रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रत्यारोपणासाठीच्या हृदयाची वंदे भारत एक्सप्रेसमधून सूरत ते अहमदाबाद वाहतूक यशस्वी

प्रविष्टि तिथि: 31 JUL 2026 5:20PM by PIB Mumbai

 

भारतीय रेल्वेने आरोग्य सेवा क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठत रेल्वे गाडीतून प्रत्यारोपणासाठीच्या हृदयाची वाहतूक यशस्वी केली आहे. गाडी क्र.20901 मुंबई सेंट्रल – गांधी नगर राजधानी वंदे भारत एक्स्प्रेसने या हृदयाचे सूरत पासून अहमदाबाद पर्यंत सुरक्षित आणि वेळेत परिवहन करण्यात आले. त्यामुळे अहमदाबाद इथल्या ‘यू. एन. मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिऑलॉजी ॲण्ड रीसर्च सेंटर’ इथे प्रत्यारोपणासाठी हे हृदय सुरक्षितपणे आणि वेळेत पोहोचविणे शक्य झाले.

या महत्त्वपूर्ण मोहिमेच्या उल्लेखनीय यशामुळे वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग, वक्तशीरपणा आणि विश्वासार्हता दिसून झाली. तसेच, अत्यावश्यक आरोग्य सेवा आणि आपात्कालीन वैद्यकीय वाहतुकीला पाठबळ देण्यात भारतीय रेल्वेची वाढती भूमिका देखील स्पष्ट झाली.

अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया वेळेबाबत अत्यंत संवेदनशील असल्यामुळे या मोहिमेसाठी बारकाईने नियोजन करून भारतीय रेल्वे, रेल्वे सुरक्षा बल, गुजरात राज्य पोलीस आणि वैद्यकीय पथकांच्या काटेकोर समन्वयाने राबविण्यात आली. दात्याचे हृदय निर्धारित उपयुक्तता कालावधीत रुग्णालयात पोहोचेल, यासाठी वाहतुकीच्या प्रत्येक टप्प्याची काळजीपूर्वक आखणी केली.

रेल्वे सुरक्षा बल आणि गुजरात राज्य पोलिसांनी अहमदाबाद रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. 1 पासून यू. एन. मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिऑलॉजी ॲण्ड रीसर्च सेंटरपर्यंत विशेष ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार केला. त्यामुळे दात्याच्या हृदयाची विना अडथळा वाहतूक शक्य झाली आणि हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया कोणताही विलंब न होता सुरू करता आली.

याविषयी माहिती देताना अहमदाबादचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक वेद प्रकाश यांनी सांगितले, “वंदे भारत एक्स्प्रेसमधून सूरतपासून अहमदाबादपर्यंत दात्याचे हृदय यशस्वीरित्या नेण्यात आले, त्यामुळे पारंपरिक प्रवासी आणि माल वाहतुकीच्या पलीकडे जाऊन समाज सेवा करण्याप्रती आमच्या बांधिलकीची प्रचीती आली. अशा जीवनरक्षक मोहिमांमध्ये प्रत्येक क्षण अत्यंत महत्त्वाचा असतो. भारतीय रेल्वे, रेल्वे सुरक्षा बल, गुजरात राज्य पोलीस आणि वैद्यकीय पथके यांच्यातील उत्कृष्ट समन्वयामुळे ही मोहीम यशस्वी झाली. एखाद्या व्यक्तीचा जीव वाचविण्यास हातभार लावणे ही केवळ आमची जबाबदारी नसून सेवा आणि मानवतेप्रती असलेले आमचे सर्वोच्च कर्तव्य आहे.”

ही ऐतिहासिक कामगिरी भारतीय रेल्वेची सुरक्षित, विश्वासार्ह आणि कार्यक्षम वाहतूक सेवा प्रदान करण्याप्रती वचनबद्धता पुन्हा अधोरेखित करते. तसेच, जीवन रक्षक मानवतावादी उपक्रमांना पाठबळ देत देशाच्या आरोग्य सेवा व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी भारतीय रेल्वे योगदान देत असल्याचीही ग्वाही देते.

***

निलिमा चितळे/रेश्मा बेडेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2292794) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Kannada , Malayalam