पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
केंद्र सरकारने इथेनॉल-मिश्रित पेट्रोलची सुरक्षितता, कार्यक्षमता आणि राष्ट्रीय लाभ केले अधोरेखित
प्रविष्टि तिथि:
23 JUL 2026 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2026
पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण 20% पेक्षा अधिक वाढवण्याबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. भविष्यात इथेनॉल अधिक प्रमाणात मिसळण्याबाबत कोणताही निर्णय हा सविस्तर वैज्ञानिक व तांत्रिक अभ्यास करून आणि वाहन उत्पादक, तेल विपणन कंपन्या व संशोधन संस्था यांसारख्या सर्व संबंधित घटकांशी सल्लामसलत केल्यानंतरच घेतला जाईल. मात्र , E85 इंधन (ज्यामध्ये 85% इथेनॉल आणि 15% पेट्रोल असते) हे केवळ अशा 'फ्लेक्स फ्युएल वाहनां'साठी (FFVs) आणले आहे जी अशा प्रकारच्या इंधनासाठी (E85) खास डिझाइन आणि प्रमाणित केली आहेत; याचा अर्थ देशभरात पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाच्या मूळ पातळीत वाढ झाली आहे, असा होत नाही.
पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे सध्या निर्धारित केलेले प्रमाण आणि गेल्या तीन वर्षांमध्ये साध्य केलेले सरासरी मिश्रण यांचे वर्ष-निहाय विवरण खालीलप्रमाणे आहे:
|
इथेनॉल पुरवठा वर्ष
|
सरासरी मिश्रण
|
|
2022-23
|
~12
|
|
2023-24
|
~14.6
|
|
2024-25
|
~19.2
|
|
2025-26 (नोव्हेंबर-जून)
|
20
|
इथेनॉल हे काही नवीन इंधन नाही. जगभरात एक शतकाहून अधिक काळापासून याचा वापर केला जात असून, ब्राझीलसारखे देश अनेक दशकांपासून जास्त इथेनॉल असलेले मिश्रण वापरत आहेत. भारतात, 'इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रम' टप्प्याटप्प्याने, वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित आणि सर्व संबंधित घटकांशी सल्लामसलत करून लागू केला आहे. या प्रक्रियेत नीती आयोग, वाहन उत्पादक कंपन्या, तेल विपणन कंपन्या, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम आणि इतर तांत्रिक संस्थांचा सहभाग आहे.
दोन दशकांहून अधिक काळ टप्प्याटप्प्याने विकसित केलेले धोरण, संबंधित घटकांशी चर्चा, वैज्ञानिक मूल्यमापन आणि क्षमता निर्मितीनंतर, भारताने मूळ उद्दिष्टाच्या पाच वर्षे आधीच 20% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य केले आहे.
वैज्ञानिक अभ्यास, प्रत्यक्ष पडताळणी आणि वास्तविक वापराचा व्यापक अनुभव यांवरून असे दिसून आले आहे की, विहित मानके आणि उत्पादकांच्या शिफारशींनुसार वापर केल्यास E20 हे एक सुरक्षित, अधिक स्वच्छ आणि तंत्रज्ञान -दृष्ट्या उत्कृष्ट इंधन आहे. सरकारचे हे निष्कर्ष केवळ प्रयोगशाळेतील संशोधनावरच नव्हे, तर देशभरातील अंमलबजावणीनंतर आलेल्या मोठ्या प्रमाणावरील अनुभवावरही आधारित आहेत.
E15+ मिश्रित पेट्रोलचा वापर साडेतीन वर्षांहून अधिक काळापासून आणि E19-E20 इंधनाचा वापर अडीच वर्षांहून अधिक काळापासून मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. 20 कोटींहून अधिक दुचाकी आणि 3 कोटींहून अधिक पेट्रोलवर चालणाऱ्या चारचाकी गाड्या या मिश्रणांवर चालत आहेत; आणि इथेनॉल मिश्रणामुळे इंजिन निकामी होण्याच्या किंवा वाहन बंद पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्याचा कोणताही ठोस पुरावा आढळलेला नाही. प्रत्यक्ष वापराच्या या व्यापक अनुभवामुळे या गोष्टीला अधिक दुजोरा मिळतो. उत्पादकांच्या सेवा-विषयक आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, E20 इंधनामुळे वाहनांमध्ये कोणत्याही प्रकारचा असामान्य गंज, झीज किंवा वाहनाचे आयुष्य कमी होणे यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत. उत्पादक कंपन्या E20 इंधन वापरणाऱ्या वाहनांसाठी वॉरंटीच्या अटींची पूर्तता सुरूच ठेवत आहेत, ज्यामुळे या इंधनाच्या सुरक्षिततेबद्दल आणि विश्वासार्हतेबद्दल अधिक खात्री पटते.
देशातील एका सर्वात मोठ्या प्रवासी वाहन उत्पादकांनी आर्थिक वर्ष 2025–26 मध्ये सुमारे 1.5 कोटी जुन्या, बिगर-ई20प्रमाणित वाहनांसह एकूण 2.84 कोटी वाहनांची देखभाल दुरुस्ती केली आणि त्यांनी कोणत्याही ई20 संबंधित इंजिनाचे नुकसान अथवा घटक भागांची असामान्य झीज झाल्याची नोंद केलेली नाही. त्याचप्रमाणे देशातील आघाडीच्या दुचाकी उत्पादक कंपन्यांपैकी एका कंपनीने विस्तृत सेवा नोंदींच्या आधारावर असा अहवाल दिला आहे की, पूर्वीच्या इंधन मिश्रणावर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत ई20 वर चालणाऱ्या वाहनांमध्ये नुकसान होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळलेले नाही.
वाहनांचे उत्पादक, वाहन संघटना अथवा ग्राहक संघटना यांच्याकडून ई20 इंधनाच्या वापरामुळे मायलेजमध्ये मोठी घट, संथ पिकप आणि पेट्रोल टाकी गंजणे यांच्याशी संबंधित कोणत्याही व्यापक अथवा पुराव्याच्या आधारावर सिद्ध झालेल्या तक्रारी सरकारकडे आलेल्या नाहीत. तरीही, प्रसार माध्यमे आणि समाज माध्यमांमध्ये उपस्थित करण्यात आलेल्या काही चिंतांची दखल सरकारने घेतली असून त्यांची वैज्ञानिकदृष्ट्या तपासणी करण्यात आली आहे.
प्रयोगशाळेतील विस्तृत चाचणी तसेच नीती आयोगाच्या अखत्यारीतील आंतर मंत्रालयीन समिती, आयओसीएल, एआरएआय, आयआयपी आणि एसआयएएम यांच्यातर्फे करण्यात आलेली क्षेत्र पडताळणी यांमधून हे निश्चित झाले आहे की, ई20 इंधन कोणत्याही प्रकारची असामान्य झीज अथवा सुसंगततेच्या समस्यांना कारणीभूत ठरत नाही.
मायलेजचा विचार करता, सरकारी संस्था आणि वाहन उत्पादक कंपन्या यांनी राबवलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, इंधनाच्या कार्यक्षमतेवर वाहन चालवण्याच्या वेळेची परिस्थिती, वाहन चालवण्याच्या सवयी तसेच त्या वाहनाची देखभाल यांसह अनेक घटकांचा प्रभाव पडत असतो. ई10 संरचना काही वाहनांमध्ये इंधनाच्या कार्यक्षमतेत दिसून येणारी घट ही सामान्यतः 3-5% पर्यंत मर्यादित असते तर ई20 मुळे अधिक उच्च-ऑक्टेन श्रेणी, उत्तम अँटी-नॉक गुणधर्म, अधिक स्वच्छ ज्वलनशीलता तसेच इंजिनची अधिक सुरळीत कार्ये शक्य होतात.
वाहनांचे उत्पादक, सुट्या भागांचे पुरवठादार, एसआयएएम, एआरएआय, चाचणी करणाऱ्या संस्था आणि तेल विपणन कंपन्या ई20 चे शास्त्रीय मूल्यमापन आणि टप्प्याटप्प्याने झालेल्या अंमलबजावणीच्या प्रत्येक टप्प्याशी जोडलेल्या होत्या. इंधन प्रणाली, इंजिनचा टिकाऊपणा, वाहन चालवण्याची सुलभता, साहित्याची वाजवी सुसंगतता तसेच उत्सर्जनासंदर्भातील कामगिरी यांच्या यशस्वी पडताळणीनंतरच ई20 च्या वापराची सुरुवात करण्यात आली होती. या अभ्यासांमधून हे देखील सिद्ध झाले होते की ई20 मुळे परंपरागत वापरात असलेल्या वाहनांच्या कामगिरीत कोणतेही लक्षणीय बदल होत नाहीत अथवा वाहनांची असामान्य झीज झालेली दिसून येत नाही.
एसआयएएम आणि एआरएआय यांच्या मते, ई20 मुळे त्वरण तसेच वाहनातून प्रवासाचा दर्जा सुधारतो आणि कार्बनचे उत्सर्जन कमी होते.
ई20 कडे झालेल्या स्थित्यंतरामुळे लक्षणीय राष्ट्रीय लाभ झाले आहेत. इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमामुळे 1.97 लाख कोटी रुपयांची परकीय गंगाजळी वाचली आहे, सुमारे 316 लाख टन कच्च्या तेलाच्या वापराला पर्याय मिळाला, 952 लाख टन कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी झाले आणि शेतकऱ्यांना 1.66 लाख कोटी रुपयांहून अधिक निधी हस्तांतरित झाला.
जैवइंधनांच्या संदर्भातील राष्ट्रीय धोरण, भारताची उर्जा सुरक्षा तसेच उत्सर्जन कमी करण्याची उद्दिष्टे यांना अनुसरून अधिक स्वच्छ, अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणदृष्ट्या शाश्वत इंधनांकडे टप्प्याटप्प्याने वळणे हे सरकारचे धोरण आहे.
E20 कडे होणारे संक्रमण टप्प्याटप्प्याने, सल्लामसलत करून आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित पद्धतीने करण्यात आले आहे. यासाठी वाहन उत्पादक, एसआयएएम, एआरएआय, तेल विपणन कंपन्या तसेच इतर संबंधित भागधारकांशी व्यापक चर्चा करण्यात आली. याच्या वापरापूर्वी वाहनांमधील साहित्याची सुसंगतता, इंजिनाचा टिकाऊपणा, इंधन प्रणाली, वाहन चालविण्याची कार्यक्षमता, उत्सर्जन आणि एकूण कामगिरी यांचे सखोल मूल्यांकन करण्यात आले.
अत्यंत वैज्ञानिक दृष्ट्या केलेले प्रमाणन आणि विपुल चाचण्यांनंतर वाहन उद्योगाने केलेल्या स्वीकारानंतर , आता परत E0/E10 पेट्रोलकडे वळण्याचा प्रस्ताव विचारात नाही. सार्वजनिक धोरणाचे उद्दिष्ट एका उत्कृष्ट इंधनासह पुढे वाटचाल करण्याचे असून निकृष्ट दर्जाच्या इंधनाकडे परत वळणे शक्य नाही.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी E20 इंधनाशी संबंधित आणि ग्राहकांच्या इतर तक्रारी स्वीकारण्यासाठी, त्यावर संशोधन करुन त्यांचे निवारण करण्यासाठी तसेच ग्राहकांच्या सूचनांसाठी एक मजबूत ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा सुरु केली आहे. ग्राहक त्यांच्या तक्रारी अनेक ऑफलाइन आणि ऑनलाइन माध्यमांद्वारे नोंदवू शकतात. सर्व किरकोळ दुकानांवर उपलब्ध असलेली तक्रार/सूचना नोंदवही, समर्पित टोल-फ्री ग्राहक सेवा क्रमांक, कंपनीची संकेतस्थळे आणि मोबाइल ॲप्लिकेशन्स, ग्राहक संबंध व्यवस्थापन प्रणाली, समाज माध्यम प्लॅटफॉर्म, ई-मेल आणि केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणालीच्या माध्यमातून ग्राहक आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. तक्रारींचे जलद निवारण करण्याच्या उद्देशाने सर्व डीलर्स आणि संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे संपर्क तपशील किरकोळ विक्री केंद्रात ठळकपणे प्रदर्शितकरण्यात आले आहेत.या माध्यमांतून प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची, तेल विपणन कंपन्यांच्या स्थापित कार्यपद्धतींनुसार, विहित कालावधीत रीतसर चौकशी करून निवारण केले जाते.
E20 इंधनाची सर्व पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांशी असलेली तांत्रिक सुसंगतता , इथेनॉल मिश्रणामुळे होणारे ऊर्जा सुरक्षेविषयीचे लाभ याबाबत ग्राहकांना माहिती देण्यासाठी जनजागृती उपक्रमही राबवले जात आहेत. तक्रार निवारण यंत्रणेच्या माध्यमातून ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादाचे तेल विपणन कंपन्या नियमितपणे निरीक्षण करतात आणि इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रम पुढील टप्प्यावर नेण्याबरोबरच ग्राहकांमध्ये विश्वास जागृत व्हावा यासाठी आवश्यक सुधारणा केल्या जात आहेत.
ही माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तराद्वारे दिली.
* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/संजना चिटणीस/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2288463)
आगंतुक पटल : 19