संरक्षण मंत्रालय
आय ए एस व्ही त्रिवेणी नौकेतून पहिल्यांदाच यशस्वी जग प्रदक्षिणा करणाऱ्या तिन्ही सशस्त्र दलांतील महिला चालक चमूचा संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
प्रविष्टि तिथि:
30 JUL 2026 3:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,30 जुलै 2026
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी, 30 जुलै 2026 रोजी, भारतीय लष्कराचे नौकानयन जहाज 'आयएएसव्ही त्रिवेणी' (IASV Triveni) वरून 'समुद्र प्रदक्षिणा' ही जागतिक परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण करून मायदेशी परतलेल्या नऊ महिला अधिकाऱ्यांचा सत्कार केला.तिन्ही संरक्षण दलांमधील महिला अधिकाऱ्यांनी केलेली ही पहिलीच सागरी जगप्रदक्षिणा मोहीम आहे. नवी दिल्ली येथे या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना, चार महासागरांमधून, 314 दिवसांत, सुमारे 25,500 सागरी मैलांचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल, या चमूचे, त्यांच्या धैर्याचे आणि जिद्दीचे संरक्षणमंत्र्यांनी कौतुक केले. ही मोहीम म्हणजे ‘नारी शक्तीची’ साक्ष असल्याचे सांगत, तिन्ही दलांमधील एकजूट आणि समन्वयाचे एक उत्कृष्ट उदाहरण असल्याचं ते म्हणाले. तिन्ही दलांमधील हे सहचर्य प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देईल असं ते पुढे म्हणाले.



या मोहिमेत सहभागी झालेल्या महिला अधिकाऱ्यांनी, संरक्षण मंत्र्यांना आपले अनुभव कथन केले. या मोहिमेच्या आव्हानात्मक स्वरूपामुळे हा प्रवास संस्मरणीय आणि फलदायी झाला असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले . देशाला अभिमानास्पद बनवण्याप्रती आपली दृढ वचनबद्धता आपल्याला सतत प्रेरित करत राहिली आणि त्यामुळेच अनेक शारीरिक आणि मानसिक आव्हानांवर मात करता आली, असे त्यांनी सांगितले. या महिला अधिकाऱ्यांच्या या समर्पित वृत्तीने आपल्यालाही प्रेरणा दिली असून आपला स्वतःचा संकल्प अधिक दृढ केला असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी नमूद केले. दृढ विश्वास आणि निर्धार एखाद्याला जीवनातील कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी कशी मदत करू शकतो हेच या कामगिरीवरून दिसून येते, असे ते म्हणाले.

संरक्षणमंत्र्यांनी, या मोहिमेचे वर्णन 'तिन्ही दलांमधील संयुक्त समन्वयाचे' एक उत्कृष्ट उदाहरण असे केले. त्यांनी नमूद केले की, भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायुदलाच्या अधिकाऱ्यांनी एका सामायिक ध्येयाच्या पूर्ततेसाठी एकाच जहाजावरून आणि एकाच ध्वजाखाली एकत्रितपणे प्रवास केला. "जर आपण देखील असेच एकत्रितपणे पुढे गेलो, तर कोणतेही लक्ष्य अशक्य नाही, हेच या मोहिमेवरून सिद्ध होते," असेही त्यांनी सांगितले.

परिक्रमेदरम्यान, या महिला अधिकाऱ्यांच्या चमूने भेट दिलेल्या देशांमध्ये भारताचे अभियांत्रिकी कौशल्य, स्वदेशी क्षमता आणि तांत्रिक प्रगती यांचे दर्शन घडवल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी या चमूचे कौतुक केले आणि, "कोणत्याही क्षेत्रात भारत कोणापेक्षाही मागे नाही, असा संदेश तुम्ही जगाला दिला आहे." असे प्रशंसोद्गार काढले.
सुषमा काणे/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2291679)
आगंतुक पटल : 22