कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलचे उद्घाटन


कृषी शिक्षणात प्रत्यक्ष प्रशिक्षण, समयोचित मदत आणि नवोन्मेषावर चौहान यांचा विशेष भर

Posted On: 10 AUG 2026 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2026

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज  पुसा इथल्या ‘आयसीएआर-आयएआरआय’ संस्थेमध्‍ये  राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (एन एस पी) च्या माध्यमातून देशभरातील कृषी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि पाठ्यवृत्तीचा निधी वितरित केला. या उपक्रमांतर्गत 6,000 हून अधिक विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण (डी बी टी) प्रणालीद्वारे एकूण 21.35 कोटी रुपये थेट प्राप्त झाले.

या नवीन उपक्रमामुळे, कृषी विद्यार्थ्यांना आता त्यांची शिष्यवृत्ती थेट लाभ हस्तांतरण (डी बी टी) प्रणालीद्वारे दरमहा थेट प्राप्त होईल. या सुविधेमुळे त्यांना  वेळेवर आणि कोणत्याही अडचणीशिवाय आर्थिक मदत मिळणे सुनिश्चित होईल.

शिष्यवृत्ती हे केवळ आर्थिक सहाय्याचे साधन नसून, कृषी शिक्षण बळकट करण्याचे आणि त्याला प्रत्यक्ष शिक्षण आणि अधिक चांगल्या संधींशी जोडण्याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे, असे केंद्रीय कृषी मंत्री चौहान यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले. डी बी टी प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळणे सुनिश्चित होईल आणि पारंपरिक पद्धतींमुळे होणारा विलंब टाळण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांना संबोधित करताना चौहान यांनी कृषी शिक्षणातील प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या महत्त्वावर भर दिला. तसेच, व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्या सूचना आणि कल्पना मांडण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान केवळ रोजगारापुरते अर्थात नोकरीपुरते  मर्यादित न  ठेवता,  या क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रम, स्टार्टअप्स आणि संशोधनामध्ये पुढाकार घेण्याचे त्यांनी  आवाहन केले.

राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (एनएसपी) आणि थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणाली मुळे  शिष्यवृत्तीचे वितरण अधिक पारदर्शक, जलद आणि सुरळीत पद्धतीने होईल. वेळेवर मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणावर अधिक प्रभावीपणे लक्ष केंद्रित करणे शक्य होईल. भविष्यातील आव्हानांना अधिक सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी कृषि शिक्षणाची, तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि उद्योगाभिमुखतेशी सांगड घालण्याच्या आवश्यकतेवर  त्यांनी भर दिला. 

सुवर्णा बेडेकर/निलीमा चितळे/संदेश नाईक/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2297431) अभ्यागत कक्ष : 60