गृह मंत्रालय
अमली पदार्थांविरोधातील शून्य सहनशीलतेच्या धोरणाला नवा टप्पा; एनसीबी कडून फरार ड्रग्ज माफिया वीरेंद्र सिंह बसोया याला युएईमधून भारतात परत आणण्यात यश
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार परदेशात लपून बसलेल्या अमली पदार्थांच्या तस्करांचा सातत्याने शोध घेत आहे: केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह
मोदी सरकार अत्यंत कठोर धोरण अवलंबून अमली पदार्थांच्या तस्करांची संपूर्ण यंत्रणा नष्ट करत आहे
अमली पदार्थांचा आंतरराष्ट्रीय तस्कर वीरेंद्र सिंह बसोया याला 'ऑपरेशन ग्लोबल-हंट' अंतर्गत भारतात परत आणण्यात आले
गुन्हेगाराचा वरपासून-खालपर्यंत आणि खालपासून-वरपर्यंत या दृष्टीकोनातून शोध घेऊन, आमच्या यंत्रणांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, अमली पदार्थांचे तस्कर कोठेही लपून बसले तरी ते भारतीय कायद्याच्या पकडीतून सुटू शकत नाहीत
प्रविष्टि तिथि:
14 AUG 2026 12:31PM by PIB Mumbai
अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळ्यांविरोधातील लढ्यात महत्वाचा टप्पा गाठत, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी), अर्थात अमली पदार्थ नियंत्रण संस्थेने दिल्लीतील सरोजिनी नगर भागातील पिल्लंजी येथील रहिवासी आणि वॉन्टेड फरार आरोपी वीरेंद्र सिंग बसोया @वीरू @बसोया याला भारतात परत आणण्यात यश मिळवले आहे. आज सकाळी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होताच, त्याला ताब्यात घेण्यात आले.
एनसीबीच्या विनंतीवरून इंटरपोलने 'रेड नोटीस' जारी केल्यावर, बसोया याला जून 2026 मध्ये संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये अटक करण्यात आली होती. भारतीय यंत्रणांनी संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधून त्याचे भारताकडे प्रत्यार्पण निश्चित केले.
‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परदेशात लपून बसलेल्या अमली पदार्थांच्या तस्करांचा अथकपणे शोध घेत आहे आणि कठोर धोरण अवलंबून त्यांची संपूर्ण यंत्रणा नष्ट करत आहे. अमली पदार्थांविरोधातील शून्य सहिष्णुतेच्या धोरणात नवा टप्पा गाठत, एनसीबीने फरार अमली पदार्थ तस्कर वीरेंद्र सिंग बसोया याला युएईमधून परत आणण्यात यश मिळवले. वरपासून खालपर्यंत आणि खालपासून वरपर्यंत या दृष्टिकोनातून गुन्हेगाराचा शोध घेऊन, आमच्या यंत्रणांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की, अमली पदार्थांचे तस्कर कोठेही लपून बसले, तरी ते भारतीय कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाहीत."
पार्श्वभूमी
या प्रकरणाची सुरुवात फेब्रुवारी 2024 मध्ये पुण्यात झाली, जेव्हा पुणे शहर पोलिसांनी 500 ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले. त्यानंतर, अमली पदार्थांच्या तस्करीचे संपूर्ण जाळे शोधून ते उद्ध्वस्त करण्यासाठी 'वरपासून-खालपर्यंत' आणि 'खालपासून-वरपर्यंत' या पद्धतींचा अवलंब करून तपास करण्यात आला. त्यानंतर तपास आणि पाठपुरावा मोहिमांमधून पुण्यातून अंदाजे 867 किलो आणि दिल्लीतून 970 किलो असे एकूण सुमारे 1,837 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण पुढील तपासासाठी एनसीबीच्या मुंबई विभागीय पथकाकडे सोपवण्यात आले.
तपासादरम्यान बसोया हा या प्रकरणातील परदेशातला एक प्रमुख हस्तक आणि सूत्रधार असल्याचे आढळले. त्याने परदेशातून या टोळीच्या हालचालींचा समन्वय साधला आणि भारतातून इतर देशांमध्ये मेफेड्रोनची तस्करी करण्यास सहाय्य केल्याचे आढळून आले. दिल्लीत जप्त करण्यात आलेला सुमारे 970 किलो मेफेड्रोनचा मोठा साठा, हा त्याच्याशी संबंधित कुरिअर नेटवर्क द्वारे परदेशात पाठवला जात असल्याचा आरोप आहे. देशांतर्गत उत्पादन आणि तस्करीचे जाळे यांना परदेशातील वितरण वाहिन्यांशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणून त्याची भूमिका समोर आली.
आंतरराष्ट्रीय कोकेन तस्करीशी संबंधित दिल्ली पोलिसांच्या 'स्पेशल सेल'च्या एका स्वतंत्र प्रकरणातही बसोयाचे नाव जोडले आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये, दिल्ली पोलिसांच्या 'स्पेशल सेल'ने अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईदरम्यान दिल्ली, हापूर आणि गाझियाबाद येथील गोदामे आणि इतर ठिकाणांहून, तसेच गुजरातच्या अंकलेश्वरमधील एका कारखान्यातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले. समन्वित मोहिमांमधून 1,300 किलोपेक्षा जास्त कोकेन, मेफेड्रोन आणि हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. या टोळीच्या तपासामध्ये कोकेन आणि इतर अमली पदार्थांची खरेदी, वाहतूक, साठवणूक आणि वितरण यांचा समन्वय साधण्यात बसोयाची भूमिका असल्याचा आरोप निश्चित झाला.
बसोयाचे भारताकडे हस्तांतरण ही एनसीबीच्या 'ऑपरेशन ग्लोबल-हंट' अंतर्गत सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग आहे. परदेशातून कार्यरत असलेल्या अमली पदार्थांच्या प्रमुख तस्करांना आणि फरार आरोपींना ओळखणे, त्यांचा ठावठिकाणा शोधणे आणि त्यांचा पाठलाग करणे, या उद्देशाने हे ऑपरेशन सुरू करण्यात आले. हा उपक्रम इंटरपोलच्या रेड नोटिससह आंतरराष्ट्रीय सहकार्य यंत्रणेचा लाभ घेतो आणि भारतीय आणि परदेशी कायदा अंमलबजावणी संस्थांशी समन्वय मजबूत करतो. या उपक्रमांतर्गत, तुर्कीमधून मोहम्मद सलीम डोला आणि मलेशियातून नवीन चिचकर यासारख्या इतर वॉन्टेड अमली पदार्थ तस्करांना यशस्वीपणे परत आणले.
गुन्ह्यांसाठी कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी फरार आरोपींना भारतात परत आणणे हे केंद्रीय गृहमंत्री यांनी जाहीर केलेल्या 'अमली पदार्थ नियंत्रण दृष्टीकोन दस्तऐवज (2026-2029) च्या उद्दिष्टांना अनुसरून आहे. या आराखड्याचा एक भाग म्हणून, परदेशातून कार्यरत असलेल्या इतर महत्त्वाच्या अमली पदार्थ-संबंधित फरार आरोपींची ओळख पटवणे, त्यांचा शोध घेणे आणि त्यांना परत आणणे यासाठी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांच्या समन्वयातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली, अंमली पदार्थांच्या तस्करीबाबत भारत सरकारच्या 'शून्य सहिष्णुता’ धोरणाप्रति एनसीबी वचनबद्ध आहे.
भारतातून किंवा परदेशातून कार्यरत असलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीतील मुख्य सूत्रधार, अर्थपुरवठादार, तस्कर आणि फरार आरोपींचा एनसीबी पाठपुरावा करत राहील, तसेच अमली पदार्थांच्या तस्करीची संपूर्ण यंत्रणा मोडीत काढण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांबरोबर समन्वयाने काम करेल.
***
नितीन फुल्लुके / राजश्री आगाशे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2299384)
आगंतुक पटल : 14