रेल्वे मंत्रालय
भारताची पहिली थेट व्यावसायिक कंटेनर मालगाडी नेपाळला पोहोचली, सीमापार व्यापार आणि कनेक्टिव्हिटी यांच्या नवीन अध्यायाला आरंभ
प्रविष्टि तिथि:
28 JUL 2026 8:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जुलै 2026
भारतीय रेल्वेच्या पहिल्या थेट व्यावसायिक कंटेनर मालगाडीने कोलकाता बंदर ते नेपाळमधील विराट नगर कस्टम यार्ड इथपर्यंत प्रवास करून भारत नेपाळ मालवाहतूक कनेक्टिव्हिटीला यशस्वी सुरुवात केली. या सोबतच भारतीय रेल्वेने भारत नेपाळ मालवाहतूक कनेक्टिव्हिटीत मैलाचा दगड गाठला आहे. चाळीस वाघिणी असलेल्या या मालगाडीने कॅनोला वाहून नेत भारत- नेपाळ रेल्वे ट्रान्सपोर्ट प्रोटोकॉलनुसार आपला प्रवास केला. सीमापार मालवाहतुकीचा नवीन अध्याय या रेल्वेने सुरू केला आहे.
सीमेवर मालाची चढ उतार न करता कोलकाता बंदर ते विराट नगर या मार्गावर कंटेनर मधून माल वाहून नेण्यासाठी थेट रेल्वे सेवेचा हा असा यशस्वी वापर करता आला. या नवीन पद्धतीमुळे मालवाहतुकीमधला वेळ, खर्च यात लक्षणीय घट होईल आणि मालाची चढ-उतार सुलभ होईल तसेच दोन्ही शेजारी देशांच्या सीमांदरम्यान चालणाऱ्या व्यापाराची कार्यक्षमता, परिणामकारकता आणि स्पर्धात्मकता वाढेल.
भारत नेपाळ रेल्वे वाहतूक सुधारित प्रोटोकॉल लागू केल्यामुळे हा मैलाचा दगड गाठणे शक्य झाले. या प्रोटोकॉलमुळे दोन्ही देशांमध्ये विना अडथळा रेल्वे मालवाहतूक शक्य झाली आहे.

जलद अधिक किफायतशीर आणि पर्यावरण दृष्ट्या शाश्वत अशी थेट मालवाहतूक सेवा आयात तसेच निर्यात मालवाहतुकीला लक्षणीय गती देण्यासाठी उपयोगी पडेल. यामुळे अनेक ठिकाणी मालाची चढ उतार करावी लागणार नाही व पुरवठा साखळीतील कार्यक्षमता वाढेल, या पुढाकारामुळे आयातदार, निर्यातदार, वाहतूकदार आणि सीमापार व्यापारात गुंतलेले उद्योग या सर्वांनाच त्याचा लाभ होईल.
भारतीय रेल्वे ही आंतरराष्ट्रीय रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर लक्ष केंद्रित करून, मालवाहतुकीला बळकटी देऊन त्याद्वारे आधुनिक वाहतूक सुविधांच्या मदतीने व्यवसाय सुलभता सुधारणे या सरकारच्या दृष्टिकोनाला अनुसरत आहे हे यातून प्रतिबिंबित होत आहे. रेल्वेतून मालवाहतूक वाढल्यामुळे वाहतुकीवरचा खर्च कमी होऊन विश्वासार्ह आणि पर्यावरण पूरक पद्धतीने मालवाहतूक होईल त्यातूनच शेजारी देशांबरोबर असणारी आर्थिक भागीदारी अधिक बळकट होण्यास मदत होईल.
* * *
निलिमा चितळे/विजया सहजराव/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2290763)
आगंतुक पटल : 18