोहोचवणाऱ्या उपक्रमांसाठी कधीही करू देणार नाही: अनुरा कुमारा दिसानायके

Posted On: 09 SEP 2026 4:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2026

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 09 सप्टेंबर 2026 रोजी कोलंबो इथे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांची भेट घेतली. पारंपारिक स्नेहाचे संबंध आणि परस्पर विश्वास यावर आधारित असलेल्या दोन्ही देशांमधल्या बहुआयामी भागीदारीच्या संपूर्ण पटाचा समावेश असलेल्या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाली.

सांस्कृतिक समान बंध असलेले देश, जवळचे शेजारी आणि सागरी भागीदार म्हणून, भारत आणि श्रीलंका प्रदेशाची सुरक्षा, शांतता आणि समृद्धी निश्चित करण्यासाठी संयुक्तपणे काम करत असताना, दोन्ही देश आपापल्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी एकत्र काम करत राहतील, याचा दोन्ही बाजूंनी पुनरुच्चार केला. संरक्षण मंत्र्यांनी पंतप्रधान

नरेंद्र मोदी यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या आणि दोन्ही देशांचे नागरिक मजबूत ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध तसेच जनतेच्या परस्पर संवादावर आधारित दृढ मैत्रीची जोपासना करतात, हे अधोरेखित केले.

संरक्षण मंत्र्यांचे आपुलकीने स्वागत करताना, राष्ट्राध्यक्ष दिसानायके यांनी पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या आपल्या संवादाची आठवण काढली आणि श्रीलंका आपल्या भूभागाचा वापर भारताच्या सुरक्षा हितांच्या विरोधातील कोणत्याही उपक्रमांसाठी कधीही करू देणार नाही, याचा पुनरुच्चार केला.

'दितवाह' चक्रीवादळाच्या वेळी 'ऑपरेशन सागर बंधू'चा भाग म्हणून भारताने पुरवलेल्या मदतकार्याबद्दल आणि श्रीलंकेच्या विविध भागांमध्ये पुनर्बांधणी  आणि पुनर्वसन सुलभ करण्यासाठी भारताने दिलेल्या सर्वसमावेशक पुनर्वसन पॅकेज बद्दल राष्ट्राध्यक्ष दिसानायके यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

दोन्ही नेत्यांनी भारतीय संरक्षण दलाने उभारलेल्या तीन 'बेली पुलाचे' दूरस्थ उद्घाटन केले. श्रीलंकेच्या हवाई दलासाठी एल 70 बंदुकींचे अद्ययावतीकरण आणि दोन्ही देशांचे नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजेस (NDC) यांच्यातल्या सहकार्याबाबत दोन्ही बाजूंनी सामंजस्य करारांची देवाणघेवाण करण्यात आली. श्रीलंकेच्या हवाई दलासाठी सहा एल 70 बंदुकींच्या अद्ययावतीकरणाचा सामंजस्य करार भारत सरकारच्या अनुदानांतर्गत येतो.

एनडीसी भारत आणि एनडीसी श्रीलंका यांच्यातल्या शैक्षणिक सहकार्यासंबंधी सामंजस्य करारामुळे ज्ञानाची देवाणघेवाण सुलभ होईल, ते दोन्ही भगिनी संस्थांमधले शैक्षणिक बंध अधिक घट्ट करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. एनसीसी सहकार्यासंबंधी सामंजस्य करारामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यात एनसीसी युवा देवाणघेवाण कार्यक्रमाला औपचारिक रूप मिळेल. हा देवाणघेवाण कार्यक्रम जगभरातल्या अनेक देशांमधल्या एनसीसी कॅडेट्सना दरवर्षी नवी दिल्लीत येऊन एनसीसीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची बहुमोल संधी उपलब्ध करून देतो.

निलीमा चितळे/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2308284) अभ्यागत कक्ष : 14