वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे भारत आणि उझबेकिस्तान मधील उद्योगांना सह-गुंतवणूक आणि सह-उत्पादन करण्यासाठी आमंत्रण; द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे भारत-उझबेकिस्तान व्यापार मंच कार्यक्रमात आवाहन

प्रविष्टि तिथि: 03 AUG 2026 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2026 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी आज भारत आणि उझबेकिस्तान मधील उद्योगांना सह गुंतवणूक, सह उत्पादन आणि सह नवोन्मेष करण्यासाठी पुढे येण्याचे आमंत्रण दिले, तसेच येत्या तीन वर्षांत दोन्ही देशामधील द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. नवी दिल्लीत आयोजित भारत-उझबेकिस्तान व्यापार मंच कार्यक्रमाला संबोधित करताना गोयल म्हणाले की परस्परांवरील विश्वास, आदर आणि विकासाच्या सामायिक दृष्टिकोनाने प्रेरित असलेली दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी, व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्यासाठी अमाप संधी प्रदान करत आहे.

शिष्टमंडळाचे स्वागत करुन गोयल यांनी सांगितले की भारत आणि उझबेकिस्तान हे दोन्ही देश केवळ समृद्ध सामायिक इतिहास आणि गहन सांस्कृतिक दुव्याने नाहीत तर आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या अफाट व्यापार क्षमतेने देखील एकमेकांशी जोडलेले आहेत. द्विपक्षीय व्यापाराने सुमारे  1.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा ओलांडला असला तरी दोन्ही अर्थव्यवस्था मिळून जे साध्य करू शकतात त्याच्या तुलनेत हे केवळ एक लहानसे प्रमाण आहे.  

भारत उझबेकिस्तानला केवळ एक मोठी आणि वेगाने वाढणारी बाजारपेठच नव्हे, तर एक विश्वासार्ह भागीदार, कुशल आणि तरुण मनुष्यबळ तसेच नवोन्मेष-आधारित विकासासाठी एक व्यासपीठही प्रदान करतो. भारत आणि उझबेकिस्तान मध्ये नुकत्याच झालेल्या द्विपक्षीय गुंतवणूक विषयक कराराचा उल्लेख करुन ते म्हणाले की या करारामुळे गुंतवणूकदारांमधील विश्वास वाढीला लागेल आणि दोन्ही देशांमधील उद्योगांना एकमेकांच्या अर्थव्यवस्थांमध्ये गुंतवणूक करायला तसेच दीर्घकालीन भागीदारी दृढ करायला प्रोत्साहन देईल.

गोयल यांनी द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी वाव असलेल्या आणि परस्परपूरक असलेल्या अनेक क्षेत्रांची ओळख करून दिली. खाण क्षेत्रात भारतीय गुंतवणुकीसाठी उझबेकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत, असे ते म्हणाले. याशिवाय वस्त्रोद्योग क्षेत्रातील सहकार्याच्या बाबतील देखील मोठी क्षमता असून उझबेकिस्तान कापूस उत्पादनात अग्रणी आहे तर वस्त्रोद्योग क्षेत्रात भारत नेतृत्त्व करत असल्याने वस्त्रप्रावरणे उत्पादन, डिझाईन आणि जागतिक बाजारपेठ या सर्वच आघाड्यांवर एकत्रितपणे विस्तार करण्यासाठी पुष्कळ संधी असल्याचे गोयल म्हणाले.

व्यापारातील सहकार्याने द्विपक्षीय संबंधांना नवीन आयाम दिला पाहिजे यावर भर देत गोयल यांनी उद्योगांना चिरस्थायी वाणिज्यिक भागीदारी उभारण्यासाठी संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. त्यादृष्टीने व्यापारातील अडथळे दूर करणे, मानके, चाचणी आणि प्रमाणीकरण प्रक्रियेला परस्पर मान्यता देणे, डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक अवलंब करुन सीमाशुल्क प्रणालींचे एकत्रीकरण करणे आणि अधिक कार्यक्षम व्यापार मार्ग विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी आवाहन केले.

दोन्ही देशांचे सरकार एका अधिक सुसंघटित, कालनिर्धारित आणि फलनिष्पत्ती केंद्रित आर्थिक भागीदारीच्या दिशेने कार्य करत असल्याचे सांगून नियामक आणि  मानक-निर्धारण प्राधिकरणांनी देखील दोन्ही कडील व्यापाराला चालना देण्यासाठी सहकार्य अधिक मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला.

उद्योगधुरीणांना संबोधित करताना गोयल म्हणाले की हीच योग्य वेळ आहे. सह गुंतवणूक करा, एकत्र उत्पादन करा आणि एकत्र नवोन्मेष करा. दीर्घकालीन भागीदारी निर्माण करा ज्यामुळे दोन्ही देशांमधील कंपन्यांना अधिक व्यापक संधी, स्थैर्य आणि समृद्धी मिळेल ज्यामुळे  भारत आणि उझबेकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला आणि जनतेला देखील लाभ होईल.

 
शैलेश पाटील/भक्‍ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2293852) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Punjabi , Gujarati , Tamil , Malayalam