राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे एनआयएफटीच्या 18 कॅम्पसचा संयुक्त दीक्षांत समारंभ संपन्न
Posted On:
31 AUG 2026 5:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (31 ऑगस्ट 2026) नवी दिल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) च्या 18 कॅम्पसच्या संयुक्त दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिल्या.
वस्त्रोद्योग आणि पोशाख क्षेत्र हे केवळ आपल्या सांस्कृतिक वारशाचा भाग नाही, तर ते लाखो लोकांच्या उपजीविकेचा आधार देखील असल्याचे, राष्ट्रपती या कार्यक्रमात म्हणाल्या. जर पारंपरिक कारागिरांना योग्य पाठबळ आणि मार्गदर्शन मिळाले, तर त्यांच्या पुढील पिढ्यांनाही अभिमान आणि आत्मविश्वासाने या व्यवसायात टिकून राहण्यास प्रोत्साहन मिळेल, असे त्यांनी अधोरेखित केले.

आज आपला देश पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वासाने जागतिक पटलावर आपली भूमिका विस्तारत आहे, असे त्यांनी सांगितले. फॅशन टेक्नॉलॉजी हे देखील भारताचा जागतिक प्रभाव वाढवण्याची प्रचंड क्षमता असलेले एक क्षेत्र आहे, असे त्या म्हणाल्या. पदवीधर विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. या प्रयत्नात विद्यार्थ्यांनी जागतिक दृष्टिकोन स्वीकारताना आपल्या मुळांशी आणि आपल्या संस्कृतीच्या मूलभूत मूल्यांशी घट्ट जोडलेले राहावे, असे त्यांनी सांगितले. यातून ते केवळ यशस्वी व्यावसायिकच बनणार नाहीत, तर भारताच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासही हातभार लावतील, असे त्या म्हणाल्या.

विद्यार्थ्यांनी जागतिक दर्जाची उत्पादने आणि ब्रँड्स तयार करावेत, मात्र ते पर्यावरणपूरक असतील याचीही त्यांनी काळजी घ्यावी, असे राष्ट्रपती म्हणाल्या. उत्पादनांसाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या कच्च्या मालाचा वापर करणे हे पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल, असे त्यांनी नमूद केले. उत्पादन प्रक्रियेत उरलेले अवशेष कचरा म्हणून फेकून देऊ नयेत; त्यांना एक नवीन रूप, नवीन उपयोगिता आणि नवीन मूल्य दिले जाऊ शकते, हे त्यांनी स्पष्ट केले. एनआयएफटीच्या धोरणकर्त्यांनी संस्थेच्या धोरणात्मक आराखड्यात शाश्वतता आणि सामाजिक जबाबदारीला महत्त्वपूर्ण स्थान दिले आहे, हे पाहून त्यांना आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. वस्त्रोद्योग आणि तयार कपड्यांच्या क्षेत्रातील शाश्वत भविष्यासाठीच्या प्रयत्नांशी सुसंगत राहून, चक्रीय अर्थव्यवस्थेच्या पद्धतींना व्यापक आणि फायदेशीर बनवण्यासाठी एनआयएफटी प्रभावी पावले उचलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
* * *
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2305093)
अभ्यागत कक्ष : 10