माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या अखत्यारितील भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि पुण्‍याची भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चलचित्रपट : संवर्धन, संग्रहण, डिजीटायझेशन आणि पुनर्प्राप्ती या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन

Posted On: 03 SEP 2026 8:00PM by PIB Mumbai

मुंबई/पुणे, 3 सप्‍टेंबर 2026

 

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या अखत्यारितील भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफडीसी -एनएफएआय) आणि पुणे इथल्या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या संकुलात चलचित्रपट : संवर्धन, संग्रहण, डिजीटायझेशन आणि पुनर्प्राप्ती या विषयावर एक विशेष कार्यशाळा आयोजित केली जाणार आहे. येत्या 05 ते 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत (शनिवार आणि रविवार वगळून) ही कार्यशाळा होईल.

ही कार्यशाळा विद्यार्थी, या क्षेत्रातले उदयोन्मुख व्यावसायिक तज्ञ, संशोधक तसेच चित्रपट संवर्धन, संग्रहण, पुनर्प्राप्ती, चित्रपट तंत्रज्ञान आणि दृकश्राव्य वारशाच्या क्षेत्रात रस असलेल्यांसाठी उपयुक्त ठरेल अशारितीने या कार्यशाळेची आखणी आखण्यात आली आहे. या कार्यशाळेअंतर्गत वर्गखोल्यांमधील सत्रे, प्रात्यक्षिके, प्रत्यक्ष कामातून प्रशिक्षण, संस्थात्मक भेटी आणि संग्रहित तसेच पुनर्प्राप्त केलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून सहभागींना चलचित्रपटांचे संवर्धन करण्यामागची कला, विज्ञान आणि प्रक्रिया समजून घेता येणार आहे.

या उपक्रमांतर्गत चित्रपट रीळांचे संवर्धन, मेटाडेटा, डिजिटल संवर्धन, चित्रपट रीळांचे प्रकार आणि मूलभूत तत्वे, प्रतिबंधात्मक संवर्धन, चित्रपटांच्या रिळांची डिजिटल पुनर्प्राप्ती, कागदी साहित्याचे संवर्धन आणि संबंधीत निर्मितीतील आवाज पुन्हा मिळवणे यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा अंतर्भाव असणार आहे. प्रात्यक्षिका़च्या सत्रांमध्ये चित्रपट रीळांचे प्रकार ओळखणे, तपासणी - परीक्षण आणि दुरुस्ती, चित्रपटाची रीळ हाताने स्वच्छ करणे, चित्रपट रीळांना सेल्युलॉईड आणि डिजिटल माध्यमातून मोठे करून दाखवणे (Projection), स्कॅनिंग आणि डिजिटायझेशन यांचा समावेश असेल. सहभागींना चित्रपट रीळांचे स्कॅनर, दृकश्राव्य निर्मितींचे स्कॅनिंग, साठवणुकीच्या गरजा, कलर ग्रेडिंग आणि गुणवत्ता नियंत्रण याबद्दलही माहिती दिली जाणार आहे.

सहभागींना राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या अखत्यारितील भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या कार्यपद्धतीचा आणि तिथल्या सुविधांचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल. याअंतर्गत त्यांना ग्रंथालय तसेच साठवणूकीचे कप्पे - खण, दस्तऐवजीकरण आणि प्रक्षेप कक्ष (Projection Room) पाहता येतील. या कार्यशाळेला प्रसाद कॉर्प या संस्थेचेही सहकार्य असणार आहे. त्यांच्यावतीने सहभागींना व्यावसायिक तज्ञतेच्या पुनर्प्राप्ती कार्यपद्धतीचा अनुभवदेखील घेता येणार आहे. प्रसाद कॉर्प ही चित्रपट रीळांची दुरुस्ती, संवर्धन आणि डिजिटल पुनर्प्राप्ती यासाठी आपल्याकडील तांत्रिक ज्ञान आणि उपकरणांच्या माध्यमातून सहकार्य देणार आहे.

या कार्यक्रमात एनएफडीसी-नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडिया, एफटीआयआय, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्काइव्ह्ज येथील संस्थात्मक भेटींचा समावेश असेल. या भेटींमुळे सहभागींना अभिलेखीय संग्रहांचे जतन, दस्तऐवजीकरण, संवर्धन आणि व्यवस्थापन करण्याच्या विविध पद्धतींची ओळख होईल.

थाई फिल्म अर्काइव्हच्या कार्यपद्धतींवरील एका विशेष सत्राद्वारे आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन उपलब्ध करून दिला जाईल. संग्रहित आणि पुनर्स्थापित चित्रपटांचे प्रदर्शन, तसेच 35 मिमी आणि डिजिटल स्वरूपातील सादरीकरणे हे देखील या कार्यक्रमाचे महत्त्वाचे भाग असतील.

या उपक्रमाविषयी बोलताना एफटीआयआयचे कुलगुरू धीरज सिंह म्हणाले की, हा कार्यक्रम चित्रपट शिक्षण आणि चित्रपट वारशाचे जतन यांना एकत्र आणणारा असून तो सहभागींना शैक्षणिक शिक्षण, प्रत्यक्ष अनुभव व विशेष सुविधा उपलब्ध करून देईल. 

एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम म्हणाले की, या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना आणि भावी व्यावसायिकांना संस्थात्मक अनुभव आणि  विशेष कौशल्ये प्रदान करणे तसेच चित्रपट जतन करण्यामध्ये अधिक रुची निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे.

प्रसाद कॉर्पचे संचालक आणि सीटीओ अभिषेक प्रसाद म्हणाले की, या सहकार्यामुळे उद्योग क्षेत्रातील अनुभव आणि तंत्रज्ञान यांची देवाणघेवाण होऊन जतन व्यावसायिकांची पुढची पिढी घडवण्यास मदत होईल.

हा अभ्यासक्रम अभ्यासक्रम संचालक, अपर्णा सुब्रमण्यन यांच्या नेतृत्वाखाली होईल आणि यासाठी 24 सहभागींची कमाल प्रवेश क्षमता आहे. अभ्यासक्रमाचे शुल्क प्रति सहभागी ₹12,000 आहे.

इच्छुक उमेदवार नोंदणी आणि अधिक माहितीसाठी एफटीआय आय शी 020-2553 0085 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात किंवा info.cfol@ftii.ac.in / fro@ftii.ac.in या ईमेल आयडीवर लिहू शकतात.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2306538) अभ्यागत कक्ष : 15