रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील परभणी - मुदखेड विभागासाठी 163 कोटी रुपयांच्या विद्युत कर्षण (ट्रॅक्शन) व्यवस्थेच्या अद्ययावतीकरणाला भारतीय रेल्वेची मंजुरी


या प्रकल्पाच्या माध्यमातून आणखी जास्त प्रमाणात मालवाहतूक हाताळण्यासाठी तसेच वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवण्याच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध करून देण्याकरता 164 किलोमीटरवर मार्गाच्या रुळांसाठीच्या कर्षण यंत्रणेचे सक्षमीकरण केले जाणार

प्रविष्टि तिथि: 28 JUL 2026 2:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जुलै 2026

 

भारतीय रेल्वेने दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील परभणी - मुदखेड दुहेरी मार्गिकेवरील विद्युत कर्षण (ट्रॅक्शन) यंत्रणेच्या अद्ययावतीकरणाच्या कामाला मंजुरी दिली आहे. यामुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी तसेच रेल्वे व्यवस्थेची क्षमता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे. या प्रकल्पाअंतर्गत संबंधित वीज पुरवठा व्यवस्थेच्या उभारणीच्या कामांचाही समावेश आहे. या कामासाठी 163 कोटी रुपये खर्चालाही मंजुरी देण्यात आली आहे.

या प्रकल्पाअंतर्गत 164 ट्रॅक किलोमीटरच्या अंतरावरील विद्यमान  1x25 किलोव्होल्ट विद्युत कर्षण क्षमतेची यंत्रणा बदलून ती, अधिक प्रगत 2x25 किलोव्होल्ट क्षमतेच्या यंत्रणेत रुपांतरीत केली जाणार आहे. यासोबतच वाढत्या विजेची गरज भागवण्यासाठी अद्ययावत वीज पुरवठा पायाभूत सुविधाही उभारली जाणार आहे.

परभणी - मुदखेड विभाग हा अजमेर - इंदूर - खंडवा - अकोला - पूर्णा - मुदखेड - सिकंदराबाद - महबूबनगर - धोन या मार्गाला जोडणाऱ्या आणि धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या तसेच सर्वाधिक वर्दळ असलेल्या मार्ग - 9 चा (HUN - Highly Utilised Network) एक भाग आहे.

या अद्ययावत कर्षण यंत्रणेमुळे रेल्वे वाहतुक कार्यान्वयनासाठीची वीज पुरवठा व्यवस्था अधिक भक्कम होणार आहे. यामुळे या विभागाअंतर्गत आणखी जास्त प्रमाणात मालवाहतूक करणे शक्य होईल, तसेच वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवण्याच्या दृष्टीनेही मोठी सुविधा उपलब्ध होईल. यासोबतच भारतीय रेल्वेचे 2029-30 पर्यंत 3,000 दशलक्ष टन मालवाहतूक करण्याचे उद्दिष्ट गाठण्यातही हा प्रकल्प महत्त्वाचे योगदान देऊ शकणार आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून देशभरातील जास्त रहदारी असलेल्या मार्गांवरील विद्युत पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्याबाबत तसेच रेल्वेच्या कार्यक्षमतेत सुधारणा घडवून आणण्याबाबत भारतीय रेल्वेकडून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचीच प्रचिती येते.

 

* * *

नेहा कुलकर्णी/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2290375) आगंतुक पटल : 32
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Telugu , Kannada