युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ब्रिक्स युवा मंत्र्यांची बैठक 2026 विशाखापट्टणम येथे संपन्न, संयुक्त निवेदन स्वीकारले


डॉ. मनसुख मांडविया आणि रक्षा निखिल खडसे यांनी केले ब्रिक्स युवा मंत्र्यांच्या बैठकीचे नेतृत्व

युवकांच्या सहकार्याला आणि विकासातील सहभागाला बळकटी देण्यासाठीच्या संयुक्त निवेदनाचा ब्रिक्स  देशांच्या युवा मंत्र्यांकडून स्वीकार

प्रविष्टि तिथि: 22 AUG 2026 6:49PM by PIB Mumbai

 

भारत सरकारच्या युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवा व्यवहार विभागातर्फे आयोजित 'ब्रिक्स युवा मंत्र्यांची बैठक' शनिवारी, 22 ऑगस्ट 2026 रोजी विशाखापट्टणम येथे यशस्वीरीत्या पार पडली.
या बैठकीचे अध्यक्षपद केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी भूषवले. या वेळी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे आणि युवा व्यवहार विभागाचे सचिव सुनील पालीवाल हे देखील उपस्थित होते.

या बैठकीतील चर्चा 'ब्रिक्स युवा परिषद' आणि 'ब्रिक्स युवा शिखर परिषदे'तील निष्कर्षांवर आधारित होती. या बैठकीच्या पूर्वसंध्येला झालेल्या संवादातून समोर आलेल्या शिफारशी आणि दृष्टिकोन यांनी मंत्रिमंडळ स्तरावरील चर्चेचा मुख्य पाया रचला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही, भारत जेव्हा स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण करेल, त्या 2047 या वर्षासाठीचे 'व्हिजन डॉक्युमेंट' तयार केले आहे. या ध्येयाची प्राप्ती करण्यासाठी आणि देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 1,00,000 सक्षम तरुण नेत्यांची फळी तयार करण्याचे स्पष्ट आवाहन पंतप्रधानांनी केले आहे, असे मांडविया यावेळी म्हणाले.

“त्यामुळेच, याच भावनेने आम्ही अनेक उपक्रम सुरू केले आहेत. आम्ही स्वयंसेवा, शिक्षण, नेतृत्व आणि नागरी सहभागासाठी एकल-खिडकी मंच म्हणून ‘माय भारत’ची स्थापना केली आहे. आज, 2.5 कोटींपेक्षा जास्त तरुणांनी नोंदणी केली असून ते या मंचावर सक्रियपणे सहभागी होत आहेत,” असे डॉ. मांडविया यांनी सांगितले.

या उपक्रमांमध्ये ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांमधील युवा प्रतिनिधी, तरुण नेते, धोरणकर्ते आणि वरिष्ठ अधिकारी एकत्र आले. यामुळे तरुणांसाठी महत्त्वाच्या असलेल्या विषयांवर संवाद, अनुभवांची देवाणघेवाण आणि सहयोगी कृतीसाठी मंच उपलब्ध झाला.

चांगले भविष्य घडवण्यासाठी तरुणांसोबत भागीदारी करण्याच्या गरजेवर केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांनी अधिक भर दिला. “भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या काळात आमचा दृष्टिकोन स्पष्ट राहिला आहे की तरुणांना केवळ लाभार्थी म्हणून नव्हे, तर आपले सामायिक भविष्य घडवण्यात सक्रिय भागीदार म्हणून मान्यता मिळाली पाहिजे. चला, आपण युवा सहभागाकडून युवा भागीदारीकडे; सल्लामसलतीकडून सह-निर्मितीकडे; तरुणांसाठीच्या कार्यक्रमांकडून तरुणांसोबत तयार केलेल्या मंचाकडे वाटचाल करूया. चला, आपण सर्व मिळून एक असा ब्रिक्स घडवत राहू, जिथे तरुण केवळ भविष्याची तयारी करत नाहीत, तर ते सक्रियपणे भविष्य घडवत आहेत,” असेही ते म्हणाले.

ब्रिक्स युवा मंत्र्यांच्या बैठकीच्या निमित्ताने, ब्रिक्स सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी 'एक पेड माँ के नाम' या विशेष वृक्षारोपण मोहिमेत भाग घेतला. या मोहिमेत प्रत्येक प्रतिनिधीने आपल्या आईच्या सन्मानार्थ एक रोपटे लावले. 

ब्रिक्स युवा मंत्र्यांच्या बैठकीचे एक महत्त्वाचे फलित म्हणजे संयुक्त निवेदनाचा स्वीकार.  हे निवेदन युवा क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्याच्या आणि विकास प्रक्रियेत तरुणांचा अर्थपूर्ण सहभाग वाढवण्याच्या ब्रिक्स देशांच्या सामायिक वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. या संयुक्त निवेदनात शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्ये; युवा उद्योजकता; विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष; सामाजिक व सांस्कृतिक सहभाग, समाजकार्य आणि स्वयंसेवा; विकास, तसेच गरिबी, भूक व भेदभाव निर्मूलन; आरोग्य, युवा आणि क्रीडा; युवा, पर्यावरण आणि शाश्वतता; आंतरधर्मीय युवा संवाद; युवा आदान-प्रदान; आणि युवा समावेशकता यांसारख्या मुद्द्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

तरुणांना त्यांच्या क्षमता विकसित करण्यासाठी, निर्णय प्रक्रियेत अर्थपूर्ण सहभाग घेण्यासाठी आणि युवा-संबंधित समकालीन समस्यांचे निराकरण करण्यात योगदान देण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, हा या मंत्र्यांच्या बैठकीतील चर्चेचा एक मुख्य विषय होता. तसेच, तरुणांच्या नेतृत्वाखालील उपक्रम बळकट करणे, नवोन्मेष व उद्योजकतेला चालना देणे आणि समान हिताच्या मुद्द्यांवर अनुभव व कल्पनांच्या देवाणघेवाणीद्वारे तरुणांमधील आंतर-सीमा सहकार्याच्या संधींचा विस्तार करणे या बाबींच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला.

ब्रिक्स युवा मंत्र्यांच्या बैठकीची यशस्वी सांगता आणि ब्रिक्स युवा मंत्री संयुक्त निवेदनाचा स्वीकार, ही ब्रिक्स देशांमधील युवा सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाची घटना ठरली आहे

***

माधुरी पांगे/राधिका अघोर/वैभवी जोशी/श्रद्धा मुखेडकर/राजेश शिरभाते/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2302402) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Odia , Tamil , Telugu_Vw , Malayalam