आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या ब्रिक्स 2026 च्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स आरोग्यमंत्र्यांची 16वी बैठक संपन्न


ब्रिक्स आरोग्यमंत्र्यांनी 16 वा ब्रिक्स आरोग्य मंत्रीस्तरीय जाहीरनामा केला एकमताने मंजूर

16 व्या ब्रिक्स आरोग्य मंत्रीस्तरीय जाहीरनाम्याद्वारे भविष्यातील सहकार्यासाठी चिरस्थायी संस्थात्मक यंत्रणा स्थापित: केंद्रीय आरोग्य मंत्री

प्रविष्टि तिथि: 23 JUL 2026 5:49PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जुलै 2026

 

भारताच्या 2026 च्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली ब्रिक्स आरोग्यमंत्र्यांची 16वी बैठक आज चंदीगड येथे यशस्वीरित्या संपन्न झाली. या बैठकीने सदस्य देशांना प्रमुख आरोग्य आव्हानांवर विचारविनिमय करण्यासाठी आणि निरंतर सहकार्याच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्था मजबूत करणे, नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे, महामारीसाठीची सज्जता वाढवणे आणि सार्वत्रिक आरोग्य व्याप्ती वाढविणे याप्रति आपली सामूहिक वचनबद्धता पुन्हा एकदा दृढ करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

प्रमुख भाषण

16 व्या ब्रिक्स आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीला आभासी पद्धतीने संबोधित करताना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा म्हणाले की ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने लोककेंद्रित धोरणे, आरोग्यसेवेची विस्तारित उपलब्धता, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सुधारित सेवा वितरणाच्या माध्यमातून आपली आरोग्यसेवा प्रणाली मजबूत करण्यासाठी परिवर्तनकारी सुधारणा हाती घेतल्या आहेत.’

गेल्या दोन दशकांतील ब्रिक्सच्या वाटचालीवर प्रकाश टाकताना नड्डा यांनी नमूद केले की ब्रिक्स, ग्लोबल साउथचा एक निर्णायक आवाज असून अधिक समावेशक व न्याय्य जागतिक व्यवस्था घडवण्यासाठी एक वाढता प्रभावशाली मंच म्हणून उदयास आला आहे. त्यांनी असे निरीक्षण नोंदवले की संसर्गजन्य रोग, असांसर्गिक रोगांचा वाढता भार, हवामानाशी संबंधित आरोग्य धोके आणि जलद तांत्रिक प्रगतीसाठी अधिक सखोल बहुपक्षीय सहकार्य आणि अधिक मजबूत संस्थात्मक भागीदारी यांची आवश्यकता आहे.

ब्रिक्स अध्यक्षपदाअंतर्गत भारताचे आरोग्यविषयक प्राधान्यक्रम विशद करताना नड्डा यांनी अधोरेखित केले की जागतिक क्षयरोगाच्या एकूण भारापैकी जवळपास अर्धा भार ब्रिक्स देशांमध्ये आहे. तसेच त्यांनी स्पष्ट केले की ब्रिक्स क्षयरोग संशोधन जाळ्याच्या सातत्यपूर्ण बळकटीकरणाने सहयोगी संशोधन, नवकल्पना, कार्यान्वयन संशोधन तसेच नवीन निदान पद्धती, उपचारपद्धती व लसींची समान उपलब्धता यांना गती येईल, ज्यामुळे जागतिक क्षयरोग निर्मूलनाच्या प्रयत्नांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान मिळेल.

त्यांनी ब्रिक्स वैद्यकीय उत्पादन नियामक प्राधिकरणांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या महत्त्वावरही भर दिला आणि ब्रिक्स जीएक्सपी श्वेतपत्रिकेच्या प्रकाशनाचे स्वागत केले.

मानसिक आरोग्य म्हणजे सार्वत्रिक आरोग्य संरक्षणाचा एक अत्यावश्यक आधारस्तंभ असल्याचे सांगत नड्डा यांनी संशोधन मजबूत करण्यासाठी, मानसिक स्वास्थ्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सदस्य देशांमधील उपचारांमधील तफावत कमी करण्यासाठी एक प्रमुख संस्थात्मक उपक्रम म्हणून NIMHANS द्वारे समन्वित केल्या जाणाऱ्या 'ब्रिक्स नेटवर्क ऑफ सेंटर्स ऑफ एक्सलन्स ऑन मेंटल वेलनेस'च्या स्थापनेची घोषणा केली.

आपल्या भाषणाचा समारोप करताना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी 16 व्या ब्रिक्स आरोग्य मंत्रीस्तरीय जाहीरनाम्याचे वर्णन केवळ एक सहमती दस्तऐवज नसून त्याहून बरेच काही असे केले आणि सांगितले की हा जाहीरनामा अशा चिरस्थायी संस्थात्मक यंत्रणा स्थापित करेल ज्यामुळे येत्या काळात ब्रिक्स देशांमधील सहकार्य अधिक दृढ होईल.

ब्रिक्स आरोग्यमंत्र्यांच्या जाहीरनाम्याचा स्वीकार

या बैठकीची एक प्रमुख निष्पत्ती म्हणजे 16 व्या ब्रिक्स आरोग्य मंत्रीस्तरीय जाहीरनाम्याचा एकमताने स्वीकार ही होय.

या जाहीरनाम्याद्वारे सदस्य देशांनी सार्वत्रिक आरोग्य व्याप्तीला चालना देणे, महामारी प्रतिबंध, पूर्वतयारी आणि प्रतिसाद मजबूत करणे, डिजिटल आरोग्याला प्रोत्साहन देणे, नियामक सहकार्य वाढवणे, सहयोगी संशोधनाचा विस्तार करणे, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांचा सामना करणे, मानसिक आरोग्य आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे, पारंपरिक औषधोपचार मजबूत करणे, आणि परवडणारी औषधे, लसी, निदान पद्धती व वैद्यकीय तंत्रज्ञान यांची समान उपलब्धता सुनिश्चित करणे यांप्रति आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली.

 

* * *

निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2288446) आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , हिन्दी , Urdu , Bengali , Bengali-TR , Punjabi , Gujarati , Tamil