पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्यांशी साधला संवाद


राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी 82 शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांची निवड,

विद्यार्थ्यांमधील अमली पदार्थांच्या व्यसनाबाबत जागरूक राहून त्यांना व्यसनमुक्तीसाठी मदत करण्याचे पंतप्रधानांचे शिक्षकांना आवाहन;

क्रीडा, मैदानी खेळ आणि सर्जनशील उपक्रमांतून मुलांचा वाढता स्क्रीनटाइम कमी करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन;

मुलांचे बालपण जपत त्यांच्या नैसर्गिक जिज्ञासेला प्रोत्साहन द्या, पंतप्रधानांचे शिक्षकांना आवाहन;

वर्गातील अध्ययन अधिक रंजक आणि परिणामकारक करण्यासाठी शिक्षकांनी अवलंबलेल्या सर्जनशील पद्धती केल्या सामायिक,

Posted On: 05 SEP 2026 12:23AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांशी संवाद साधला. यंदा तीन विभागांमधून 82 शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातील 48 शिक्षक, उच्च शिक्षण संस्था आणि पॉलिटेक्निकमधील 21 शिक्षक आणि प्राध्यापक, तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयातील 13 कौशल्य प्रशिक्षकांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्या शिक्षकांनी त्यांच्या अध्यापनाचे अनुभव आणि त्यांनी केलेल्या नवकल्पना याबद्दल माहिती दिली. वर्गातील अध्ययन अधिक रंजक आणि परिणामकारक करण्यासाठी त्यांनी अवलंबलेल्या अनेक सर्जनशील पद्धतीही त्यांनी सामायिक केल्या.

शिक्षकांनी केवळ मुलांच्या शैक्षणिक कामगिरीकडे न पाहता, त्यांच्या वर्तनाकडे आणि दैनंदिन जीवनाकडेही लक्ष दिले पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. पारंपरिक संयुक्त कुटुंब पद्धत कमी होत असल्याचा उल्लेख करताना, मुलांच्या जीवनात शिक्षकांची भूमिका आता अधिक महत्त्वाची झाली आहे, असे त्यांनी सांगितले. अमली पदार्थांच्या व्यसनाच्या समस्येचा उल्लेख करत, मुलांच्या वर्तनात होणाऱ्या बदलांकडे शिक्षकांनी जागरूकपणे लक्ष द्यावे, या बदलामागचे कारण ओळखावे आणि अशा मुलांना या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी मदत करावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

मुलांच्या बालपणातील निरागसता जपणे ही शिक्षकांची महत्त्वाची भूमिका आहे, पंतप्रधानांनी सांगितले. सर्व मुलांचा मूलभूत स्वभाव आणि जिज्ञासा सारखीच असते, शिक्षकांनी या जिज्ञासेला योग्य प्रकारे प्रोत्साहन देऊन तिला योग्य दिशा दिल्यास, मुलांच्या विकासात ते महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

मुलांचा वाढता स्क्रीन टाइम ही मोठी चिंतेची बाब बनली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. मुले स्क्रीनवर किती वेळ घालवतात आणि रात्री उशिरापर्यंत मोबाईल फोन वापरत राहतात का, याबाबत शिक्षकांनी पालकांशी संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी केले. मुलांना क्रीडा, मैदानी खेळ आणि सर्जनशील उपक्रमांमध्ये रस निर्माण करून दिल्यास, त्यांना हळूहळू अतिप्रमाणात स्क्रीन वापरण्याच्या सवयीतून बाहेर पडण्यास मदत होऊ शकते, असे पंतप्रधानांनी सुचवले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा संदर्भ देत, मुलांना वर्गाबाहेर नेऊन त्यांना प्रत्यक्ष जीवनातील कौशल्ये आणि विविध प्रकारच्या कामांशी जोडण्याचे महत्त्व पंतप्रधानांनीअधोरेखित केले. शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रमातील ज्ञान देण्यापुरते मर्यादित न राहता, मुलांमध्ये श्रमप्रतिष्ठेसारखी मूल्ये रुजवण्यासाठीही प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

 

 * * *

शैलेश पाटील/राज दळेकर//दर्शना राणे


(Release ID: 2306901) अभ्यागत कक्ष : 9