आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी मीराबाई चानू यांची 'अर्जुन पुरस्कारा'साठी केली शिफारस


चानू यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत जाधव यांनी केंद्रीय क्रीडा मंत्र्यांना पत्र लिहिले

Posted On: 31 JUL 2026 4:40PM by PIB Mumbai


केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव गणपतराव जाधव यांनी, भारताची अग्रगण्य भारोत्तोलक आणि ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू यांचा या वर्षीच्या प्रतिष्ठेच्या 'अर्जुन पुरस्कारा'साठी विचार केला जावा, अशी विनंती करणारे पत्र केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांना लिहिले आहे.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्या पत्रात मीराबाई चानू यांच्या असाधारण कामगिरीवर आणि भारतीय भारोत्तोलन क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानावर प्रकाश टाकला आहे. मणिपूरच्या या खेळाडूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून इतिहास रचला आहे आणि देशाचा अभिमान वाढवला आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.
प्रतापराव जाधव यांनी आपल्या पत्रात मीराबाई चानू यांच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सातत्याने सुवर्णपदक जिंकण्याच्या उल्लेखनीय कामगिरीचा , तसेच या प्रत्येक स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकणारी खेळाडू ठरण्याच्या त्यांच्या विशेष कामगिरीचा ठळक उल्लेख केला  आहे. केंद्रीय मंत्र्यांनी मीराबाई चानू यांच्या 48 किलो वजनी गटातील उत्कृष्ट कामगिरीवरही प्रकाश टाकला आहे, यामध्ये 'स्नॅच', 'क्लीन अँड जर्क' आणि एकूण वजन उचलण्याच्या (टोटल लिफ्ट) प्रकारांमधील विक्रमी कामगिरीचा समावेश आहे.
प्रतापराव जाधव यांनी नमूद केले आहे की, ऑलिम्पिक पदक जिंकण्याव्यतिरिक्त मीराबाई चानू यांना देशाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान असलेला 'मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार' आणि 'पद्मश्री' यासारख्या पुरस्कारांनी यापूर्वीच गौरवण्यात आले आहे. मात्र, मणिपूरमधील आपल्या गावात प्रशिक्षणाच्या सुरुवातीच्या काळापासून जोपासलेले 'अर्जुन पुरस्कार' मिळवण्याचे त्यांचे स्वप्न अपुरे राहिले आहे.
मीराबाई चानू यांना 'अर्जुन पुरस्कार' देऊन सन्मानित करणे हा त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा, असाधारण प्रतिभेचा आणि भारतीय क्रीडा क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा यथार्थ गौरव ठरेल, असे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
मणिपूरमधील एका छोट्या गावापासून ते भारताच्या सर्वात कर्तृत्ववान भारोत्तोलकांपैकी एक बनण्यापर्यंतचा चानू यांचा प्रेरणादायी प्रवास हा त्यांचा दृढनिश्चय, चिकाटी आणि समर्पणाचा दाखला आहे, आणि लाखो युवा भारतीयांसाठी तो प्रेरणादायी आहे, असे प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे.

***

सुषमा काणे/राजश्री आगाशे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2292676) अभ्यागत कक्ष : 43