पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
केंद्र सरकारने वैज्ञानिक पडताळणीच्या आधारावर E20 पेट्रोलची सुरक्षितता आणि कार्यक्षमतेला दिला दुजोरा
प्रविष्टि तिथि:
23 JUL 2026 7:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2026
'इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रम' टप्प्याटप्प्याने, वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित आणि सर्व संबंधित घटकांशी सल्लामसलत करून लागू केला आहे, ज्यात नीती आयोग, वाहन उत्पादक कंपन्या, तेल विपणन कंपन्या, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय), सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (एसआयएएम), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम (IIP) आणि इतर तांत्रिक संस्थांचा सहभाग आहे.
इथेनॉल हे काही नवीन इंधन नाही. जगभरात एक शतकाहून अधिक काळापासून याचा वापर केला जात असून, ब्राझीलसारखे देश अनेक दशकांपासून जास्त इथेनॉल असलेले मिश्रण वापरत आहेत. भारतात, 'इथेनॉल मिश्रित पेट्रोल' (EBP) कार्यक्रमाची सुरुवात 2001 मध्ये एका प्रायोगिक उपक्रमाने झाली आणि 2006 मध्ये 'E5' सुरू करण्यात आले. 2013-14 मध्ये मिश्रणाचे प्रमाण 1.53% च्या आसपास होते, मात्र त्यानंतर आवश्यक उत्पादन क्षमता, पायाभूत सुविधा आणि नियामक आराखडा तयार करून त्यात टप्प्याटप्प्याने सुनियोजित पद्धतीने वाढ करण्यात आली आहे.
अधिक प्रमाणात इथेनॉल असलेली मिश्रणे बाजारात आणण्यापूर्वी वाहन उत्पादक, एसआयएएम, एआरएआय, सुट्या भागांचे उत्पादक, चाचणी संस्था आणि तेल विपणन कंपन्या यांच्याशी व्यापक चर्चा करण्यात आली होती.
इंधनाची कार्यक्षमता, इंजिनची कामगिरी, देखभाल खर्च आणि वाहन चालवण्याचा एकूण अनुभव यांबाबत E20 पेट्रोलच्या वापराबाबत वाहन उत्पादक, वाहन क्षेत्रातील संघटना किंवा ग्राहक संघटनांकडून सरकारकडे कोणतीही व्यापक किंवा पुराव्याने सिद्ध तक्रार प्राप्त झालेली नाही. मात्र तरीही, प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर उपस्थित करण्यात आलेल्या शंकांची सरकारने दखल घेतली असून, त्यांची वैज्ञानिकदृष्ट्या तपासणी करण्यात आली आहे.
एआऱएआय, एसआयएएम, आयओसीएल, आयआयपी आणि वाहन उत्पादक कंपन्यांनी इंजिनचा टिकाऊपणा, वाहन चालवण्यातील सुलभता, स्टार्ट होण्याची क्षमता, गंजरोधक क्षमता, सामग्रीशी सुसंगतता, उत्सर्जन आणि इंधन कार्यक्षमता यांसारख्या निकषांवर आधारित केलेल्या व्यापक प्रयोगशाळा चाचण्या आणि प्रत्यक्ष वापराच्या चाचण्यांमधून सिद्ध झाले आहे की, निर्धारित मानकांनुसार E20 चा वापर सुरक्षित आहे.
या अभ्यासांतून हे देखील स्पष्ट झाले आहे की, E20 मुळे जुन्या वाहनांच्या कार्यक्षमतेत कोणताही लक्षणीय बदल किंवा त्यांची असामान्य झीज होत नाही.
सरकारचे हे मूल्यांकन केवळ प्रयोगशाळेतील संशोधनावरच नव्हे, तर देशभरातील अंमलबजावणीनंतर आलेल्या व्यापक अनुभवावरही आधारित आहे.
मायलेज संदर्भात सरकारी संस्था आणि वाहन उत्पादकांच्या अभ्यासातून असे दिसून येते की, इंधनाच्या कार्यक्षमतेवर अनेक घटकांचा प्रभाव पडतो. ज्यात वाहन चालवण्याची परिस्थिती, चालवण्याच्या सवयी आणि वाहनाची देखभाल यांसारख्या अनेक घटकांचा समावेश आहे.
E20 इंधनाचे वैज्ञानिक मूल्यांकन आणि टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर वाहन उत्पादक, सुटे भाग पुरवठादार, एसआयएएम, एआऱएआय, चाचणी संस्था आणि तेल विपणन कंपन्या यांचा सहभाग होता. इंधन प्रणाली, इंजिनचा टिकाऊपणा, वाहन चालवण्यातील सुलभता, सामग्रीशी योग्य सानुकूलता आणि उत्सर्जन कामगिरी यांची यशस्वी पडताळणी झाल्यानंतरच E20 ची अंमलबजावणी करण्यात आली. या अभ्यासांतून हे देखील स्पष्ट झाले की, E20 मुळे जुन्या वाहनांच्या कामगिरीत कोणताही लक्षणीय बदल किंवा त्यांची असामान्य झीज होत नाही.
E20 कडे वळल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर देखील अनेक महत्त्वपूर्ण लाभ झाल्याचे दिसून आले आहे .
सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी E20 इंधनाशी संबंधित आणि ग्राहकांच्या इतर तक्रारी स्वीकारण्यासाठी, त्यावर संशोधन करुन त्यांचे निवारण करण्यासाठी तसेच ग्राहकांच्या सूचनांसाठी एक मजबूत ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा सुरु केली आहे. ग्राहक त्यांच्या तक्रारी अनेक ऑफलाइन आणि ऑनलाइन माध्यमांद्वारे नोंदवू शकतात. सर्व किरकोळ दुकानांवर उपलब्ध असलेली तक्रार/सूचना नोंदवही, समर्पित टोल-फ्री ग्राहक सेवा क्रमांक, कंपनीच्या वेबसाइट्स आणि मोबाइल ॲप्लिकेशन्स, ग्राहक संबंध व्यवस्थापन प्रणाली, समाज माध्यम प्लॅटफॉर्म, ई-मेल आणि केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणालीच्या माध्यमातून ग्राहक आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. तक्रारींचे जलद निवारण करण्याच्या उद्देशाने सर्व डीलर्स आणि संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे संपर्क तपशील किरकोळ विक्री केंद्रात ठळकपणे प्रदर्शित करण्यात आले आहेत. या माध्यमांतून प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची, तेल विपणन कंपन्यांच्या स्थापित कार्यपद्धतींनुसार, विहित कालावधीत रीतसर चौकशी करून निवारण केले जाते.
ग्राहकांना E20 इंधनाची सर्व पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांशी असलेली तांत्रिक सुसंगतता, इथेनॉल मिश्रणामुळे होणारे ऊर्जा सुरक्षेविषयीचे लाभ याबाबत माहिती देण्यासाठी जनजागृती उपक्रमही राबवले जात आहेत. तक्रार निवारण यंत्रणेच्या माध्यमातून ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादाचे तेल विपणन कंपन्या नियमितपणे निरीक्षण करतात आणि इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रम पुढील टप्प्यावर नेण्याबरोबरच ग्राहकांमध्ये विश्वास जागृत व्हावा यासाठी आवश्यक सुधारणा केल्या जात आहेत.
ही माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तराद्वारे दिली.
* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2288556)
आगंतुक पटल : 16