आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
बनावट अथवा खोटी माहिती देणाऱ्या अर्जदारांना अपात्र करण्यासाठी कठोर औषध नियम केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अधिसूचित
प्रविष्टि तिथि:
06 AUG 2026 3:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2026
भारताच्या औषध नियंत्रण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता अधिक मजबूत करण्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यासाठी 'ड्रग्ज रूल्स, 1945' (औषध नियमावली, 1945) मध्ये दुरुस्ती करून 16 ऑक्टोबर 2025 रोजी 'G.S.R 756 (E)' ही नवीन अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
'औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा, 1940' अंतर्गत सध्या असलेल्या कारवाईच्या तरतुदींव्यतिरिक्त, या नवीन नियमांमुळे परवाना देणाऱ्या प्राधिकरणाला अतिरिक्त अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यानुसार, अर्ज करताना खोटी किंवा बनावट माहिती सादर करणाऱ्या संस्थांवर यापुढे नवीन अर्जांसाठी बंदी घालण्याचा अधिकार प्राधिकरणाला मिळाला आहे. हा नियम 'ड्रग्ज रूल्स, 1945' मधील विविध तरतुदींनुसार दाखल केलेल्या सर्व प्रकारच्या अर्जांना लागू असेल.
सध्याच्या नियमांनुसार, बनावट माहिती देणाऱ्या अर्जदारांवर अर्ज फेटाळणे किंवा विद्यमान परवाने रद्द करणे अशीच कारवाई केली जात असे. मात्र, या नव्या दुरुस्तीमुळे अशा अर्जदारांना संबंधित राज्य किंवा केंद्रीय नियामक प्राधिकरणाकडे ठराविक कालावधीसाठी पुढील कोणतेही अर्ज सादर करण्यास मनाई केली जाईल. अशी कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी अर्जदाराला 'कारणे दाखवा नोटीस' पाठवून योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, या निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी अपिलाची तरतूदही करण्यात आली आहे.
ही अधिसूचना जागतिक स्तरावरील सर्वोत्तम मानकांनुसार भारतातील नियामक चौकटीला अधिक मजबूत करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांशी सुसंगत आहे. देशाच्या नियामक चौकटीचे काटेकोर पालन करणाऱ्या औषध उत्पादकांना आणि वितरकांना प्रोत्साहन देणे, तसेच गैरप्रकाराच्या नोंदवलेल्या कोणत्याही प्रकरणांवर कडक कारवाई करणे हा यामागचा उद्देश आहे. ही दुरुस्ती देखरेख वाढवणे, नैतिक पद्धतींना वाव देणे आणि गैरमार्गांचा अवलंब करणाऱ्या संस्थांना योग्य ती शिक्षा मिळेल याची खात्री करणे यावर विशेष भर देऊन औषध क्षेत्रातील सुरू असलेल्या सुधारणांना अधिक बळ देते.
या G.S.R. चा संपूर्ण मजकूर भारत सरकारच्या अधिकृत राजपत्रावर (e-Gazette) उपलब्ध आहे, तसेच तो खालील लिंकद्वारे देखील मिळवता येऊ शकतो:-
https://egazette.gov.in/WriteReadData/2026/275233.pdf
सुषमा काणे/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2295470)
आगंतुक पटल : 18