ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ग्राहक व्यवहार विभागाकडून भारतीय प्रमाणवेळेसंदर्भात नवे नियम अधिसूचित


देशभरात भारतीय प्रमाणवेळ समान वेळ संदर्भ म्हणून निश्चित; नवे नियम 180 दिवसांनंतर लागू

Posted On: 30 AUG 2026 1:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑगस्‍ट 2026

 

ग्राहक व्यवहार विभागाने 27 ऑगस्ट 2026 रोजी कायदेशीर मापनशास्त्र (भारतीय प्रमाणवेळ) नियम, 2026 अधिसूचित केले आहेत. हे नियम राजपत्रात प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून 180 दिवसांनी लागू होतील. या नियमांनुसार, कायदेशीर, प्रशासकीय, व्यावसायिक आणि इतर अधिकृत कारणांसाठी संपूर्ण देशात भारतीय प्रमाणवेळ ही समान वेळ संदर्भ म्हणून निश्चित करण्यात आली आहे. नियम लागू होण्यापूर्वी 180 दिवसांच्या कालावधीत सरकारी विभाग, व्यवसाय, संस्था आणि इतर संघटनांना त्यांच्या प्रणालींमध्ये आवश्यक ते बदल करता येणार आहेत.

डिजिटल आणि तंत्रज्ञानाधारित प्रणालींचा वाढता वापर लक्षात घेता, समान वेळ संदर्भाची गरज वाढली आहे. बँकिंग आणि डिजिटल पेमेंट, दूरसंचार, रेल्वे, वीज व्यवस्था, संगणक नेटवर्क आणि सरकारी नोंदी या सर्व गोष्टी अचूक वेळ आणि वेळेच्या नोंदींवर अवलंबून असतात. वेळेच्या विविध स्रोतांमध्ये फरक असल्यास, अशा कामांचे समन्वय आणि नोंदणी यावर परिणाम होऊ शकतो. देशभरातील महत्त्वाच्या प्रणालींमध्ये अचूक आणि एकसमान भारतीय प्रमाणवेळेचा वापर सुनिश्चित करणे, हा या नियमांचा उद्देश आहे.

या समान वेळ संदर्भामुळे पुढील बाबी अधिक अचूक आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे : 

  • बँकिंग आणि डिजिटल पेमेंट व्यवहारांची वेळ अचूकपणे नोंदवणे.
  • रेल्वे, विमानतळ आणि इतर वाहतूक व्यवस्थांमध्ये समन्वय साधणे;
  • दूरसंचार आणि इंटरनेट नेटवर्कचे सुरळीत आणि विश्वासार्ह संचालन;
  • वीज व्यवस्थेत अचूक वेळेची नोंद ठेवणे;
  • सरकारी आणि कायदेशीर नोंदी अचूकपणे जतन करणे;
  • आपत्कालीन आणि इतर आवश्यक सेवांमध्ये समन्वय साधणे.
  • भारतीय वेळ स्रोतांचा वापर

भारत सरकार भारतीय संस्था आणि कायदेशीर मापनशास्त्र प्रयोगशाळांच्या माध्यमातून देशभर अचूक भारतीय प्रमाणवेळ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करत आहे. विश्वासार्ह आणि सुरक्षित पद्धतीने वेळ उपलब्ध करून देण्यासाठी भारताची उपग्रह आधारित दिशादर्शक प्रणाली ‘नाविक’ तसेच इतर मान्यताप्राप्त भारतीय वेळ स्रोतांचा वापर करण्याची तरतूदही या नियमांमध्ये करण्यात आली आहे. सध्या अनेक प्रणाली परदेशी उपग्रह आधारित वेळ स्रोतांचा वापर करतात. भारतीय वेळ उपलब्ध करून देण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित केल्यामुळे महत्त्वाच्या प्रणालींसाठी अतिरिक्त पर्याय उपलब्ध होतील आणि बाह्य वेळ स्रोतांवरील अवलंबित्व कमी होईल.

व्हाईट रॅबिट तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक

एक देश, एक वेळ या उपक्रमांतर्गत व्हाईट रॅबिट तंत्रज्ञानावर आधारित भारतीय प्रमाणवेळ प्रसार प्रात्यक्षिक नेटवर्क जुलै 2026 मध्ये प्रादेशिक संदर्भ प्रमाण प्रयोगशाळा अर्थात आरआरएसएल, बेंगळुरू येथे कार्यान्वित करण्यात आले. या प्रणालीद्वारे बँकिंग, दूरसंचार, वीज, वाहतूक आणि डिजिटल प्रशासन यांसारख्या क्षेत्रांसाठी भारतीय प्रमाणवेळ उपलब्ध करून देण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले आहे. तसेच सीएसआयआर-एनपीएल, इस्रो, सेबी, एनएसई, बीएसएनएल आणि इतर संबंधित संस्थांच्या सहकार्याने, आरआरएसएल बेंगळुरू आणि एनएसई चेन्नई यांच्यामध्ये भारतीय प्रमाणवेळेचा सुरक्षित पद्धतीने प्रसार करण्याचेही प्रात्यक्षिक सादर करण्यात आले आहे.

नियम लागू होण्यापूर्वीचा 180 दिवसांचा कालावधी संबंधित घटकांना त्यांच्या विद्यमान प्रणालींचा आढावा घेण्यासाठी, आवश्यक तांत्रिक बदल करण्यासाठी आणि नियमांच्या अंमलबजावणीची तयारी करण्यासाठी वेळ उपलब्ध करून देईल. कायदेशीर मापनशास्त्र (भारतीय प्रमाणवेळ) नियम, 2026 मुळे देशभरातील वेळेवर आधारित प्रणाली आणि अधिकृत कामकाजासाठी भारतीय प्रमाणवेळेचा एक समान संदर्भ उपलब्ध होईल.

 

* * *

हर्षल आकुडे/राज दळेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2304646) अभ्यागत कक्ष : 13